काकू यावेळेला अंमळ जास्तच थकलेल्या वाटल्या.
"अरे उमरग्याचा उन्हाळा नाही सोसत," काकूनी बोलता बोलता उसासा टाकला..
सगळा भूतकाळ नजरेसमोर झरझर अवतरला.
पती असताना नेकीने संसार चालवलेल्या काकूंच्या नशिबी वृद्धाश्रम आला होता. पतीचे निधन झाले, पाठोपाठ कर्ता सवरता मुलगा अपघाती गेला. विधवा सुनेसाठी आणि नातवंडांसाठी काकू पुन्हा पदर बांधून उभ्या राहिल्या पण नातवंडं शिक्षणासाठी लांब गेली व कालांतराने सासूपेक्षा भाऊ जवळचा झाला आणि मग काकूंची होरपळ सुरु झाली. दुस-या मुलाकडे जागा लहान, प्रापंचिक अडचणी म्हणून तिस-याकडे राहील्या पण तिथे मुलाचा सासूरवास नशिबी आला. मन मारुन राहीलेल्या काकूनी अगदीच असह्य झाल्यावर गोंदवलं गाठलं. महाराजांच्या सेवेत आपलं आयुष्य व्यतीत करत काकूनी काही वर्ष काढली मात्र आता प्रकृतीने साथ देणे कमी केले त्यामुळे गोंदवलं सोडणे भाग पडले. कोणताच आधार उरला नाही. मानलेल्या नातेवाईकांकडे तरी किती काळ राहणार. अंतराने दूरवर असणारा भाऊ धावला आणि जवळच असणा-या उमरग्यामधे वृद्धाश्रमात काकू स्थिरावल्या.....
घराच्या खिडकीतून आलेल्या गरम झळेमुळे मी भानावर आलो. काकू खरंतर आमच्या ना नात्याच्या ना गोत्याच्या. माझ्या मामीची ओळख सांगून एके दिवशी आल्या. येण्याचा हेतू कळला नव्हता आणि तशी गरजही नव्हती पण निघताना म्हणाल्या की माझ्या मुलासाठी मुलगी पहायला म्हणून आले होते पण माझा मुलगा तुमच्या मुलीसमोर म्हणजे धिप्पाड सांडच जणू..... परंतु या अल्पशा ओळखीवर काकूंनी माझ्या बहिणीला कोयनेला तात्पुरती अशी नोकरी लावली. नोकरी लागल्यावर सुरवातीच्या काळात राहण्याची सोयही काकूनी न बोलता स्वतःच्या घरी केली. काकूंशी स्नेहबंध जुळले ते तेव्हापासून. त्यानंतर काकू येतच राहील्या. स्वतःला मुलगी नाही तेव्हा माझ्या बहिणीला त्यानी मुलगीच मानली होती. तिचं लग्न, सणवार, बाळंतपणावेळी काकू कायम मदतीला असायच्या......
आमच्याकडचा चार आठ दिवसाचा पाहूणचार संपवून काकू उमरग्याला निघाल्या. ती थकली भाकली पाठमोरी वामनमूर्ती पाहून मलाच गलबलून आलं. काकू परत दिसतील का? भेटतील का? दुखलं खुपलं तर इतक्या लांब उमरग्याला कोण जाणार?
काकूना मी थांबवलं. आपण इथेच तुमची सोय पाहू. परिस्थितीने गांजलेल्या अन निस्तेज झालेल्या त्या डोळ्यांत एक चमक आली. जामग्याच्या वृद्धाश्रमात सोय नाही झाली तरी तिथे देवरुखच्या वृद्धाश्रमाची माहिती मिळाली आणि काकूंची छान सोय झाली.
माणसं जोडायची वृत्ती, शिवणकला, वीणकाम या माध्यमातून अर्थार्जन करीत, मन रमवीत प्रचंड उत्साहाने काकू तिथेही सर्वाना आपलंसं करीत राहील्या. या सर्वांच्याच बळावर जराजर्जर करणा-या व्याधीना हसतमुखाने काकू सामो-या जात राहिल्या. शरीराने नव्वदी ओलांडली, मनाने परिस्थितीचे चटके सोसले, जवळच्यांचे आघातही सोसले.... दरम्यानच्या काळात दुसराही मुलगा निवर्तला पण हा आधारवड काळाशी दोन हात करत राहिल्या. काकू आताशा खूपच थकल्या पण डोळ्यात तीच चमक कायम होती. सतत उत्साह, परिस्थितीशी दोन हात करण्याची धमक मिळवायची असेल तर काकूंचे दर्शन घ्यावे. पण मन कितीही आंंतरिक ताकद देत असलं तरी शरीराची क्षमता संपत चालली होती. थकलेल्या शरीराने इतकं बंड पुकारलं होतं कि शेवटी मनानं पण हार पत्करली. इतरांना शांत अन नितळ प्रकाशाची सोबत करणारी ही आश्वासक ज्योत आज निमाली.........

स्व.काकूंना विनम्र श्रद्धांजली.....
-- मनोज भाटवडेकर