Saturday, August 22, 2020

शरण तुला भगवंता....

वेणूआजीच्या येरझाऱ्या सुरुच होत्या. सूर्य पश्चिमेकडे कलला. पावसामुळे अधिकच अंधारलेली संध्याकाळ मनाची घालमेल करत होती. पावलं वाजली तशी वेणूआजी पाय ओढीत दरवाज्याकडे गेली. दबक्या पावलानं येणाऱ्या मांजरीची पावलं ऐकू आली पण ऐकू येऊ शकणारी पावलं मात्र अजून ऐकू येत नव्हती. उद्यावर गणपती आले तरी मनाला प्रसन्नता नव्हती. सरावाने बहुतेकशी तयारी करुन झाली होती पण एकट्या घराला पन्नास वर्षांपूर्वीची ती धांदल, गडबड आता पारखी झाली होती. बघताबघता वेणूआजी भूतकाळात गेली. 

वृद्ध सासू, नवरा, दिर, चार मुलं असं गोकूळ होतं हे घर... सणवार अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडायचे. गणपतीच्या दिवसात तर कंबरेचा भुगा व्हायचा. दहा पिढ्यांची परंपरा तोंडपाठ असणारी सासू होती.. मनानं अगदी प्रेमळ पण वयाने शरीराची धनुकली केलेली. कपाळीचं कुंकू किर्तनाची परंपरा चालवत होतं, त्यामुळे खर्चाची तोंडमिळवणी करताना जीव अगदी मेटाकुटीला यायचा. दारासमोरच गोठा होता त्याचं दुधदुभतं घरी खाऊन उरेल ते विकून चार पैसे कनवटीला लावता यायचे. परसांव मोठं होतं तिथे पावसात भाज्या करायच्या त्या अगदी दिवाळीपर्यंत तोंडी पुरायच्या.... थंडीत केलेले कुळीथ, मूग, पावटा वर्षभर पुरायचा. संपन्नता नव्हती पण विपन्नावस्था नक्कीच नव्हती. माहेर असं उरलंच नव्हतं त्यामुळे सासरचे संस्कार, परंपरा जोपासण्यात वेणूआजीचं अवघं आयुष्य गेलेलं... चैत्रातल्या हळदीकुंकवापासून जी सुरुवात व्हायची, ती रामनवमी, हनुमानजयंती पार पडेतो चातुर्मासातल्या व्रतवैकल्यासाठी कोणाचातरी डेरा पडायचा. पाठोपाठ गणपती, नवरात्र, दिवाळी, शिवरात्र आणि मग शिमगा... वेणूआजीला उसंत नसायची. शिरुभाऊंची किर्तनसेवा चालूच होती. मुलं मोठी होत गेली. सासूने इहलोकीची यात्रा संपवली. जावई आले, नातवंड आली.. पाठोपाठ सून आली पण घरात बाळपावलं पडायच्या आत कर्ताधर्ता मुलगा गेला. सुनेनं पाठ फिरवली तरी वेणूआजी डगमगली नाही. वृद्ध दिर आणि सौभाग्यासाठी ती राबतच राहिली. मुली, जावई येऊन जाऊन होते. थोरलीची मदत होतीच भरीला दिराची पेन्शन असल्याने घरात चार दिडक्या खेळत्या राहिल्या. वेणूआजी म्हातारपणाकडे झुकली आणि अचानक दिराने देह ठेवला. आता त्या घरात दोघंच उरली. खेडेेगाव असल्याने दारावरुन जाणा-या येणा-यासाठी हक्काच्या घराचे दरवाजे सताड उघडेच असायचे. वाडीतल्या लोकांची ओटीवर उठबस व्हायची तेवढाच विरंगुळा.

"वेणूआजी, अगं पाट दे... मूर्ती आणून ठेवतो" शेजारच्या मुलांचा पुकारा ऐकून आजी तंद्रीतून जागी झाली. "हो, खरंच की, मूर्ती आणून ठेवायला हवी".. असं म्हणत पाट, विडासुपारी, नारळ आणि वस्त्र देऊन आजी परत ओटीवर बसली. दारात झोपाळा होता पण कधी बसायला वेळच मिळाला नाही आणि मग पुढे सवय नाही म्हणून गरगरायचं.. वेणूआजी त्या झोपाळ्याकडे बघताबघता पुन्हा तंद्रीत गेली. 

नैवेद्यासाठी मोदक हवेत म्हणून खूपदा थोरली मदतीला यायची. तिच्या घरी पण गोतावळा खूप, मग वेणूआजीची एक मैत्रीण होती ती आणि आजी मिळून मोदक करायच्या. बघताबघता पाच दिवसांंचा गणपती हळूच दीड दिवसावर आला. थोरलीची जबाबदारी मधली आणि धाकटीनं आपल्या शिरावर घेतली. शिरुभाऊंना गणपतीची उस्तवार कठीण होऊ लागली म्हणून मग थोरलीचा लेक घरचा गणपती बसवून आजोळचा गणपती बसवायला यायचा. आता मात्र नोकरीमुळे ही कसरत त्यालाही कठीण होऊ लागली. 
वृद्धत्वानं एके दिवशी वेणूआजीच्या हातातला शिरुभाऊंचा हात आपल्या हाती घेतला आणि मग आजी अगदीच एकटी पडली. म्हातारपण कान आणि गुढगेदुखीच्या रुपात खुणावत होतं तरी वेणूआजीचा एकटा हात घरावर फिरत होता, सणवार पार पाडले जात होते. गेली चार वर्ष खूपच दगदग होते आहे हे पाहून मधलीनं आईला फर्मावलं... "यावर्षी गणपतीला प्रार्थना कर. इतकी वर्षे सेवा केली पण आता नाही झेपत. यावर्षीची ही अखेरची सेवा गोड मानून घे"
आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।
पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।।

मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तिहीनम् सुरेश्वर।
यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।

अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।
तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।।

वर्षानुवर्षे गणपती पूजा सांगणारे भार्गवगुरुजी खर्जातल्या स्वरात प्रार्थना करत होते. मनाची चलबिचल, अस्वस्थता मागे टाकून वेणूआजीने एकदाचा धीर केला आणि गुरुजींना थांबवले. मधलीचा मानस ती आपल्या मुखाने व्यक्त झाली खरी पण डोळ्याला लागलेल्या धारा आणि रुद्ध झालेला कंठ तिला पुढे बोलू देईना. चमत्कारिक परिस्थितीत सगळे अवघडून उभे असतानाच धाकटी पुढे झाली. "गुरुजी, ही म्हणत्ये ते खरं असलं तरी तिचं मन ते स्विकारणार नाही. सणवार, उत्सव यापुढे पार पाडताना कठीण होणार असलं तरी या वयस्कर लोकांचं जगण्याचं हेच बळ आहे. करु काहीतरी आम्ही. पुढच्या वर्षाचं पुढल्या वर्षी बघू पण आत्ताच प्रार्थना करुन तिला विरक्त नका करु. नाही जमणार तिला ते" धाकल्या जावयानं पण मान डोलावली. वेणूआजीच्या डोळ्यात निराळीच चमक आली. घोगरा झालेला आवाज मोकळा झाला. गुरुजी पण गालातल्या गालात हसले आणि मंत्रपुष्पांजली म्हणू लागले.
 
"गणपती बाप्पा मोरया"... जोराचा गजर झाला.. वाडीतली मुलं गणपती घेऊन दारात उभी होती. पायावर दूधपाणी वाहून मुलांंना आत घेतलं. नेहमीच्या जागेवर बाप्पा विराजमान झाले. परातीत चिवडा ओतून मुलांच्या समोर धरत वेणूआजी प्रत्येकाची चौकशी करत होती. "उद्या येतांव आरतीला, भरपूर प्रसादी करुन ठेवा" फर्माईश करुन मुलं पसार झाली. अंधार दारा खिडक्यांमधून घरात घुसला तशी आजीने चारीठाव दिवे लावले. शुभंकरोती म्हणून देवाला हात जोडले तरी उद्याची चिंता काही मिटली नाही. भार्गवगुरुजींचा निरोप होता, उद्या सकाळी नऊ वाजता येणार असल्याचा. म्हणजे सकाळी उठल्यावर बाकी तयारी केली तरी चालणार होती पण मग आत्ताची अस्वस्थता जायला म्हणून आजी फुलवाती वळायला बसली. "हे असते तर आत्तापर्यंत चार वेळा चहा टेकायला लागला असता आणि मग प्रत्येक चहानंतर पान चुरडायला हवंच" आजी शिरुभाऊंच्या आठवणीत गुंतली. वाती झाल्या, समया सजल्या. "तरीच म्हटलं काहीतरी विसरलंय, गणपतीला कापसाची वस्त्र राहिली." तीनफेरी वस्त्र करुन झालं, ताम्हन भरलं, विडे, सुपारी, पत्री, नारळ, हळदकुंकू, अबीर, बुक्का.... सगळ्या तयारीवर आजीची नजर फिरली आणि चेहऱ्यावर खुशी आली. "यांना अशी साग्रसंगीत तयारी लागायची, चालवून घेणं अजिबात जमायचं नाही. पण खरं सांगायचं तर त्यातही एक आनंद होता" उसासा टाकून वेणूआजी वळली तर दारात धाकलीचा लेक हजर... आsज्जीsss करत आत आला. "गणपती गजानना, तूच तुझी सेवा करुन घेतोयस रे.... अरे, मला उद्याच्या पूजेची काळजी आणि तू इकडे छान पाटावर बसून निवांतपणे व्यवस्था करुन मोकळा... तुलाच रे बाबा माझी काळजी..." 
"काय वेणूआजी? यंदा करायची का प्रार्थना?" भार्गवभटजी मिश्कील आवाजात विचारत होते.
"माझा हा नातू असेपर्यंत मनात सुद्धा नका आणू.. साग्रसंगीत होऊ द्या पूजा..." आनंदविभोर वेणूआजी उत्तरली. 

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता। विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी । गणपती बाप्पा मोरया ॥

Monday, August 3, 2020

Noble… Thy name is Ashraf

Noble… Thy name is Ashraf

आजपासून साधारण अठरा वीस वर्षांपूर्वी कोणीतरी ओळख घालून दिली, "हा अशरफ देसाई" बँकेत नोकरीला आहे आणि आपल्या चिपळूण शाखेचा एजंट आहे. मध्यम उंची, लख्ख गोरा वर्ण, टापटीप ब्रँडेड पोशाख आणि आसपास दरवळणारा सुगंध ही अशरफची ओळख. या ओळखीनंतर बँकेतील नोकरी सांभाळून एजन्सी करत अशरफ भेटतच राहीला.  

खालचा ओठ आत वळवून काढलेले टिपिकल कोकणी मुस्लिम उच्चार, समोरच्याची मस्करी करण्याची ढब, आपल्यावर केलेली कोटी उलटवण्याची त्याची एक खास पद्धत. अत्यंत दिलदार असा अशरफ त्याची दूरवर झालेली बदली नाकारुन पूर्णवेळ विमाप्रतिनिधी बनला. घरुन आरिफाभाभींचा पाठिंबा होताच, पण समाजाच्या सर्व थरात संचार असल्याने अशरफला हा निर्णय घेणे जड गेले नाही.

अनेक निमित्ताने अशरफचा आणि माझा स्नेह वाढत गेला. अहोजाहोचं नातं अरेतुरेमधे बदललं. कोणालाही मदत करताला त्याच्या तोंडी कधी नकार नसायचा. 2007 ला माझ्या नवीन घराच्या कर्जप्रकरणावेळचीच गोष्ट. जामीनदार म्हणून मला एक चेअरमन क्लब मेंबरची आवश्यकता होती. कोणाला विचारु असा विचार करेपर्यंत अशरफ समोर आला. सहज म्हणून विचारलं तर दुस-या सेकंदाला कानावर होकार पडला. अक्षरश: जामीनदार हा विचार मनात येतोय तोवर त्याची पूर्तता देखील झाली. अशरफ रोज चिपळूण शाखेत यायचा. माझं ऑफिसही त्याच इमारतीत तळमजल्यावर असल्याने सतत भेटीगाठी व्हायच्या. एजंटांच्या भिशीमधे माझ्या पाठीमागे लागून मला अशरफने नेले आणि मग मैत्रीचं वर्तुळ आणखी विस्तारलं. 2010 ला सातारा येथे आम्ही तीन दिवसांचे संयुक्त ट्रेनिंग केले आणि मग हा सिलसिला सुरुच झाला. 

एकदा अशरफच्या घरी गेलो होतो. समोर एक चाकं असलेली नवीकोरी ट्रॉलीबॅग पाहिली. सहज म्हणून विचारलं की कुठून आणलीस रे? खरंतर ती बॅग अशरफच्या भावाने दुबईहून आणली होती. तुला आवडली असली तर घेऊन जा, मी दुसरी आणीनअशरफच्या अंगात दानशूर कर्ण अवतरलेला. त्यावेळी तिची किंमत किमान चार हजाराच्या वर असणार होती. मी अर्थातच नकार दिला आणि भाऊ जेव्हा परत कधी येईल तेव्हा येताना आणायला सांगितली. योगायोग असा की त्याचा भाऊ पुढच्याच आठवड्यात येणार होता. अशरफ़ने लगेच त्याला माझ्यासमोरच फोन केला आणि पठ्ठ्या एकास दोन बॅग्ज आणायला सांगून मोकळा.

ब्रँडेड वस्तूंचं अशरफला अतोनात वेड होतं. उत्तम क्वालिटीचे कपडे, बेल्ट इ.खरेदीची त्याला आवड होती आणि मुख्य म्हणजे पारखही होती. त्याच्या ब्रँडेड या शब्दावरुन आम्ही त्याची खूप थट्टाही करायचो. 2017 साली मी अशरफला जयपूरला ट्रेनिंगला घेऊन गेलो होतो. सोबत अभय, नामदेव, संतोषही होते. एका संध्याकाळी आम्हा बाकीच्या मंडळींची खरेदी आटपली तरी संतोषला मनासारखं काही मिळालं नव्हतं. आम्ही सगळेच कंटाळलो. पण अशरफ त्याला रिक्षात घालून एका ब्रँडेड दुकानात घेऊन गेला आणि खरेदी करुन आला. आमचं ट्रेनिंग जयपूरला असल्याने जवळच एक दिवस अजमेरला जाऊन येऊया असा लकडा त्याने लावला. थंडीचे दिवस असल्याने दाट धुक्यात संध्याकाळी तिकडे गाड्या चालत नाहीत. जायला मिळत नाही म्हणून तो मायूस झाला पण ते अगदी थोडावेळ. जरा वेळाने तो लोकल साईटसिईंगमधे तह-ए-दिलसे शरिक.. ट्रेनिंगचे दिवस संपल्यानंतर आम्ही सगळे माझ्या मित्राच्या कृपेने जैसलमेर, लोंगोवाल पोस्ट, पाकिस्तान बॉर्डरपर्यंत जाऊन आलो. आठवडाभराची ती ट्रीप कधीच विसरणार नाही इतकी आम्ही धमाल केली होती. अशरफला कायम हसतमुख असण्याची देणगी बहुधा वडीलांकडून मिळाली असावी. युसुफचाचा निवृत्त तहसीलदार.. त्यामुळे जमीन वगैरे बाबतीत नियमावली अगदी तोंडावर असायची. जगन्मित्र असल्याने ओळखी अचाट. आम्हा सगळ्यांशी भरपूर गप्पा मारायचे. प्रत्येक वडीलांना मुलाचं कौतुक असतंच, त्याला युसुफचाचा कसे अपवाद असतील? आमच्याशी अगदी भरभरुन बोलायचे. मुलाचं कौतुक सांगायचे.

मध्यंतरीच्या काळात अशरफच्या प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरी झाल्या. काही व्याधींनी जरा मोठं रुप घेतलं. या दिलदार मित्राचं काळीज उघडून बघण्याची वेळ आली पण देवदयेने साफसफाईवरच भागलं. रोजचं चालणं, गोळ्या आणि पथ्य या त्रिसुत्रीवर त्याची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली. अशरफ पुन्हा हिंडताफिरता झाला. पूर्वीच्याच जोमाने काम करायला लागला. मी, संतोष, राजेश आम्ही सगळे सारखे त्याच्या पाठी लागायचे की तू तुझं स्वत:चं ऑफिस सुरु कर. स्टँडजवळ तुझी स्वत:ची जागा आहे तर आम्हाला तुला तुझ्या कार्यालयात बसलेला पहायचंय. स्वत:चं ऑफीस या गोष्टीशी त्याचं काय शत्रुत्व होतं माहिती नाही पण तो योग कधीच आला नाही. मात्र असिस्टंट, आँफिस नसतानाही रेकॉर्ड कसं सांभाळावं ते अशरफकडून शिकावं इतकं छान तो मेन्टेन करायचा...

अशरफ मिस्किल होता. कितीही तणाव असूद्या असं काही वागायचा, बोलायचा की रडका मूड जाऊन हास्यरसाचे फवारे उडालेच पाहिजेत. गतवर्षीचीच गोष्ट.. चौदा जणांचा एक ग्रुप घेऊन मी लद्दाखला जायचो होतो. मी सोडून बाकीचे प्रथमच जाणार होते.  तारीख ठरली होती 05 ऑगस्ट 2019. पण 25 जुलैपासूनच पावसाने हलकल्लोळ माजवला होता. त्यात अचानकपणे काश्मीर खोरं बंद झालं, कलम 370 रद्द होण्याची भर पडली. संपूर्ण टूर रद्द होण्याची चिन्हं दिसत होती. जायची तारीख दोन दिवसांवर आली तरी अडचणी कमी होण्याऐवजी गुणाकाराने वाढत होत्या. त्यातच एजंट संघटनेची मिटींग कोल्हापूर येथे नियोजित होती. नेमकेपणाने सांगायचं तर आजचीच 03 ऑगस्ट 2019 ही तारीख होती. भरपावसातून अशरफ, मी आणि बाकी तीन एजंट आंबा घाटातून कोल्हापूरला निघालो होतो. माझा एकंदर मूड त्याच्या लक्षात आल्यासारखी त्याची अखंड बडबड चालली होती. पुढे नाश्त्यासाठी आंबा येथे थांबलो. आमचा नाश्ता संपत आला तरी अशरफ आणि एक एजंट गायब... घडलं असं होतं की मिसळीत पिळायला घेतलेलं लिंबू हातातून सटकून मिसळीत पडलं आणि अशरफच्या पांढऱ्याशुभ्र शर्टावर रंगीत नक्षीकाम झालं होतं. लिंबू, साबण लावून पण डाग जाईना
म्हणून समोरच्या दुकानातून साबण पावडर आणून हाँटेलमधल्या एका पातेल्यात शर्ट भिजवण्याचा आणि धुण्याचा कार्यक्रम चालला होता. घडलं हे कमी की काय म्हणून साबण पावडर टाकणा-याने अख्खा पाऊच ओतला होता. त्यामुळे डाग राहिला बाजूला, पण शर्टातून साबण काढण्याचाच व्याप झाला. कितीही पाणी ओतलं तरी पातेल्यातून फक्त फेसच बाहेर पडायचा. उघडाबंब अशरफ शर्ट धुतोय आणि आम्ही आळीपाळीने पाणी घालतोय... सगळाच प्रकार विनोदी.. हसून हसून मुरकुंडी वळलेली... एकदाचा तो डाग गेला पण आता ओला शर्ट घालणार कसा? म्हणून अखेरीस अशरफ उघडाबंबच गाडीत बसला. वारणानगर येईपर्यंत आम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला इस्त्रीवाला शोधत होतो. अखेरीस दुकान मिळालं आणि इस्त्री कडकडीत तापवून शर्ट वाळवावा लागला.. प्रसंग आठवला की उकळी फुटल्यागत आम्ही सगळे हसायचो. आमच्या सोबत अश्रफ पण हसायचा. एकदाचे आम्ही कोल्हापूरला पोचलो आणि अचानक लक्षात आलं की गेले दोन अडीच तास मी एकदम तणावमुक्त आहे. घडलेल्या प्रसंगात जराही चिडचिड न करता तो छान एन्जॉय करत होता आणि मलाही हसवत होता....

मिटींग वगैरेसाठी कुठेही जायचं झालं की अशरफला हमखास उशीर व्हायचा. मग राजेश चिडायचा. त्याची आणि अशरफची जुगलबंदी सुरु व्हायची. पण थोड्या वेळाने त्याचा मागमूसही नसायचा. एकदा महेशने हळूच पुडी सोडून दिली की अशरफ स्मशानात यायला भितो, येत नाही तो. कोणीतरी त्याला भिशीत विचारलं तर महेशवर जाम वैतागला.. अशरफला उचकवायची किल्लीच मिळाली सगळ्यांना. पण त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तेच हत्यार महेशवर उलटवलं आणि स्वत: एक पुडी सोडून दिली की महेश एजन्सी बंद करतोय, रिटायर व्हायचं म्हणून आवरतं घेतोय... महेशला हैराण करुन सोडलं त्याने... असे कितीतरी प्रसंग अनेक एजंट सांगतील. खरंच... most lovable, Noble & honourable होता अशरफ... अशरफ या अरेबिक शब्दाचा अर्थच मुळी आहे Noble or most honourable. नावाप्रमाणेच अशरफ कायम नावाला जागला, आणि तसाच जगला पण.

"अशरफला कामथ्यात अँडमीट केलंय" पलिकडून काप-या आवाजात महेश फोनवर सांगत होता. "एकच दिवस ताप आला पण खूप अशक्तपणा आलाय.." पुढची वाक्य कानावर पडत होती पण मेंदूपर्यंत पोचू नयेत अशी दहशत वाटायची कामथे हाँस्पिटल म्हटलं की. “मी निघतोय” असं सांगून फोन ठेवला. फार लांब नसल्याने पाचच मिनिटात काँटेजला पोचलो. राजेश आधीच पोचला होता. नेहमीच्याच सुरात अशरफची थट्टामस्करी सुरु होती. मला बघितल्यावर म्हणाला, "आमच्या समाजाने हा कोरोना वार्ड तयार करुन दिलाय आणि पहिला पेशंट मीच"  आँक्सिजन देणं सुरुच होतं तरीही पल्सआँक्सिमीटर आँक्सिजन सँच्युरेशन फक्त 85 ते 90% दाखवत होता.  स्थिती चिंताजनक नव्हती तरी सामान्य नक्कीच नव्हती. रिपोर्ट मिळण्यात झालेला विलंब लक्षात घेऊन रत्नागिरी सिव्हिल हाँस्पिटलला हलवण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आणि तो योग्यच होता. “चारपाच दिवसात ठणठणीत होऊन चिपळूणला येशील” असं म्हणणारे आम्ही, रुग्णवाहिका आल्यावर खुर्चीतून उठून आपणहून आत बसणा-या अशरफचं ते जिवंतपणीचं शेवटचं दर्शन घेत होतो हे मात्र आम्हाला तेव्हा कळलं नव्हतं. रोज अशरफ फोनवर बोलायचा. तब्येत ठिक आहे सांगायचा.

17 तारखेला माझ्या मुलाच्या बारावी निकालाचे पेढे वाटत असतानाच फोन आला, अशरफ गेला”. एक क्षण कळलंच नाही, गेला म्हणजे? कुठे? दुसऱ्या क्षणी हातातून गळून पडणारा बाँक्स सांभाळला. दरवाजाचा आधार घेत स्वतःला सावरलं.  किमान चार ठिकाणाहून खातरजमा केली, प्रत्येक ठिकाणी तीच मनहूस खबर होती, अशरफ जिंदगी की जंग हार चुका”।  कातिल कोरोनाने अशरफचा घास घेतला होता. सरकारी सोपस्कारामुळे अंत्यदर्शन नाही की मूठमाती नाही. कोरोनाच्या भितीनं अवघ्या समाजाला असं ग्रासलेलं की इच्छा असूनही कुटुंबीयांना धीर देण्यासाठी कोणी जाऊ शकत नाहीये. दोन्ही मुलगे घरापासून दूर. तेही येऊ शकले नाहीत. अत्यंत अवघड परिस्थितीत असताना अशरफ सगळ्यांना सोडून गेलाय. आता काळजी आहे ती युसूफचाचा, भाभी आणि अशरफच्या मुलीची. अशरफचं जाणं यापैकी कोणीच स्विकारलेलं नाहीये आणि या कालखंडात ते अवघडही आहे.

हा आघात ते कसे सोसणार आहेत हे त्या अल्लातालालाच माहिती...

आमेन..

ता.क. गतवर्षीच्या कोल्हापूर प्रवासातल्या आठवणी 03 ऑगस्टशी निगडीत असल्याने आज हा लेख प्रसिद्ध करायचा असं ठरवलं होतं. पण ज्या दिवशी हा लेख लिहिला त्याच्या दुस-याच दिवशी युसुफचाचा अल्लाला प्यारे झाले.  दुनियाका सबसे बडा बोझ, बापके कंधे पे बेटे का जनाजा, ना वो सह सके, ना वो उठा सके।  परमेश्वर आणखी किती परिक्षा पाहणार आहे हे त्यालाच माहिती.

मनोज भाटवडेकर 
# 9421253153

03.08.2020