ब-याच दिवसात रघुवीर घाटात गेलं नाही की मनावर
मळभ दाटू लागतं.... अशावेळी उठायचं आणि चालू पडायचं हा माझा खाक्या.... पाऊस
म्हणावा तसा सुरु झालेला नसल्याने उन्हाळा आणि पावसाळा या दोहोंच्या मध्यावर हा
प्रदेश आणखीनच वेगळा भासतो.... तळकोकणात पाऊस कमी असला तरी पर्वतमाथ्यावर ढग, धुकं, वारा आणि भुरभुरता पाऊस यांचंच
साम्राज्य असतं.... पडलेल्या थोड्याफार पावसानं छोटे नाले प्रवाहीत होतात आणि
कड्यावरुन स्वतःला खोल दरीत झोकून देतात....
दरवेळी नवा भिडू आणि नवीन वाहन हा आता पायंडाच
पडलाय... यावेळी चिन्मय दिक्षित, मी आणि बुलेट असं काँबिनेशन
होतं.. त्यामुळे हा इव्हेंट भन्नाटच असणार होता... चिन्मय सोबत असताना पहिल्या दोन
मिनिटात कोणी खदखदून हसला नाही हे संभवतच नाही...
सकाळी सात वाजता चिपळूण सोडलं आणि मेली ठेचेवर
ठेच सुरु झाली... परशुरामच्या शिवसागरला नाश्ता करायचं ठरलेलं होतं तर तिथे जाऊन
हाँटेलचं शटर वर करायला पहिले आम्हीच... पटवर्धन लोट्यातल्या शिवसागरला अगम्य
भाषेत पाच मिनिटे लागतील असं कळलं म्हणून थांबलो तर पाच मिनिटांनी फक्त चहा मिळेल एवढंच कळलं....
उतरवलेली सगळी अवजारं चढवून आम्ही चालते झालो... रघुवीर घाटमाथ्यावर भोसलेंचं छान
हाँटेल आहे पण तिथवर दम निघणार नाही म्हणून पायथ्याला खोपी गावात पोटपूजा केली...
पोटपूजेत त्याने इतक्या प्रेमाने मिरच्या घातल्या होत्या की आजच्या दिवसभराच्या
कष्टांपेक्षाही उद्यांचे हाल नजरेसमोर तरळले... गावात सगळ्या गाईम्हशी तूर्तास
गाभण असल्याने कोरा आणि बिनसाखरेच्या चहाने नरड्याची शुद्धी केली.... घाटमाथ्यावर
गेल्यावर ढग आणि उन्हं यांचा खेळ बघत थोडंफार फोटोसेशन झालं.... घाटमाथ्यावरुन
पुढे निघालो तेव्हा बुलेटचं हँडल माझ्या हाती होतं.... साडेतीनशेचं ते धूड फदफद
करत घाटातून चालवायला जाम मजा येते.. माथा पार करुन पलिकडे गेलो आणि भुस्सा पाऊस
सुरु झाला... महिमानगडाची वाट सोडून सपाटीवर आलो आणि चिखलाचं खरं संकट समोर आलं...
साधारणपणे चाळीस पन्नास फुटाचं चिखलाचं डबकं ओलांडताना घाम फुटला... भिती पडण्याची
नव्हती तर पडली तर त्या चिखलात बुलेट उभी करणं हे दिव्य होतं... कोकणासारखीच इकडची
पण माती मुरमाची त्यामुळे जिथे चिखल नाही तिथे जमीन इतकी चिकचिकीत होते की माणूस
उभ्या उभ्या पडतो, तिथे गाडीची काय कथा.... तेव्हा आपला चिखलच बरा असं म्हणत चरीत गाडी
घातली... फोटो सेशन करायचं आणि सेफ साईड म्हणून चिन्मय आधीच उतरला होता, त्याला मागच्या चाकानं चिखलाचं प्रोक्षण केलं... एक डबकं पार केलं कि
दुसरं हा खेळ इतका अव्याहतपणे चालला की पाच किमीसाठी आम्ही पाऊण तास खर्च केला...
शिंदी वळवण पार केल्यावर मात्र खडीच्या रस्त्याने आम्हांला हात दिला...
वळवणच्या बाहेरचं हिरवंगार माळरान पाहून फोटोंची इच्छा झाली नसती तरच नवल... हलक्या उन्हाने ते कोवळं गवत चमकत होतं. नवी मोरणी, आरव, महाळुंगे मागे टाकून आम्ही शिंदी आणि कांदाटी
नदीच्या संगमावर आलो... रस्ता खूपच उंचावर असल्याने खूप दूरपर्यंतचं विहंगम दृश्य
दिसतं. इथे वनविभागाने एक कुटी उभारली आहे ...... पावसाने जोर धरला आणि सगळा
कँनव्हास स्वतःमधे लपेटून घेतला. टप्पो-या थेंबांचा मारा सोसत उचाटला आलो...
कांदाटी खो-यातल्या उचाट ते लामज गावादरम्यान रस्त्यावर डांबर पडली आहे.... आधी
कांदाटला जाऊन निरिपजीचं दर्शन घेऊन नंतर पोटपूजेचं बघू असं म्हणत उचाटमधून
डावीकडे वळलो... साधारणपणे पाचेक मैलावर आपण पुन्हा कोकणाकड्यावर येतो... समोरच
कोकणात उतरणारी पायवाट " कधीतरी या बाजूने पण ट्रेक करा" असं निमंत्रण देत
असते... जावळीच्या मो-यांचे भाऊ गोविंदराव मो-यांचा 3600 एकराचा
हा इनामी भाग राखायला त्यांचा भग्न वाडा आणि निरिपजी देवी एवढीच इथली वस्ती...
मंदीराच्या आसपासची देवराई इतकी गच्च आहे की पावसाळ्यामधे आतला अंधार वातावरण
भारुन टाकतो. डोंगरमाथ्यावरून आत सरकलं की ठिकठिकाणी पाच सात घरांचा समूह
वस्तीच्या खुणा जपताना दिसतो. उचाटला परत आल्यावर दुपारच्या जेवणासाठी नेहमीच्या ठिकाणी आम्ही नन्नाचा
पाढा वाचला... शेतीकामाला माणसं गेल्यावर आम्हाला भाकरी कोण देणार? भुकेल्या पोटानं पुढे निघालो तर एक गाववाले सामोरे आले...
"गाववाल्यानू कोन भाकरी बेसन करुन द्येल काय?" परवलीचा
प्रश्न टाकला... "किती मान्सा हैत? दोनच?" आम्ही हो म्हटल्यावर चला फुडं आलोच... शिरपत जंगमांच्या घरी माऊलीनं
आमच्यासाठी भाकरी, आकुराची भाजी, भात
आमटी केली... फेण्या तळल्या... आकूराची रानभाजी कांदा घालून इतकी अप्रतिम लागते की
एक भाकरी जास्तच पोटात गेली. जेवणावर आडवा हात मारुन आत्माराम तृप्त
झाला.... जेवण होईपर्यंत अर्थातच "पावनं कंच्या गावचं" विचारत
आलेल्यांबरोबरच्या गप्पा आमच्या माहितीत भर टाकत होत्या.
जडावलेले डोळे चोळत पुढची धरली....
लामजपर्यंतचा डांबरी रस्ता केव्हाच संपला आणि पुन्हा आमची चिखलवारी सुरु झाली...
पुढे ती आणखीनच बिकट होत गेली कारण आता त्यात चढ उतार आणि सुटे दगडगोटे यांची भर
पडली होती आणि दस्तुरखुद्द चिन्मयजी गाडी चालवत होते... मागे बसून गाडी चालवायचा
आनंद मिळत नाही आणि कायम असुरक्षितपणा या कारणाने मी सहसा मागे बसत नाही... पण
बच्चा नाराज नको म्हणून मी मागे बसलो...... एखाद्याच्या मागे बसणं किती अवघड आहे हे दोनदा गाडी
धडपडवून चिन्मयने दाखवून दिलंच पण तिस-या वेळी तो वज्रलेप झाला... अकल्पे गावाजवळ
चिखलातून जाताना अचानकपणे गाडी थांबवल्याने पाय टेकावे लागले आणि त्या चिखलाच्या रबरबाटात ग्रीप
न मिळाल्याने आमच्या वकीलसाहेबांनी गाडीसह लोटांगण घातलं... मी आधीच उतरल्यामुळे
सेफ होतो. ब्रेक पँडलमधे रेनकोट अडकल्याने उजवा पाय लाँक, डावा पाय चिखलाने बरबटल्यामुळे अस्थिर
झालेला त्यामुळे बुलेट डाव्या कुशीवर कलंडलेली अशा अलौकीक अवस्थेत चिन्मयमहाराज
आणि वरुन पावसाचा मारा... कोण कोणाच्या आधारावर टिकून आहे हेच कळत नव्हतं...
दोघांचीही हसून हसून मुरकुंडी वळली... गाडी उचलावी तर एकट्याला शक्य नाही आणि पाय
अडकलेला म्हणून चिन्मय हाताशी नाही.. आपापल्या घरांच्या वळचणीला उभं राहून गावकरी आमची मजा
बघत होते... अखेरीस पोटभर हसून झाल्यावर सगळं निस्तरलं आणि दरमजल करीत पिंपरी आणि
दरे गावाच्या मधे एका टेकडीवर आलो. इथून शिंदी, कांदाटी आणि
महाबळेश्वर कडून येणारी कोयना यांचा त्रिवेणी संगम दिसतो... इतका वेळ चाललेला
प्रवास हा इतर खो-यांमधलाच प्रवास होता... इथून तो कोयना नदीच्या काठाने सुरु
होतो. दरमजल करत दरे गाव गाठलं... मागच्या खेपी आलो होतो तेव्हा प्रतापगडाकडून
आहीर गावापर्यंत आलेला डांबरी रस्ता आता आणखी 18 किमी पुढे
दरे गावापर्यंत झालाय... आँफरोडींग इथे संपतं पण घरी परतायला प्रतापगडाला वळसा
मारुन पोलादपूर मार्गे येण्यासाठी अजून 150 किमी अंतर
कापायचं होतं... गाढीवली गावातून शिरुन बोटीच्या धक्क्यावरुन तापोळ्याचा परिसर बघितला आणि पुन्हा प्रतापगडाच्या वाटेला लागलो. पण डांबरी रस्त्याचा आनंद फार वेळ
नाही टिकला... पहिल्या पावसाने डोंगर उतारावरुन वाहून आणलेली माती रस्ताभर पसरुन
आमची वाटचाल धीमी करीत होती... जोडीला पाण्याची डबकी होतीच.. जमेची बाजू इतकीच
होती की तळाला डांबरी रस्ता असल्याने पडायची भिती कमी होती.... अहीर नंतर वाळणे
गावात चहा पिऊ हा ही आमचा बेत फुकट गेला कारण तिथेही नेहमीचे दुकानदार शेतीकामात
व्यस्त होते... पावसाचे पाणी आतवर झिरपल्याने आता हुडहुडी भरली होती पण त्यावर
पुढे जात राहाणे एवढाच उपाय होता.... मागे बसून पार्श्वभागी आलेले कढ घालवायला मी
पुन्हा ड्रायव्हींग सुरु केलं.... बुलेटची मागची सीट म्हणजे पुढच्या सीटच्या एकदम
विरुद्ध.... कोणाची मोजमापं घेऊन केलेली कोणास ठाऊक पण अरुंद आणि दडदडीत...
थोडक्यात ‘मागच्या”चे हाल.... पाऊस आणि चिखल प्रकरणात खूप वेळ गेलाय हे
लक्षात आले होते त्यात पावसाने पुन्हा जोर धरला... काळोख दाटायला लागला.... आज
वेळेचं गणित पार विस्कटून गेलंय आणि पोचायला किती वाजतील ह्याचा काहीही नेम
नव्हता... चिपळूणला दिवसभर जोरदार पाऊस होतोय अशी वार्ता बायकोने आधीच दिली
होती... याआधीच्या सगळ्या ट्रीपमधे साडेआठपर्यंत मी घरी
पोचलो होतो पण आज साडेआठ वाजून गेले तरी आम्ही प्रतापगडाच्या जवळपास पण नव्हतो....
काळोखातून आवळण, गावढोशी, रुळे, रेणोशी, शिरनार गावांचे दिवे एकामागोमाग
काजव्याप्रमाणे चमकून जात होते... दाभेमोहन गावात तिठ्ठ्यावर एका बॅटरीधारीने
थांबवली... मिट्टं काळोखात चारपाचजणं महाबळेश्वरहून वाळणे गावात येणा-या एस्टीची
वाट बघत होते.. शिरनारहून चतुरबेटकडची बाजू दिसते... ही दोन्ही गावं उंचावर आहेत
तर दाभेमोहन तळात आहे... आम्हाला गाडीचे दिवे दिसले काय हे त्यांना जाणून घ्यायचं
होतं... आम्हाला काहीच दिसलेले नसल्याने त्यांची निराशा झाली.. नेहमीची गाडी अजून
आलेली नाही.. दरड कोसळून रस्ता बंद नाही ना झालेला? मनात प्रश्नचिन्ह घोंगावू लागलं
पण देखा जायेगा अशा विचाराने मार्गक्रमणा सुरु ठेवली. शेवटी एकदाचं चतुरबेट आलं...
शिवसागर जलाशयाचा फुगवटा इथपर्यंत पोचतो... कोयना नदी पार केल्यावर बीरवाडीवरुन
पारगावाच्या आधी उजवीकडचा रस्ता धरला की घनदाट किर्र जंगलातून वाडा कुंभरोशीला आपण
प्रतापगडाच्या दुस-या अंगाला हमरस्त्यावर येऊन पोचतो... आम्हाला इथे पोचायला नऊ
वाजले... जोराचा पाऊस, आणि वारा यांनी आम्हाला पार गारठवून टाकलं... रेनकोट फक्त
नावालाच उरले होते.. चिन्मयच्या रेनसूटची पँट नको तिथे सच्छिद्र झाल्याने त्याची
अवस्था अधिकच बिकट झाली होती... पण हाँटेलवाला दयाळू होता...आम्हाला शेकायला शेगडी
दिली, चिन्मयला भोकं बुजवायला त्याने चिकटपट्टी दिली... गेले दोन दिवस माझ्या
पोटाने असहकार पुकारला होता त्यामुळे माझ्या दिवसभर इनपुट आऊटपूटच्या एन्ट्रीज् टँली होत होत्या... जेवण
करुन सव्वादहाला आंबेनळी उतरायला सुरुवात केली. आम्ही निघालो हे बघून इतका वेळ
पडणारा पाऊस गायब झाला... कशेडीमधलं दाट धुकं चिरत भरणा नाका गाठला तेव्हा
पावणेबारा झाले होते... चहाचा बार मारला आणि आपल्या पार्श्वभागाच्या संवेदना
प्राप्त करण्यासाठी चिन्मय बुलेट चालवायला बसला.. बोरजपासून पावसाने परशुरामपर्यंत
अभिषेक चालू ठेवला... प्राप्त परिस्थितीत मागच्या सीटवर मी शक्य तेवढं सगळं मुठीत
धरुन बसलो होतो. चिन्मयला सोडून घरी परतायला अपरात्रीचा एक वाजला आणि नखशिखांत
भिजलेला व चिखलाने माखलेला मी, बायकोची नजर चुकवीत गरम पाण्याच्या शाँवरखाली उभा
राहीलो...

लेखन आणि चित्रण लुभावणार ...
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteमजा आ गया.
ReplyDeleteतुमच्याबरोबर प्रवास केल्या सारखे वाटले 👏 👏
खूप छान माहिती दिलीत. मी पण खूप वेळा तिथे गेलोय पण प्रत पगडाकडे जाणारा रस्ता माहीत नाही. आम्ही तापोळा ते रघूविर घाट असा प्रवास करतो.
ReplyDelete