पागेवरची रामनवमी
आमची पाग, तिथले उत्सव, परंपरा यावर लिहाल तेवढं थोडं आहे.. नवीन वर्ष सुरु झाल्यावर चैत्रातलं हळदीकुंकू आणि रामनवमीची पालखी यांनी सणांना, उत्सवांना सुरुवात व्हायची. पण आज कोरोनामुळे आमची शतकांची परंपरा खंडीत झाली. आज रामाची पालखी निघणार नाही.. मन किमान चाळीस वर्षे मागे गेलं. पूर्वापार दुपारी दत्ताच्या देवळात रामजन्माचं किर्तन व्हायचं. खरंतर कृष्णेश्वराला लागून रामाचं मंदीर पण अगदीच छोटेखानी असल्याने तिथला उत्सव दत्ताच्या देवळात साजरा व्हायचा. तशी आमच्याकडे गंमतच आहे.. शिवरात्रीचा उत्सव कृष्णेश्वराच्या मंदीरात असला तरी छबिन्याची पालखी प्रथम गणपती मंदीरात जाणार. गोपाळकाल्याचा उत्सव साजरा होतो कृष्णेश्वर प्रांगणात पण किर्तन विठ्ठल मंदिरात तर रामनवमीचं किर्तन दत्ताच्या देवळात.
या रामाच्या पालखीच्या कैक आठवणी आहेत. माध्यान्ही रामजन्माचं किर्तन झालं की साधारण एकच्या दरम्यान पालखी निघायची. लैनवाडीतल्या शिवरामाला सांगावा गेलेला असायचाच. मळ्यावरच्या नदीत स्वच्छ आंघोळ घालून सजवलेले पांढरेशुभ्र बैल बैलगाडीला जुंपलेले, तिला झावळ्यांची कमान लावून शिवरामा हजर व्हायचा. मग नगारा गाडीत ठेवण्यासाठी व उरलेली जागा पटकावण्यासाठी मुलांची घाईगडबड असायची. पुढे बैलगाडीची अशी व्यवस्था झाली की मग दुटांगी धोतर वर कोट, डोक्यावर पगडी, गळ्यात ढोलकं घालून विनायकदादा भागवत उभे असायचे.
सोबतीला बजाअप्पा चितळे, मोरुभाऊ जोशी, भार्गव अण्णा काळे, गोपाळकाका जोशी, बंडूकाका करमरकर, पंढरीकाका बर्वे मंडळी निघत. मागून समस्त ग्रामस्थ मंडळी झांजा, टाळ्या वाजवत. आणि प्रथेप्रमाणे पहिलं गणपतीचं भजन, नंतर रामाची भजनं म्हणत पालखी घरं घेत पुढे सरके. जिथे घरं जास्त तिथे पालखी रेंगाळे आणि मग भजन सांगणारे, म्हणणारे अगदी टीपेला पोचत. घटका गेली पळे गेली तास वाजे घणाणा.. आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणा ना म्हणत पुढल्या खटक्यावर घटका शब्द आलाच पाहिजे.. भजन सांगणारे पण अनेक हौशी होते. भजनांची वर्षभराची उजळणी व्हायची. एकामागोमाग एक घरं घेत पालखी लैनवाडीत शिरे. दारात येणाऱ्या देवाच्या स्वागताला रस्ता सारवून वर सु़ंदर रांगोळी असायची. चैत्रात चाफा छान फुललेला असायचा, त्यामुळे रामाच्या गळ्यात चाफ्याच्या फुलांचा घमघमाट असे. झेंडूच्या माळा हा अलिकडचा प्रकार.. पालखी आँक्ट्राँय नाक्यावर पोचली की पलिकडची गोपाळकृष्ण वाडीतली मंडळी आरतीचं ताट घेऊन पुढे यायची आणि मग त्या
चौकात चार भजनं जास्त व्हायची. शिवरामा पण बैलांना पाणी पाजून घ्यायचा.
आमचं घर बांधताना सुताराच्या मागे लागून आम्ही एक छोटीशी पालखी करुन घेतली होती. मुख्य पालखीच्या मागोमाग आमची छोटी पालखी असायची. तिलाही ओवाळणी व्हायची. काय भारी वाटायचं सांगू.. आणखीही एकदोन जणांच्या छोट्या पालख्या असायच्या पण पालखीत लाईट असणारी आमचीच पालखी.
आरत्या उरकल्या, गूळपाणी झालं की पालखी किंजळकरांच्या घरावरुन आरत्या घेत मार्गस्थ व्हायची. सुतारमारुतीजवळ सांधा बदलून एक मारुतीचं भजन दणक्यात व्हायचं. तोपर्यंत आम्ही गोपूचं दुकान यायची वाट बघतच असायचो. आमच्या छोट्या पालखीतला एखादा रुपया घेऊन भोईमंडळींची तहान भागवली जायची. जुन्या नाक्यावर चितळे मंडळींच्या घराजवळ दामूअण्णा, वसंतदादा हमखास खाऊ द्यायचे. तापल्या रस्त्यावरुन ही सगळी मिरवणूक जायची पण शिरस्त्याप्रमाणे प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी असल्याशिवाय हजेरी लावता येत नसल्यामुळे उन्हाचा तडाखा टोपी सोसायची. पाँवरहाऊसच्या चौकात थांबून नवं भजन व्हायचं, जाणारे येणारे दर्शन घ्यायचे.
पुढे उघड्या मारुतीवर पालखी पोचायची. पुन्हा एक मारुतीचं भजन आणि मग प-ह्यावरुन पालखी गोडशांची घरं घेऊन पुन्हा जोशी आळीत शिरायची. संपूर्ण गांवफेरी व्हायची आणि शेवटचं भजन रामाच्या देवळासमोर व्हायचं. पुढे पालखी दत्ताच्या देवळात विसावायची, रुपं सोडली जायची, जमा रक्कम, नारळ यांची गणती व्हायची. नारळांचा लिलाव होण्याआधी मानक-यांना नारळ दिला जायचा. लहान पालखीवाल्यांचा पण मान केला जायचा. गावातील कोणीतरी दुकानदार किंवा घरी कार्य योजलेला ग्रामस्थ नारळाचा लिलाव घ्यायचा. आम्हाला नारळ मिळाला की पालखी उचलून आम्ही सटकायचो. कारण त्यानंतर पुरुषानाना भागवतांकडे कैरीचं पन्हं असायचं. देणा-याच्या लक्षात न येता कोण किती भांडी पन्हं पितो याची सुप्त स्पर्धा असायची. घरी गेल्यावर जमलेल्या पैशाची वाटणी व्हायची, आमची रामनवमी इथेच संपायची. पण गावकीत दुसऱ्या दिवशी हरिजागर असायचा.
एके वर्षी विनायकदादांना उनं लागलं, ते चक्कर येऊन पडले आणि मग पुढच्या वर्षी एक ऐवजी साडेतीन वाजता पालखी निघू लागली, ती घरं वाढल्याने दिवस मावळता परत यायला लागली. काही वयस्कर मंडळी निजधामास गेली, त्यांची जागा बाकीच्यांनी घेतली. भजन सांगण्यात सदानंद जोशी, कल्याण भागवत पुढे आले. ढोलकीला सुधाकर, गिरी, शेखर ही मंडळी दिसू लागली. पण तरीही नोकरी उद्योगामुळे उपस्थिती रोडावू लागली. सुधीरकाकांनी घरचा वसा पुढे सुरु ठेवलाच होता. वामन, गिरी, मनीष यांच्या मदतीनं संध्याकाळी समारत्न सुरु झालं. कालौघात बैलगाडीसह शिवरामा गडप झाला आणि तिथे टाटामोबाईल आली, स्पीकरवर मकरंदबुवा रामदासींच्या आवाजात रामधून आली पण हौद्यात नगारा अजूनही टिकून आहे. शतकी परंपरा सांभाळत काही बदल स्विकारत आजवर रामनवमीची पालखी सुरु होती. ज्या भागवतांनी हे मंदीर ग्रामस्थांच्या हवाली केलं, त्यांच्या मृत्युपत्रानुसार हा उत्सव एक दिवसाचा न उरता तो प्रतिपदेपासून साजरा होऊ लागला. याच भागवतांच्या वंशजांनी म्हणजे माधव आणि मुकुंद भागवत यांनी राममंदिराचा जीर्णोद्धार स्वखर्चाने करुन देण्याची मनिषा व्यक्त करुन दीडदोन महिनेही उलटले नाहीयेत. पुढल्या उत्सवावेळी सभामंडपासह पूर्वाभिमुख मंदीरात उत्सव संपन्न होईल. जुन्या मंदिराची पालखी यावेळची अखेरची अशी आमची धारणा कोरोना संकटाने हाणून पाडली आणि आमच्या शतकी परंपरेत एक खंड पडला.
असो, रामेच्छा बलियसी।
आज घरात बसून रामनाम जप करणे हिच पालखी समजू आणि पुढील वर्षी दुप्पट उत्साहाने उत्सव साजरा करु.
मनाचीं शतें ऐकता दोष जाती।
मतीमंद ते साधनायोग्य होती।।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्ये आंगी।
म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी।।
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनोज भाटवडेकर
02.04.2020
वि.सू. फोटो २०१८च्या रामनवमीचे आहेत.
No comments:
Post a Comment