Wednesday, November 16, 2016

सु.शि.

सु.शि. अगदी हक्काने एकेरी हाक मारावी असा पण वयाने मोठा असणारा माझा मित्र..... 

खरंतर मित्र म्हणवून जरा स्वत:चीच कॉलर ताठ करायची, बाकी काही नाही. सु.शि. ची पहिली वाचलेली कादंबरी म्हणजे सनसनाटी..... त्या कादंबरीने मला सु.शि. या प्रतिभेची ओळख करुन दिली. पण स्वत: जाऊन लायब्ररीतून पुस्तकं आणण्याचं स्वातंत्र्य तेव्हा चिपळूणमधे आम्हाला कुठलं? त्यामुळे घरात आणली तर वाचायची अश्या पद्धतीनेच मी सु.शि. वाचत राहीलो.  मधून मधून कादंब-या घरी यायच्या आणि त्या वाचून हातावेगळ्या झाल्या की मग घरी इतराना मिळायच्या. याच दरम्यान कोणत्याही कॉलेजकुमाराच्या हाती पडणारी दुनियादारी मी वाचली आणि ती इतक्यांदा वाचली की बहुतांश मुखोद्गत झाली, आणि त्यामुळेच की काय दुनियादारी हया चित्रपटात केलेल्या कथानकातील बदलामुळे तो चित्रपट पचनी पडलाच नाही. दुनियादारी या कादंबरीचे भाग्य सिरीयलला पण नाही लाभलं.... 
माझा आतेभाऊ विनय कार्ले हा पण सु.शि. प्रेमी, त्यामुळे कधी खेडला गेलो की त्याच्याकडे दोन तीन कादंब-यांचा फडशा पाडायचा हे ठरलेले, किंबहूना त्यासाठीच जायचं.... एकदा विनयदादाचा फोन आला की उद्याचा दिवस राखीव ठेव. दुस-या दिवशी हा पठ्ठ्या सु.शि. ला घेऊन चिपळूणला हजर. घडलं असं होतं म्हणे की कोवळीक ही गुहागरच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी सु.शि. नी लिहीली खरी पण त्याच्या म्हणण्यानुसार तो कधीही गुहागरला आलेला नव्हता. ऐकीव माहीती ही कादंबरीसाठी वापरुन ती खूपच लोकप्रिय झाल्यानंतर खरंच गुहागर तसे आहे का हे स्वारीला म्हणे पहायचं होतं. खेडच्या वाचकांली सु.शि.ला काही कार्यक्रमानिमित्त बोलावलेले होते त्यामुळे बंधुराजानी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. याच गुहागरच्या समुद्रकिना-यावर मी तोपर्यंत न छापलेली कळप आणि बंद दरवाजा ही कथा सु.शि.च्या तोंडून ऐकली. पुढे बंद दरवाजा खूपच वेगळं कथानक घेऊन आली हा भाग अलाहिदा.
अमर विश्वास, मंदार, फिरोज, दारा बुलंद असे हिरो सु.शि.नी रंगवले पण माझा लाडका मात्र अमर विश्वास. त्यामुळे इतरांच्या तुलनेने अमरच्या कादंब-या मी जास्त वाचल्या. सस्पेंस टिकवत, कोर्टरुम ड्रामा रंगवावा तो सु.शि. नेच. त्याची ती विलक्षण हातोटी होती. असे असले तरी सु.शि.चा मात्र फिरोज लाडका.. कथानकात येणारे कायद्याचे संदर्भ असो वा वैद्यकीय संदर्भ, सु.शि. संबंधित मित्रांशी सतत चर्चा करुन आपल्या शंकांचे निरसन झाल्याविषयी वापरत नसे. त्याने त्यात जीव ओतलेला असायचा.
पुढे शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर सु.शि. चा संपर्क वाढला. शनिवारपेठेत घरकाम काढल्यामुळे डहाणुकरमधे भेटी व्हायच्या पण जसा हा संपर्क एकदम बहरत गेला तसा तो टिकून मात्र नाही राहीला. कामातून वेळ कमी मिळायचा आणि मग सु.शि.पण लिखाणात गर्क असला की भेट व्हायची नाही. पुढे मी पुणे सोडले त्यानंतर सु.शि.च्याच दुनियादारीतले वाक्य वापरायचे झाले तर खंडाळा घाटातून खोपोली जितके परके वाटते तसे काहीसे झाले. मोबाईल, फेसबुक आदी त्याकाळी नसल्याने त्यानंतर सु.शि.ची बातमी कळली ती तो गेल्याचीच. आयुष्यातला छोटासा पण छान अध्याय संपला. मिस यू सु.शि......

-- मनोज भाटवडेकर