Thursday, December 21, 2017

कुलधरा - एक शापित नगर

कुलधरा -  एक शापित नगर

भारतात गूढ आणि अगम्य कथाकहाण्यांना तुटवडा नाही.  अशा कहाण्यांमधे गुरफटलेली अनेक ठिकाणं पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असली तरी त्यांच्या भोवतालच्या रहस्यमय कहाण्यांवरचा पडदा अजूनही कायम आहे.
राजस्थानमधील जैसलमेर नजीक कुलधरा नावाचे गांव अशाच रहस्यमय कथा ऐकवतं... जैसलमेरपासून फक्त 18 किमी अंतरावर या प्राचीन नगराच्या हद्दीवरचे फाटक ओलांडून आपण आत शिरलो की गूढ वातावरणाने भारलेला प्रदेश सुरु होतो..... आणि समोर येते ती 13 व्या शतकात वसवलेल्या एक संपन्न शहराची वाताहात....
पालीवाल ब्राह्मणांनी एक उत्तम नियोजन करुन वसवलेले हे नगर एकेकाळी अतिशय संपन्न होते.  मातीपरिक्षणात पारंगत असणा-या या पालिवाल ब्राह्मण समुदायाने इथली जिप्समची माती पारखली. पावसाचे पाणी खोलवर जिरु न देण्याचा मातीचा गुणधर्म लक्षात घेऊन ब्राह्मण असूनही मोठ्या प्रमाणावर शेती आणि पशुपालन सुरु केले आणि जमिनीत अक्षरश: सोनं पिकवलं. वाळवंटात शेती हीच मुळी त्या काळात एक अद्भूत कल्पना होती.  कुशाग्र बुद्धी, कौशल्य आणि अथक परिश्रमानी तो परिसर एक नंदनवन बनवला.  आपल्या बुद्धीच्या जोरावर वाळवंटाचे रुपडंच पालटवलं.  जिप्समच्या थरावर जमणारे पाणी नगराच्या एका विशिष्ठ ठिकाणी जमवण्यात हा समुदाय यशस्वी झाला.
13 व्या शतकात हे नगर वसवताना देखील नगररचना शास्त्राचा पुरेपूर वापर करुन दगडविटांच्या इमारतींची बांधणी अशा विशिष्ठ कोनात केली की वारा घरातून आरपार जाताना घरं थंड राहतील हे पाहीले गेले... उभ्याआडव्या रस्तांनी प्रत्येक घर जोडलं गेलं.. नगराच्या मध्यभागी सुंदर मंदीर, समोर पुजा-याचे निवासस्थान, मंदीराच्या एका हाताला नगराचा मुख्य चौक आणि प्रशासकीय इमारत. मंदीराच्या दुस-या हाताला मुख्य रस्त्याला सन्मुख गावप्रमुखाचा वाडा. नगराच्या मुख्य चौकात नगरवासियांची सभा होईल एवढा मोकळा परिसर.  अशा पद्धतीने आसपासच्या परिसरात एकंदर 84 नगरं वसवली गेली आणि त्यापैकी एक मुख्य नगर म्हणजे कुलधरा... सुमारे 600 उंबरठ्याचे हे नगर कोणाच्या डोळ्यात खुपलं नाही तरच नवल...
भरभराटीला आलेल्या शहराला नजर लागली ती तत्कालिन राजाचा दिवाण सालम सिंग याची.  गावच्या मंदीराच्या पुजा-याची मुलगी बेहद रुपवान आणि देखणी होती. तलावावर पाणी भरायला गेलेल्या मुलीला सालमसिंगाने पाहिले. तिच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या सालमसिंगाने कोणत्याही परिस्थितीत तिला प्राप्त करण्याचा विडाच उचलला. त्याने गावक-यांसमोर तिच्याशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. गावकरी शरण यावेत म्हणून त्याने कर वाढवले, मनमानी सुरु केली. विवाहास मान्यता मिळाल्यास अभय देण्याचीही लालूचही दाखवली.  मुलगी 16 वर्षांची ब्राह्मण आणि दिवाण 60 वर्षाचा राजपूत... पेचात पकडलेल्या गावक-यांना निर्णय घेण्यासाठी सालमसिंगाने नजिकच्या पौर्णिमेची अंतिम मुदत दिली, अन्यथा गावावर हल्ला करुन मुलगी बळजबरीने पळवून नेणार असा निरोप दिला.  गावक-यांसाठी हा कसोटीचा क्षण होता... जातीबाह्य विवाहाला मान्यता देऊन गाव वाचवायचं किंवा मुलीचं रक्षण करायचं.  आसपासच्या 84 गावातल्या मुख्य गावक-यांच्या सभेत कोणत्याही परिस्थितीत आपण मुलीचं रक्षण करायचं, तिला सालमसिंगाच्या हाती लागू द्यायचं नाही असा दृढ निश्चय झाला. सालमसिंगाच्या बळाला पुरे पडू शकणार नाही हे लक्षात घेऊन  रातोरात नेसत्या वस्त्रानिशी 84 गावांचा समुदाय परिसर सोडून निघाला. ज्या वृद्ध मंडळींना शक्य नव्हतं त्यांनी तिथेच आपले प्राण सोडले. त्यांचे अंत्यसंस्कारही होऊ शकले नाही.  सर्वस्व त्यागून देशोधडीस जावं लागलेल्या त्यांच्या प्रमुखाने गावाच्या वेशीवर “या नगरात कोणाचाही वंश टिकणार नाही” अशी भयंकर शापवाणी उच्चारली आणि एका रात्रीत सारी नगरं निर्मनुष्य झाली.  सालमसिंगापर्यंत ही खबर जाईपर्यंत सर्व नागरीक दूरवर पोचले होते. घाईगडबडीने धाव घेतलेल्या सालमसिंगाला सामना करावा लागला तो भीषण शांततेचा अन मागे राहिलेल्या कलेवरांचा.  हबकलेला सालमसिंग त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे धारिष्ट्य दाखवू शकला नाही. ही खबर जैसलमेरच्या राजापर्यंत गेली.  आपल्या दिवाणाच्या कृत्याने व्यथित झालेल्या राजाने या ब्राह्मण समुदायाचा माग काढला.  जो समुदाय त्याला भेटला त्यांच्याजवळ त्याने क्षमायाचना केली पण तोपर्यंत उशीर झाला.  ती 84 गावं विखुरलेल्या स्वरुपात दूरदूर निघून गेली होती.
सुमारे दोनशेहून अधिक वर्ष ती गावं ओसाड राहीली.. कालौघात वाडे, घरं ढासळू लागली. पण शापवाणीचं भय टिकून असल्याने आजवर तिथे कोणीही वसू शकलं नाही. एक संपन्न आणि हसतखेळतं नगर नि:शब्द झालं... त्याचे रुपांतर एका ओसाड आणि शापित नगरात झालं.  आजही काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तिथे फिरताना आपल्यासोबत कोणीतरी आहे असा भास होतो. काही पर्यटकांना एकाच वेळी भीषण शांतता तर लगेचच वर्दळीचा भास होतो. कोणीतरी हळू आवाजात बोलतंय किंवा पैंजणांचा हलकासा आवाज कुलधराबाबतच्या रहस्यांना आणखी भितिदायक बनवतो. काही स्थानिकांनी मोकळ्या जागा पाहून तिथे राहायचा प्रयत्न केला पण ते असफल झाले. काही कुटुंब हट्टाने राहीली पण त्यांचे पुढे काय झाले ते कोणालाच कळले नाही. स्थानिक प्रशासनाने घातलेले फाटक ओलांडून पर्यटक दिवसा तिथे येतात पण सुर्यास्तानंतर थांबायचे धाडस आजही कोणाचे होत नाही. नेसत्या वस्त्रानिशी गांव सोडून गेल्यामुळे पालिवाल ब्राह्मणांची संपत्ती तिथेच राहीली. ज्यांनी ज्यांनी तिच्यावर डल्ला मारला, त्यांच्या संपूर्ण घराण्याची दुर्दशा झाली. अजूनही संपत्तीच्या लालसेने काहीजण तिथे उकराउकरी करुन पाहतात.
मे 2013 मधे पॅरानॉर्मल सोसायटी, दिल्ली तर्फे तिथे काही संशोधनाचे प्रयत्न झाले. हिम्मत करुन त्यापैकी काहीजणांनी तिथे रात्री वस्ती केली पण त्यांनाही काही अतर्क्य असे अनुभव आले. रात्री फिरताना खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याची जाणीव झाल्यावर मागे पाहिले तर कोणीच नव्हते. सकाळी त्यांच्या गाडीच्या काचेवर लहान मुलांचे ठसे आढळून आले. एकंदरीतच कुलधराबाबतचे रहस्य उलघडण्याऐवजी ते आणखीच गूढ झाले.

राजस्थान सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी कुलधरा गावातील देऊळ, पुजा-याचं घर, आणि मुख्य गावक-याचं घर पुन:श्च बांधून उभं केलंय.... बाकी सगळं ओसाड आणि ढासळलेलं........