Tuesday, March 10, 2020

आमची लडाखवारी - भाग २


समुद्रसपाटीपासून सुमारे ११००० फूट उंचीवर लेह शहर सभोवताली उंच पहाड आणि मधे बशीच्या आकारात वसलेले आहे. लेहमधील प्रसिद्ध ठिकाणांबाबत माहिती घेण्यापूर्वी लडाखच्या इतिहासात थोडसं डोकवावे लागेल.  लडाखी राजवंश नामग्याल या घराण्याने 15 व्या शतकाच्या मध्यापासून अगदी 1842 च्या डोग्रा राजांच्या अंतिम आक्रमणापर्यंत लडाखवर राज्य केलं. या कालखंडात अनेक नामवंत नामग्याल राजे होऊन गेले, पैकी तशी नामग्याल हा विशेष दखल घेण्याजोगा. मुस्लिम आक्रमकांची नामग्याल साम्राज्यावरची आक्रमणं परतवून बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन व जतन तर केलेच पण नवनव्या बौद्धमठांची उभारणी (monestaries) त्याने केली.  सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात Tsemo fort मूळचा राजमहाल राँयल पँलेस याची उभारणी पण त्याने केली.  त्याच्या नंतर गादीवर आलेला सेंगे नामग्याल याची कारकिर्द आणखी दैदिप्यमान राहीली. अनेक कल्याणकारी योजना, महत्वाकांक्षी बांधकामे त्याने केली. त्याने केवळ तीन वर्षांत नऊ मजली लेह राजवाडा बांधला अशी माहिती उपलब्ध आहे. ल्हासा येथील प्रसिद्ध पोताला राजवाड्याशी साधर्म्य असणारा हा राजवाडा सध्या पुनर्रचनेसाठी बंद आहे. 
सेंगे नामग्याल ने लेहचं सिल्करुटवरील महत्त्व ओळखलं आणि आपली राजधानी शे वरुन हलवली आणि ती लेहला आणली. सेंगेच्या कारकिर्दीत लेहचं व्यापारी महत्त्व वाढतंच गेलं ते अगदी 1834 मधे डोग्रा राजांनी आक्रमण करेपर्यंत. 1834 ते 1842 तत्कालीन नामग्याल राजाने डोग्रांना झुंजवलं पण अखेर डोग्रांनी नामग्याल राजांना हरवलं. राजा पकडला गेला आणि त्याला स्तोक येथे बंदीवासात ठेवलं गेलं. डोग्रा आक्रमणात कमालीचा उध्वस्त झालेल्या लेह राजवाड्याची दुरुस्ती अलिकडच्या काळात हाती घेण्यात आली.
लेहमधील दुसरी ठळक वास्तू म्हणजे जामा मस्जिद 1685 मधे बांधली गेली. नामग्याल घराण्यातला एक शासक डेलेग नामग्याल याने तिबेट प्रांतामधे लुडबूड सुरु केली. तिबेटी सैन्याने जोरदार प्रतिकार करताना  डेलेगच्या बलस्थानाला म्हणजे बासगोला वेढा घातला. पराभवाच्या भितीने डेलेगने मोंगलांना साकडं घातलं. त्यांनी डेलेगची सुखरुप सुटका केली पण त्याची किंमत डेलेगला मुस्लिम धर्म स्विकारुन चुकवावी लागली आणि अशा रितीने मध्य आशिया आणि भारत यांना एकमेकांपासून विलग करणाऱ्या हिमालय आणि काराकोरम पर्वतराजींच्या मधे वसलेल्या लेहचे व्यापारी महत्त्व उत्तरोत्तर वाढतच गेले.  यारकंद व खोतन या व्यापारी केंद्रातून भारताकडे चालणाऱ्या व्यापाराला लेह हे विश्रांतीस्थान म्हणून मिळाले. एकावेळी दहा दहा हजार घोडे सोबत घेऊन व्यापारी काफिला चालायचा, यावरुन या मार्गावरील संपन्नता लक्षात येईल. 1949 पर्यंत हा आलेख उंचावतच राहीला परंतु पाकीस्तानने काश्मीर मधे घुसखोरी केल्यानंतर हा व्यापार कायमचा थंडावला तो आजवर. या दरम्यान यारकंदचे हजारो मुस्लिम लेहमधे अडकले ते शेवटी लेहजवळच्या चुशोतजवळ वसले. त्यामुळे लेहमधे बौद्ध धर्मियांच्या सोबत मुस्लिमांची पण संख्या नजरेत भरते. यासोबतच आणखी एक व्यापारी मार्ग त्याकाळी अस्तित्वात होता तो म्हणजे तिबेट ते श्रीनगर.  तिबेटहून उच्च दर्जाची पश्मिना लोकर लडाखच्या पूर्व भागातून लेहमार्गे कश्मीरला पाठवली जायची. कश्मीरमधले कुशल विणकर या लोकरीपासून शाल, स्वेटर तयार करायचे.
ला डाख म्हणजे खिंडींचा प्रदेश पुढे अपभ्रंशित होत लडाख, लद्दाख म्हणून ओळखला जातो. याचा सहसा उच्चार लेहलडाख असा करतात पण तांत्रिकदृष्ट्या हे चूक आहे. जम्मू कश्मीर राज्याचा सर्वात उत्तरेकडचा विभाग लडाख, ज्याचे मुख्यालय लेह हे आहे. जम्मू, कश्मीर आणि लडाख अशा तीन विभागात विभागलेले हे भारताचे मुकुटमणी राज्य. लडाखची पूर्व बाजू चीनने बळकावली तर पश्चिम बाजू पाकीस्तानने. परंतु सामरिकदृष्ट्या महत्वाच्या सियाचीन हिमनदीवरील आपल्या कब्जामुळे या दोन्ही देशांवर आपला धाक आहे. नुकत्याच घडलेल्या कलम 370 रद्द करण्याच्या कृतीमुळे लडाख आता केंद्रशासित प्रदेश झाला असून जम्मू कश्मिरपासून त्याची सुटका झाली आहे. केंद्रशासित प्रदेश झाल्या झाल्या भेट देणारे कोकणातील बहुधा पहिले आम्हीच असावेत.
लडाखमधे 77% जनता बौद्धधर्मिय तर 14% मुस्लिम, 8% हिंदू आणि 1% इतर आहेत. इथे बहुतांश जण भोटी अथवा बोधी ही लडाखी भाषा जी मूळची तिबेटी भाषा बोलतात, मात्र पर्यटनामुळे हिंदी आणि इंग्रजी देखील उत्तम बोलली जाते.  Julley म्हणजे नमस्ते म्हणत आपलं स्वागत होतं पण आजकाल julley हा शब्द निरोप घेताना पण वापरला जातो. सिंधू नदी ही लडाखमधून वाहणारी प्रमुख नदी.. जी तिबेटमधील मानसरोवर जवळ उगम पावून चीन, भारत आणि पाकिस्तान मधून सुमारे 3180 किमीचा प्रवास करत समुद्रास मिळते. 
झंस्कारमधे उगम पावणारी सुरु नदी कारगिलजवळ द्रास नदीला मिळते.
नदीचं मूळ शोधू नये म्हणतात पण झंस्कार नदीचं मूळ खूपच रोचक आहे.. झंस्कार नदीला दोन फाटे आहेत. पेन्सी खिंडीतून उगम पावणारी दोडा नदी हा एक फाटा तर दुसऱ्या बाजूला शिंगू खिंडीत उगम पावणारी करग्याग नदी व बारालाच्छा खिंडीत उगम पावणारी त्सरप नदी यांच्या संगमातून निर्माण झालेली लुंगनाक नदी. अशी ही झंस्कार नदी हिवाळ्यातील चदर ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे. मरखा खो-यातून वाहणारी मरखा नदी आपला जलसाठा झंस्कार नदीला अर्पण करते. पुढे ही झंस्कार नदी निमूजवळ सिंधू नदीला मिळते. नुब्रा खो-यातून वाहणारी नुब्रा नदी सियाचेन हिमनदीतून उगम पावते व उत्तर लडाखमधून वाहते. पुढे श्योक नदीशी तिचा संगम होतो आणि दोन्ही नद्यांचा प्रवाह पाकीस्तानमधे स्कर्डूजवळ सिंधू नदीला मिळतो. थोडक्यात लडाखच्या विविध भूप्रदेशात उगम पावलेल्या अनेक नद्या शेवटी सिंधू नदीला मिळतात आणि पुढे पाकीस्तानचा प्रदेश समृद्ध करतात.

मनोज
०६.०८.२०१९

No comments:

Post a Comment