५ आँगस्टच्या रात्री ९ जण मुंबईहून तर ५ जण पुण्याहून विमानाने श्रीनगर पुढे गाडीने कारगिल, लेह, खारदुंग, नुब्रा व्हँलीतील तुरतूक हे सीमावर्ती ठिकाण, परत येऊन श्योक व्हँलीतून पँगाँग, परतीच्या प्रवासात चांगला पासमधून कारु, आणि लेह असा प्रवास ठरला. अर्थात लडाख म्हटलं की कागदावरचा प्रवास हा फक्त कागदावर राहतो. सतत अपग्रेडेशन ठेवायची तयारी नसेल तर हाल होतात याचे प्रत्यंतर आम्हाला पण चुकले नाही. 02 आँगस्ट 2019 ला अचानकपणे एक अधिसूचना प्रसिद्ध झाली, ज्यात पर्यटकांनी काश्मीर खोरं तातडीने सोडावं असा स्पष्ट उल्लेख होता...
कारणांबाबत गोंधळ असल्याने काहीच भाष्य करता येत नव्हतं... Wait and watch एवढंच हाती होतं पण प्रवासाची तारीख अगदी जवळची असल्याने मनावर अनिश्चिततेचं सावट होतं. संपूर्ण दिवस असाच गेला. तीन तारखेला मी प्रवासात होतो. कश्मीरमधे काय घडतंय आणि घडणार आहे याची एव्हाना कल्पना आली होती. काश्मीर पूर्णपणे वगळून प्रवास करायचा हाच एकमेव मार्ग उरल्याने दिल्ली ते श्रीनगर या प्रवासाऐवजी दिल्ली लेह असा प्रवास ठरवला. पण् म्हटलं ना, लडाखचे प्रवास कागदावर सोपे वाटतात... तीन तारखेपासून पावसाने सर्वत्र थैमान सुरु केले. महत्वाच्या मिटींगसाठी मी कोल्हापूरला होतो, परतीच्या प्रवासात रस्त्यामधे तीन ठिकाणी पडलेल्या झाडांमधून मार्ग काढत रात्री उशिरा चिपळूण गाठलं...
महत्प्रयासाने एकदाची आम्हा नऊजणांची तिकीटं निघाली तर पुण्याच्या पाचजणांची त्याच विमानाची दिल्ली लेह तिकीटं पण काढून झाली. आता मी अगदी आत्मविश्वासाने सगळ्यांना सांगितले की उद्या आपण पुण्याहून थेट लेहला जातोय आणि श्रीनगर वगळता उर्वरित सर्व कार्यक्रम आता ठरल्याप्रमाणे पार पडेल... पण....
५ आँगस्टची सकाळ जास्तच चिंताजनक होती.. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाल्याने कराड रोड किमान तीन ठिकाणी पाण्याखाली होता.. ताम्हिणी घाट दरड कोसळल्याने बंद झालेला तर आंबा मार्गे कोकरुड रस्ता मलकापूर जवळ पाण्याखाली होता. वरंधा आणि महाबळेश्वर कडून जायचं तर जगबुडी पूल केव्हाही बंद होण्याची शक्यता... अर्थात रेल्वेरस्त्याने जाऊन खेड मधून बाहेर पडण्याचा आँप्शन असल्याने त्याचं एवढं संकट वाटत नव्हतं.. आमच्या खेडच्या मंडळींना तिकडेच थांबवून आम्ही चिपळूण सोडलं.. जगबुडी ओलांडली आणि हुश्श झालं.. खेडवाले स्थानापन्न झाले आणि कशेडीदरम्यान वरंधा बंद झाल्याचे कळले. एकमेव तारणहार आंबेनळी घाट धुवाँधार पावसातून पार केला. एरवी एन्जॉय करावं असं दाट धुकं, पण आज तिकडे लक्षही नव्हतं.. कधी एकदा NH4 ला लागतोय असं झालं होतं.
वेण्णा लेकजवळ ओसंडून वाहणारं पाणी रस्ता ओलांडून शेताडीत पसरत होतं पण आमच्या गाडीला अडवू नाही शकलं... पाचगणी ओलांडून पसरणी घाटाला लागलो तेव्हा छान उन्हं पसरली होती... वाई मागे टाकत NH4 ला लागलो आणि आम्ही सुssटssलो....
वेण्णा लेकजवळ ओसंडून वाहणारं पाणी रस्ता ओलांडून शेताडीत पसरत होतं पण आमच्या गाडीला अडवू नाही शकलं... पाचगणी ओलांडून पसरणी घाटाला लागलो तेव्हा छान उन्हं पसरली होती... वाई मागे टाकत NH4 ला लागलो आणि आम्ही सुssटssलो....
वाई फाट्यावर पोटपूजा केल्यावर आस्ते कदम पुण्याकडे निघालो.. साधारणपणे साडेपाचला पुण्यात पोचल्यावर विमानाच्या वेळेपर्यंत करायचं काय हा प्रश्न माझ्या मोठ्या बहिणीने पद्माताईने परस्परच सोडवून टाकला.. चहा, विश्रांती, पुन्हा चहा, गप्पा आणि मग जेवण करुन एअरपोर्ट असं शेड्यूल तिनंच फायनल करुन टाकलं.. तिच्याकडे पोचल्यावर आजवरचा ताण एकदम कमी झाल्याने गात्रं सैलावली... थोडीफार डुलकी पण मिळाली.. घरच्यांचा निरोप घेऊन आम्ही एअरपोर्टवर पोचलो...
यथावकाश आमचं विमान सुटलं... प्रत्येकाने झोपेची थकबाकी वसूल करायला सुरुवात केली पण अतिश्रमाने देखील झोप येत नाही... दिल्ली येईपर्यंत मी जागाच होतो.. टाईमपास म्हणून खिडकीच्या काचेला नाक लावून खाली काही दिसतंय का या निष्फळ प्रयत्नात वेळ जात राहीला...
पहाटे पोटात खड्डा पाडण्याचा कार्यक्रम पार पाडत विमान जमिनीला टेकलं.. आमच्या नऊजणांपैकी सहा जणांचं लगेज थेट लेहला मिळणार होतं पण बाकी तीन जणांना सामान कलेक्ट करुन पुन्हा चेक इनचा सव्यापसव्य पार पाडायला लागणार होता... पुणेकर दुसऱ्या टर्मिनलवरुन इकडे येणार होते म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत उभे राहीलो..
एअरपोर्टवरच्या चहाचे दर पाहून कोणाच्याच घशाला त्याची कोरड पडेना पण शेवटी वन बाय टू करत नरडं जरा शेकलं. सुदेशने मात्र एका स्टाफमेंबरला हरभ-याच्या झाडावर चढवून त्यांच्या कँटीनमधला चहा स्वस्तात पदरात पाडून घेतला. बघताबघता एअरपोर्टवर गर्दी वाढली तशी आम्ही निमूटपणे चेक इनचे सोपस्कार पार पाडून विमानात बसलो.. सुरुवातीला ढगातून आणि मग पावसाच्या थेंबातून मार्ग काढत विमान चाललं... काही वेळाने मात्र हवा एकदमच स्वच्छ झाली आणि पायाखाली बर्फाच्छादित पर्वतशिखरं दिसू लागली.. ते विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रत्येकालाच खिडकी हवी होती... विमान ब-यापैकी रिकामं असल्याने सर्वांची तीही इच्छा पूर्ण झाली.. खाली मनाली लेह हायवे दिसू लागला आणि लेह जवळ आल्याचे कळले.. वाळवंटी प्रदेशातील हिरवळीचे पुंजके आणि त्याआधारे वसलेल्या वस्तीच्या खुणा मागे टाकत विमानाने लेह शहरावर घिरट्या घातल्या आणि कोणाला कळायच्या आत स्पितुक मोनेस्ट्रीच्या बाजूने विमानाने धावपट्टीवर सूर मारला..
सर्वाधिक उंचीवरील धावपट्टी असा लौकिक असणारी आणि लष्करी वापराची व मालकीची ही धावपट्टी लांबीला तुलनेत लहान आहे.. एअरपोर्ट इमारत पण तशीच छोटीशी आहे.. बाकी सोपस्कार पार पाडून बाहेर आलो तर दोरजी मला पाहून जुले सर करत पुढे आला.. जुले म्हणजे लडाखी भाषेत नमस्ते... टपावर बँगा चढवून गाडी हलली... हाँटेल खारदुंग ला च्या दारात आमच्या स्वागतासाठी एक सरप्राईज उभं होतं... घरापासून चार हजार किमीवर एक मराठी माणूस आमच्या स्वागतासाठी उभा होता. आपटेकाकांनी सर्वांचे स्वागत करुन चहा देतानाच काही महत्त्वाच्या सूचना व समुद्र सपाटीपासून ११००० फुटांवर घ्यायची काळजी याची माहिती दिली...
आजचा दिवस हा फक्त लोळून काढायचा असल्याने जेवण झाल्यावर मंडळी जी विसावली ती एकदम संध्याकाळीच उठली.. इतक्या उंचीवर आँक्सिजन कमतरतेमुळे पुरेशी विश्रांती आणि भरपूर पाणी आवश्यक असते.. माऊंटन सिकनेस टाळायचा असेल तर या गोष्टी मस्ट... संध्याकाळचा चहा पिताना टिव्हीवर काश्मीरमधील धामधूम पाहत होतो तर लडाखमधला आनंद अनुभवत होतो... जरावेळाने पाय मोकळे करायला बाहेर एक फेरफटका मारुन परतलो..
उद्याचा दिवस स्थानिक टुरिस्ट स्पाँटचा होता.. थोडं उशिरा निघायचं असल्याने रात्री आमची अंताक्षरी चांगलीच रंगली... जशी थंडी वाढली तशी मात्र बैठक आवरती घेऊन सगळेजण झोपेच्या कुशीत शिरले...
मनोज
०६.०८.२०१९
(क्रमशः)





No comments:
Post a Comment