Wednesday, December 7, 2016

शेपटाचे केस






“हत्ती गेला, त्याचे शेपूटही गेलेय पण शेपटाचे केस अडकलेत,  प्लिज, येतोस का माझ्याबरोबर?” पलिकडून आदित्य विचारत होता.  “येतो”, म्हणून फोन ठेवला. आदित्यचं एक काम बरेच दिवस अडकलं होतं. कोयनेला जाताना मुंंढे फार्मच्या थोडॆ आधी, रस्त्याच्या बाजूला असलेल्या जाळीतून एका कुत्र्याचा आवाज आला.  खरंतर बोलण्याच्या नादात आमचं लक्ष नव्हतं पण कानांंनी आपले काम केलेच. हेल्मेटमुळे आदित्यला काहीच कळले नव्हते पण मला नेहमीपेक्षा जरा वेगळा आवाज वाटल्याने मी आदित्यला थांबवले आणि पुढे गेलेले आम्ही मागे आलो.  थोडीशी शोधाशोध केल्यावर डुकराच्या फासकीत अडकलेला कुत्रा नजरेस पडला.  आम्हाला पाहिल्यावर शेपटी हलवून त्याने प्रतिसाद दिला पण तो आम्हाला जवळ येऊ देईना.  कमरेजवळ मांसात गच्च रुतलेली केबल त्याला प्रचंड वेदना देत होती. असह्य वेदनेने जवळच्या झुडपांच्या फांद्या कडाकडा चावून टाकलेल्या दिसत होत्या.  जवळ जाणे धोक्याचे होते.  हातात साधन काहीच नव्हते.  अंगावरचे जर्कीन काढून त्याच्या तोंडावर टाकून तोंड पकडण्याचे प्रयत्न केले पण कुत्रा काही दाद देईना आणि फासकी पण काही सुटेना.  जाणारे येणारे थांबून आमचं काय चाललंय ते पाहात होते.  त्यातलेच दोघेजण मदतीला आले.  एका उत्साहीने त्याही परिस्थितीत कुत्र्याचे तोंड पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा त्याला प्रसादही मिळाला. स्थिती आणखीनच अवघड झाली. आदित्य हा डॉग ट्रेनर, पण तोही त्याला शांत नाही करु शकला.  जखमेच्या दुर्गंधीवरुन दोन तीन दिवस असहाय्य अवस्थेत तो कुत्रा अडकलेला कळत होता. तहानभूकेने व्याकूळ झालेला अन दमलेला कुत्रा, त्याला शांत करणं आवश्यक होतं.  काही अंतरावर असलेल्या एका चहाच्या टपरीवरुन मोठा ट्रे, पाणी, बिस्कीटं आणली.  पाणी भरुन ट्रे त्याच्यासमोर ठेवल्यावर तो भरपूर पाणी प्यायला, बिस्कीटे खाल्ली आणि अंगाची लाही कमी करण्यासाठी चक्क त्या ट्रे मधल्या पाण्यातच बसला.  कुत्रा थोडा शांत झाल्यावर केबल ज्या झाडाला गुंडाळलेली होती तिथपर्यंत पोचून ती सोडवता आली पण कुत्रा अंगाला हात लावू देईना.  कमरेतला फास सैल होत नव्हता, तो हातानेच सैल करायला हवा होता.  तळपत्या उन्हात शक्य नव्हतं म्हणून हातात फास धरुन त्याला आधी मोठ्या सावलीत नेले.  एव्हाना मदतीचे हातही वाढले होते.  सावलीत नेल्यावर त्याच्या तोंडावर गोणता टाकून सर्वानी त्याला गच्च दाबून धरले, मागच्या बाजूने मी आणि आदित्य दोघानी ती केबल पकडीच्या साहाय्याने तोडली.  हळूवार हातानी जखमेत घुसलेली केबल सोडवली.  उपचाराच्या दृष्टीने फार काही करणे त्या परिस्थितीत शक्य नव्हते.  तोंडावरचा गोणता बाजूला होताच गटारापलिकडे मोठी छलांग मारुन कुत्र्याने पलायन केले.  शेपटाचे केस सोडवायला निघालेले आम्ही एक जीव वाचवून पुढे रवाना झालो.
-- मनोज भाटवडेकर

फासकीतला बिबळ्या


“ मनोजदादा, विठलाई मंदीराजवळ फासकीमधे बिबळ्या अडकलाय, तू लगेच ये... माझा मित्र चिन्मय दिक्षितने फोनवर बातमी दिली.  केवळ 15-20 मिनिटांपूर्वी मी त्याच परिसरातून माझा मुलगा चि.अनुपसह पक्षीनिरीक्षण करुन परत असतानाच ही बातमी कळली.   गाडी बाजूला घेतली अन वनाधिकारी श्री. कोले याना फोन केला. ठिकाण समजावून सांगितले. बिबळ्याला फासकीमधून सोडवण्यासाठी आवश्यक ती संपूर्ण तयारी करण्यासाठी त्याना पुरेसा वेळ मिळणे आवश्यक होते.  फोन संपताच कच्च्या रस्त्याने गाडी भरधाव सोडली अन ठिकाण गाठले. चिन्मय वाट पाहतच होता. अर्धा डोंगर उतरुन आम्ही जागामालकाने केलेल्या भाजीच्या मळ्यात उतरलो. समोरच दिसणा-या चिपळूण शहरात उतरणा-या एका ओढ्याच्या काठी गच्च जाळीतून वर चढत येणारी रानवाट या मळ्यात येत होती. याच रानवाटेच्या शेजारी असणा-या खैराच्या झाडाखाली माजलेल्या वेलींच्या जाळीमधे बिबळ्या असल्याचे चिन्मयने सांगितले. संधीप्रकाशामुळे अन दाट जाळीमुळे बिबळ्या दिसत नव्हता पण आमची चाहूल लागल्याने बिबळ्याने केलेल्या गुरगुराटामुळे अंगावर शहारा आला. अर्थातच पुढे जाणे इष्ट नव्हते कारण फासकीत अडकलेला बिबळ्या अत्यंत घाबरलेला असतो अन जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करुन खूप दमलेलाही असतो. अशावेळी माणसं पाहून बिथरलेला बिबळ्या जोरदार प्रयत्न करतो आणि तणावाखाली येऊन जीव गमावून बसतो किंवा चुकून जर फासकी तुटली तर समोर येणा-यावर प्रतिहल्ला करतो. अशा घटना देशभर अनेकदा घडलेल्या आहेत. सबब पुढे जाणॆ टाळून त्याला सुरक्षितपणे कसे सोडवायचे यावरच भर देणे आवश्यक होते.  चिन्मय आणि मी त्यावर काम सुरु केले.  वाढता अंधार, जवळ साधनं नाहीत, प्रतिकूल जागा  अशा परिस्थितीत वनविभागाच्या सर्व हालचालींवरच आम्ही अवलंबून होतो.  सुदैवाने स्थानिक लोकं वा इतर कोणालाही ही बातमी न कळल्याने त्या सर्व परिसरात आम्ही दोघेच होतो, आणि ही बाब आमच्या पथ्यावर पडली कारण अशावेळी सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे बघ्यांची गर्दी आणि उत्साही स्वयंसेवकांची लुडबूड. त्याना आवर नाही घालता आला की दुर्घटना हमखास ठरलेली.  कोणालाही कळवायचे नाही यावर आम्हा दोघांचेही एकमत होतेच.  इतकेच नाही तर माझा मुलगा तिथेच थांबू इच्छित असूनही मी त्याला जबरदस्ती एका मित्राबरोबर घरी पाठवून दिले.  अंधार वाढत होता, अवघड जागा, नेहमीप्रमाणे पिंजरा लावून त्याला सोडवणे शक्य नाही या निष्कर्षावर मी आलो. बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देणॆ आणि मग सुटका करणे हाच एकमेव मार्ग दिसत होता. खेडच्या पशुधनविकास अधिकारी डॉ. विनया जंगले याना येता येता कोलेसाहेबानी फोन करुन सांगितल्यावरुन त्याही यायला निघाल्या.
सर्व साधनसामुग्रीची जमवाजमव करुन आम्ही त्या काळोखात मॅडमची वाट पाहत होतो. मधुनच बिबळ्याच्या हालचालीने झाडाची सळसळ होत होती. तणाव सर्वांच्याच हालचालीतून व्यक्त होत होता.  ब्लो पाईपमधून गुंगीच्या औषधाचे डार्ट मारुन बेशुद्ध करायचे आणि त्याची सुटका करायची असा प्लॅन ठरला खरा पण सभोवतालचा काळोख, उंचसखल भागात दगडगोटे पडलेले आणि प्लॅन फसला तर स्वत:चा बचाव कसा करायचा हाच अडचणीचा भाग त्यात होता. सोबत एक ब्लो पाईप आणि जादा डार्ट तयार करुन घेतले पण दुसरा डार्ट मारणार कोण या प्रश्नावर उत्तर नव्हते. चार वर्षापूर्वी मी वनविभागाच्या एका वर्कशॉपमधे माणिकडोह- जुन्नर येथील डॉ.अजय देशमुख यानी मला हे तंत्र शिकवले होते. आज त्याचा वापर करण्याची गरज निर्माण झाली होती. तुमच्या मार्गदर्शनाखाली मी नक्की करु शकेन असा मी विनयामॅडमना विश्वास दिला.  पिंजरा आधीच पुढे नेऊन ठेवला होता, त्याच्या आडोशाला उभे राहून विनयामॅडमनी पुन्हा एकदा बिबळ्याची उंची, वजन, औषधाचा डोस इ.ची खात्री केली. आम्ही सगळेजण श्वास रोखून धडधडत्या छातीने उभे होतो. नेम धरुन मॅडमनी डार्ट फेकला खरा पण त्याचवेळी बिबळ्याने हालचाल करुन तो चुकवला आणि काम खरंच किती अवघड आहे याची चुणुक मिळाली. सावध झालेल्या बिबळ्याला अधिक अवधी देणे म्हणजे जोखीम वाढवणे होते.  हललेला बिबळ्या मी उभा होतो त्या ठिकाणाहून जरा आडोशाला गेला होता. काम थोडे अवघड झाले होते. जोखीम नको म्हणून कोणालाच हलता येत नव्हते. आहे त्याच जागेवरुन थोडेसे बाजूला झाल्यावर मला बिबळ्याच्या मानेची मागची बाजू दिसली. आड येणा-या फांद्या बाजूला करताना मान वळवून त्याने ज्या भेदक नजरेने माझ्याकडे  पाहिले, त्याने काळजाचा थरकाप उडवला. आहे तसाच स्थिर उभा राहिल्यामुळे बिबळ्यानेही मान दुसरीकडॆ  वळवली. दीर्घ श्वास घेऊन त्याच क्षणी मी डार्ट मारला. बिबळ्या क्षणार्धात उसळला, दाताने डार्ट काढण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्याला कोणताही धोका नको म्हणून आम्ही सारे मागे आलो आणि तो बेशुद्ध होण्याची वाट पाहू लागलो. सुमारे 15 मिनीटानंतर त्याला पुरेशी भूल चढली आहे याची खात्री करुन केतन, मी आणि वनविभागाचे इतर कर्मचारी खाली उतरलो. कटरच्या साहाय्याने तार तोडून फास सैल केला. निपचिप पडलेल्या बिबळ्याला सपाट जागी आणल्यावर विनयामॅडमनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. कुठेही जखम नाही हे पाहून आम्ही निश्वास सोडला. दात, नखे, लिंग यांची तपासणी करुन त्या मादी बिबळ्याला पिंज-यात ठेवले. मंद लयीत तिचा श्वास सुरु होता. वनविभागाच्या कर्मचा-यानी तातडीने पिंजरा वरती आणून गाडीत भरला. एवढे सारे होईपर्यंत स्थानिक गावक-याना काहीही पत्ता नव्हता त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना आणि सर्वाना सुरक्षित ठेऊन आम्ही ही कामगिरी पार पाडू शकलो. पिंज-यासह गाडी निघणार तोच कोणाला तरी बातमी लागली आणि लोकांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. आम्ही त्वरा करुन गाडी हलवली आणि अवघड प्रसंग टळला. चिपळूणच्या वरिष्ठ वनाधिका-यांच्या उपस्थितीत पुन्हा तिची तपासणी झाली.  हळूहळू शुद्धीवर आलेल्या मादीला कोणतीही जखम नव्हती पण बराच काळ फास आवळून बसल्यामुळे आणि सुटकेसाठीच्या प्राणांतिक धडपडीमुळे तिला मागच्या पायावर उभे राहायला त्रास होत होता. स्थानिक पातळीवर उपचार शक्य नसल्याने माणिकडोह, जुन्नर येथील उपचार केंद्रात तिला नेण्याचा वनखात्याने निर्णय घेतला आणि अर्थातच योग्य होता. बिबळ्या हा मार्जारकुळातला प्राणी आहे, आणि अनेकदा मानसिक तणावाखाली येऊन उपचाराना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने उपचार करताना एकांतात ठेवले तरच बरे होण्याची शक्यता वाढते. रत्नागिरी जिल्ह्यात अशी कोणतीच सोय नसल्याने माणिकडोह, जुन्नर येथील उपचार केंद्र हाच तिच्यासाठी योग्य निर्णय होता.
स्थानिक वृत्तपत्रातून या कारवाईच्या बातम्या आल्या. अनेकानी फोन करुन माझे कौतुक केले.  पण खरं सांगायचे तर हे माझे एकट्याचे श्रेय नाही. ते टीमवर्क होते.  माझ्याबरोबर चिन्मय दिक्षीत, केतन मांजरेकर, प्रणव जोशी तिघेही सर्वकाळ होते. आरोही अध्यक्ष निलेश बापट होता. वनखात्याचे कर्मचारी उमेश आखाडे, रामदास खोत, मंत्री आणि इतरही  अनेक गार्ड होते. फॉरेस्टर महादेव पाटील, वनाधिकारी कोले या सा-या मंडळीनी खूप मेहनत घेताना नेमून दिलेली आपापली कामगिरी पार पाडली.   खेडच्या पशुधनविकास अधिकारी डॉ. विनया जंगले, या तर या सर्व कारवाईतील एक जबाबदार व्यक्ती होत्या.  किर्र अंधारात बिबळ्याला सामोरं जाणं म्हणजे खायचं काम नाही. मॅडमनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला त्यामुळे कोणत्याही दडपणाविना मी हे डार्ट मारु शकलो. मी आणि जंगले मॅडम दोघे लीड करत होतो आणि बाकीच्यानी त्याला पूर्णपणे साथ दिली.  थोडक्यात या प्रसंगात तिथे हजर असणा-या प्रत्येकाचे हे श्रेय आहे.  टीमवर्क ने काम केल्यास यश कसे सोपे याचा तो पाठ होता.
शुद्धीवर आलेल्या बिबळ्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून या मोहीमेची सांगता झाली

--- मनोज भाटवडेकर