Thursday, November 30, 2017

भाऊकाका

Image result for बटाटा वडा
कुठल्याशा बसस्टॅंडवरचा प्रसंगएक गृहस्थ बरोबरच्या मुलाला विचारीत होते, “तुला वडा खायचाय? इथे छान मिळतोमुलाने मान डोलावताच दोघांच्याही समोर वड्याच्या प्लेट्स आल्या; आणि मुलाइतक्याच किंबहूना जास्तच तन्मयतेने त्या गृहस्थानी वड्यावर ताव मारायला सुरुवात केली. प्रसंग छोटासाच आणि अगदी कॉमन, पण त्याने मला सुमारे दोन तपे भूतकाळात नेले.भर दुपारची वेळ, रणरणत्या उन्हातून मी आणि माझे लाडके भाऊकाका, त्यांच्या आवडत्या कायनेटीक स्पार्कवरुन प्रवास करीत होतो. राजापूर मागे टाकून आम्ही पुढे आलो आणि यथेच्छ उसळणा-या एका धुळीच्या रस्त्यात थांबत काकांनी एक टपरी दाखवली अन नेमका हाच प्रश्न विचारला.....  मी हो म्हणताच गाडी टपरीच्या दारात उभी राहीलीमे महिन्यातले रणरणते उन, आणि झाडाची सावली औषधालाही नाही अशा ठिकाणी उतरत्या छपराची अतिशय खुजी इमारत, पडवीला पत्रा, वर केल्यास हात पंख्यात जाईल एवढीच उंची असलेल्या पडवीत बसून ऑर्डर सुटली–“दोन प्लेट वडा अन दही–“ मनू, इथे दही छान असतेमी फक्त हूंकार दिला. काकानी वडे येताच त्याचा आस्वाद आणि स्तुती एकदमच सुरु केले; आणि त्या खाण्यात इतके रमून गेले की वीज जाऊन डोक्यावरचा पंखा बंद झालाय, उन्हामुळे दह्याने आंबटपणाची परिसीमा गाठल्ये याची त्याना पर्वाच नव्हतीमित्रपरिवार, हास्यविनोद, वडे, भजी, सरबतं, आणि स्पार्कवरुन प्रवास ह्या एवढ्याच विश्वात रमणारा तो एक अवलिया होता.
मला काकांची आठवण आहे ती म्हणजे माझ्या लहानपणी ते मे महिन्यात सुटी असल्याने सिंधुदूर्गातून चिपळूणात आले होते तेव्हाचीबहूधा तीच माझी पहिली आठवण असावीएक चपटी काळी वस्तू, तिला चार-पाच बटणे, मधल्या काचेत दोन फिरती चक्र आणि चक्क त्यातून कुणाकुणाचे आवाज ऐकू यायचेमी आयुष्यात पाहिलेला तो पहिलावहिला टेपरेकॉर्डर होताकाकाना अशा वस्तूंचे प्रचंड वेड होतेत्या रेकॉर्डरवर मग काका गुपचूप रेकॉर्डिंग करायचेआजीचे बोलणे, कपबशा, कपडे धुतानाचे आवाज रेकॉर्ड व्हायचे आणि मग ते इतराना ऐकवायचे......  आजही कसं लख्ख आठवतंमाझ्या बाबांच्या लष्करी स्वभावापुढे काकांचे येणं मला जीव लावून गेले. त्यानंतर काका येत राहिले, वारंवार येत राहिले आणि मनोरंजनाचा, प्रेमाचा खजिना इथे रिता करुन जायचेखरेतर दोन्ही कुटुंबात सुसंवादापेक्षा विसंवादाच्या तारा अधिक छेडल्या गेलेल्या पण तरीही काकांचे प्रेम, जिव्हाळा त्या सर्वांपलिकडे जाऊन आम्हा भावंडांवर अखंड बरसतच राहिला. अनेक गोष्टी, किस्से, कथा सांगून समोरच्याला आपलासा करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होतीआमच्या घरातील वातावरणापेक्षा काकांचा सहवास जास्त हवाहवासा वाटायचा तो त्यामुळेच. उन्हाळ्याच्या सुटीत तर धमाल यायची. काकू आणि चुलत भावंडं चिपळूणला यायची, त्यामुळे काकाही जास्तीतजास्त काळ चिपळूण परिसरात असायचे. दुपारच्या वेळेत घंटा बडवत कुल्फिवाला यायचा, मग सगळ्याना काकांकडून कुल्फी मिळायची. कोणी नसेल तर त्याला हाक मारुन कुल्फी द्यायचेदुस-याला देण्यात काकाना विलक्षण आनंद मिळायचा. तसे काका तापटही होते, त्यांच्या स्वभावाची ही दुसरी बाजू कधीमधी समोर यायची पण ती तितकीच अल्पकालीन असायची जितका माध्यान्हीचा अचल भासणारा सूर्य...आम्हाला काकांचा राग यायचा तो एकाच वेळी. आम्ही कोणत्यातरी खेळात रमलेले असायचो आणि काहीतरी कारण काढून काकांची हाक यायची. अशावेळी एकदा का कुणी तावडीत गावला की मग काळ्या पाण्याची शिक्षा हातात भातगोटा घेऊन त्यांच्या डोक्याचे पांढरे केस उपटायला बसवायचे.एकतर खेळ टाकून यायला लागल्यामुळे राग धुमसत असायचा, त्यात भरीसभर नखाच्या पकडीत केस यायचे नाहीत म्हणून चीडचीड व्हायची. चुकून केस मिळालाच तर पांढ-याऐवजी काळा उपटला म्हणून काका भडकायचे की हातपाय आपटत आम्ही चालते व्हायचो.
मी वयाच्या बारा तेराव्या वर्षीच गाडी चालवायला लागलो आणि लवकरच काकाना ड्रायव्हिंगला एक रिलिव्हर मिळाला. रामपूर, माखजन दिशेला जाताना मी हमखास त्यांच्याबरोबर जायचो.“मनू, चल जरा इथेच जाऊन येऊ याअसं म्हणत कुसुमआत्याच्या खेडला जाणं व्हायचं. भाऊकाकानी आपल्या मुलांपेक्षाही काकणभर जास्त प्रेम आम्हा भावंडांवर केलंय. माझी मोठी बहीण पद्माताई पाठोपाठ त्यांचा माझ्यावर जास्त जीव होता.
भाऊकाकांच्या लहानपणी त्यानी सोसलेली गरीबी, काढलेल्या हालअपेष्टा, वडील गेल्यावर केलेले छोटेमोठे उद्योग यांचे किस्से अगणित वेळा ऐकलेले.  काका प्रेम करायचे ते जीव ओतून, पण त्यामुळे अपेक्षाभंग झाला की दु:, चीड पण पराकोटीची असायची. त्यामुळे एखादा प्रसंग, वाद होऊन 12-15 वर्षे उलटली तरी त्या व्यक्तीविषयीची चीड तितकीच तीव्र असायची.  त्यांच्या कामात कोणी लूडबूड करायला आले की जाम भडकायचे. पूर्वीच्या काळी व्हॉल्वचे रेडिओ असायचे. नीट ऐकू येईना झाले की त्याचे ट्यूनिंग करायला लागायचे आणि काकांचा तो आवडता उद्योग असायचाअसेच एकदा ट्यूनिंग करताना स्टूलावरुन उठून उभे राहून ते ट्यूनिंग करत होते, तिकडे काकूचे केर काढणे सुरु होते. वाटेत आलेले स्टूल बाजूला करुन केर काढून काकू निघून गेली आणि नंतर स्टूल आहे असे समजून काका काम आटपून बसले मात्र आणि मग अवघा हलकल्लोळ.... असेच एकदा पावसापूर्वी पडवीची कौले साफ़ करायला वर चढलेले काका वासा तुटून खाली पडले. उंची फार नव्हती पण मोठा आवाज ऐकून सगळे धावले. तोपर्यंत ते उठून बाहेर येत होते पण त्या अरुंद वाटेत एवढी माणसे होती की त्यांची वाट अडल्याने ते जे काही भडकले की विचारुन सोय नाही.
काकाना प्राण्यांचीही आवड खूप होती. कुत्रा, मांजर हे विशेष आवडीचे. त्यानी अनेक मांजरे पाळली. कुत्रा आणि मांजर याना एकाच ताटात जेवताना मी इथेच पाहिली. मांजराना जवळ घेऊन कुरवाळत असताना त्यांच्या शेपटीला काडेपेटी अडकवल्यावर मांजरानी घातलेले थैमान मी काकांच्या सोबतीने अनुभवले. काकांच्या कडे एक नाम्या नावाचा गावठी कुत्रा होता. पण इतका आज्ञाधारक कुत्रा मी कधीच पाहिला नव्हता. माझी आई, काकू प्राथमिक शिक्षिका, शाळेत जायला निघाल्या की हा त्याना एसटीस्टॅंडवर सोडायला जायचा. गाडीत पण बसायचा, लोकं ओरडायची तेव्हा मग काकूने युक्ती काढली. आधी दुस-याच गाडीत बसायचे, नाम्या सीटखाली बसला की आपण उतरायचे आणि आपल्या गाडीत जाऊन बसायचे. काकू दिसली नाही की मग यायचा नाम्या घरी.

काकाना प्रवासाची प्रचंड आवड. अर्ध्याहून अधिक आयुष्य गाडीवर बसून काढलेले, त्यामुळे अंतरे, लागणारा वेळ याबाबतीत ते अधिकारवाणीने बोलायचे. त्यामुळे त्याना अंतरात एक किलोमीटरचाही फरक चालायचा नाही. काकाना मूळव्याधीचा त्रास होता पण ऑपरेशनची भिती. परत गाडी चालवता नाही आली तर? या भितीने त्यानी कितीतरी वर्षे त्रास सहन केलागणपती, नवरात्र, दिवाळी असे सण आले की त्यांच्या लाडक्या स्पार्क गाडीवर जिथेजिथे जागा मिळेल तिथेतिथे उदबत्त्यांची खोकी अडकवून ते गावोगाव उदबत्त्या विकत सिंधुदूर्गात जायचे, मित्रपरिवार, गोतावळ्यात रमायचे अन परत येऊन मुंबईहून माल आणण्याचा त्यांचा उद्योग अनेक वर्षे अव्याहतपणे सुरु होता. खूपदा तर मला असे वाटायचे की काका उदबत्त्या विकूनच उदरनिर्वाह करतात अन काकू नोकरी करते.
काळ पुढे सरकत होता, माझ्या तीनही बहिणींची लग्ने झाली. अल्पावधीत माझेही लग्न ठरलेकाकाना कळले, स्वारी एकदम खूष. अमृताची गाठ पडल्यावर तर त्यानी मला हळूच येऊन सांगितले होते, “मनू, सूनबाई झकास आहे हो!” माझ्या लग्नानंतर अमृताचे या घराबरोबर काकांशीही उत्तम सूर जुळले. तिने केलेल्या पदार्थांची चव घेतल्यावरझकासअशी पावती देऊन जायचे. अमृताही आठवणीने त्यांच्यासाठी कधी काही राखून ठेवायची त्याचे त्याना कोण अप्रूप असायचे. अमृताच्या पहिल्या गरोदरपणात तिला कडक डोहाळे होते. तिखट खायला धावायची, पण जराही सहन व्हायचं नाही. खाल्लं की खूप उलट्या व्हायच्या... वडापाव म्हणजे जीव की प्राण. नुसत्या आठवणीने ती कसनुशी व्हायची पण डॉक़्टरांची सक्त तंबी होती.  मग काका ह्ळूच काण्यांकडून वडा आणायचे आणि तिला बोलावून गप्पा मारताना थोडा थोडा द्यायचे.
राजेरजवाड्यांसमोर जसे हत्ती घोडे झुलतात तसे काकांच्या घरासमोर किमान दोनतीन दुचाक्या झुलत असायच्या. माझा व्यवसाय गाडी दुरुस्तीचाच असल्याने स्वत:चे प्रयोग गाडीवर करुन बघायला काकांनाही बळ यायचे. सक़ाळ झाली की दैनंदिन कार्यक्रम म्हणून गाडीच्या पुढ्यात जुना गोणता टाकून कोणतातरी पार्ट खोलून ठेवायचे अन प्रकरण हाताबाहेर गेले की त्यांची परिचीत हाक यायचीमनू
काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. दोन्ही कुटुंबातील विसंवादी सूर मधेच डोके वर काढायचे, अबोला व्हायचा पण काकाना चैन पडायचे नाही. काहीतरी कारण काढून ते पुन्हा माझ्याशी सूर जुळवून राहायचे. असं असूनही काही सुटणारी कोडी दोन्ही बाजूनी तशीच अनुत्तरीत राहीलीआमचे जूने घर, वाढता संसार त्यामुळे आहे ते घर अपुरे पडायचे. तशातच संधी चालून आली अन मी घराजवळच पण थोडेसे दूर जागा विकत घेतलीभाऊकाकाना एके रात्री कळले. सकाळ होईपर्यंत त्याना धीर धीरवला नाहीसकाळ होताच मोर्चा दारावर धडकला, “मनू, तू जागा विकत घेतलीस? मला सोडून जाणार? बोलतानाच त्यांचा आवाज भरुन आला. “आपण आपल्यातले वाद समजूतीने सोडवू. तू म्हणशील ते मला मान्य, पण मला टाकून, माझ्यापासून दूर नको जाऊसअसे म्हणणारे काका बघून मलाच गलबलले. वर्षानुवर्षे शेजारी राहून, समजूतीने घ्यायचा प्रयत्न करुनही विसंवादी सूर काही केल्या हटत नव्हताया सा-याचा विपरीत परिणाम नातेसंबंधांवर होत होता. त्यामुळे थोडेसे दूर पण हाकेच्या अंतरावर राहून तरी हा सूर बदलतो का ते तरी पहावे असा माझा प्रयत्न होता, पण काकांची ती कावरीबावरी मुद्रा पाहून क्षणभर मलाही दोलायमान व्हायला झाले. अवघड प्रसंगातून सुटका करुन घेण्यासाठी मी काकांशी खोटं बोललो,” अहो, स्वस्तात जागा मिळत्ये, गुंतवणूक म्हणून घेऊन ठेवतोय”. पुढे थोडक्याच अवधीत नवीन घराचे काम सुरु झाले. काका साईटवर मधूनमधून येऊन जायचे, पण त्यानी मला माझ्या खोटे बोलण्याची कधीही आठवण करुन दिली नाही. सुमारे दोन वर्षात नवीन घरात राहायला जायची वेळ आली. गृहप्रवेशाच्या दिवशी काका हौसेने सर्वत्र वावरले. संध्याकाळी आपल्या घरी जायची वेळ आली तर त्यांचा पाय निघेना. भिंतीला टेकून ते हमसून रडू लागले. शुभप्रसंगी त्यांच्या डोळ्यातील अश्रू काहीना अचंबित करुन गेले तर काहीना ते अशुभ वाटले. कोणाकोणाला कायकाय वाटले, पण अश्रुभरले डोळे माझ्याकडे बघत मला मूकपणे सांगत होतेमनू, तू खोटं बोललास, शेवटी माझ्यापासून दूर गेलासच”. आणि हे फक्त मला अन त्यानाच कळत होतेकाहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमवावे लागते. दोन्ही कुटुंबातली मोठी माणसे आता वृद्धत्वाकडे झुकू लागली होती. सर्वाना सुख, शांतता लाभण्यासाठी मला माझ्या प्रिय अशा काकांचा शेजार, आधार गमवावा लागणार होता, पण त्याला नाईलाज होता. काकांचा शेजार गमावला तरी बाकी कोणताच नातेबंध आपण गमावणार नाहियोत असे सांगून मी त्यांचे डोळे पुसलेरोज सक़ाळी ऑफिसला जाताना मी जुन्या घरावरुनच जात राहिलो, कधी हॉर्न वाजवून, तर कधी थांबून भर रस्त्यात उभे राहून त्यांच्याशी गप्पा, खुशाली घेत राहीलो. पण शेवटपर्यंत त्यांच्या डोळ्यातील ती व्यथा अन हृदयातील सल निघाला असे कधी वाटलेच नाहीत्यातच नियतीने डाव साधला अन या मानसिक व्यथेबरोबरच स्नायूदौर्बल्याची  शारीरीक व्याधी मागे लावून दिलीया दुर्मिळ व्याधीवर उपचारांच्या मर्यादेने त्यांच्या जीवनरेषेची निश्चिती केली अन रात्री 8 वाजेपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारुन घरी गेल्यावर मध्यरात्री सोबतीस कोणीही नसताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “मला सोडून जाणार?” असा प्रश्न विचारणारे स्वत: मला सोडून गेले.त्याना झालेली व्याधी, त्यातील अपरिहार्यता, उपचारमर्यादा लक्षात घेता नियतीने त्याना आमच्यापासून दूर नेऊन त्यांचा त्रास कमीच केला, या एकमेव विचाराने अन दु:खद समाधानाने डोळ्यातले अश्रू पापणीआड दडवून टाकले.
गेल्या काही वर्षांच्या या कालखंडात काकांचे स्मरण वारंवार होत राहीलेकाका आपल्यात नाहीयेत याचे अनेकदा विस्मरण व्हायचे,कधी भास व्हायचा की काका हाक मारताहेतमनूSSS तर कधी गाडीवरून देवगडच्या रस्त्याला जाताना वाटायचे की मागून आता काका सांगतील भजी, वडा कुठे चांगला मिळतो ते !!
काकांच्या आठवणींचा डोंगर मनामधे आहे, तो व्यक्त करण्याबरोबरच तो चिरकाल जपणे मला सर्वार्थाने मोलाचे वाटते. कै.ति.भाऊकाकांना माझी शब्दसुमनांजली.