Sunday, June 11, 2017

वटवृक्षाच्या सावलीत......



कोकणातील समस्त साहीत्य, कला, निसर्गप्रेमी, खेळाडू, राजकारणी तसेच अनेक व्यासंगी ग्रंथप्रेमींचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान असणारे एक विद्यापीठ म्हणजे माझे नाना.... अनेकांना आधार देणारा, सुखाची सावली देणारा हा वटवृक्ष आज आपल्यात नाहीये परंतु त्यांच्या आठवणी चिरकाल जपल्या तर प्रत्येकालाच पुढील वाटचालींसाठी बळ येईल याची मला खात्री आहे.
कोणीही यावं आणि आपली अडचण नानांसमोर मांडावी.... “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,” हे वाक्य स्वामी समर्थांनंतर बहुधा नानांनी सार्थ करुन दाखवलं.. समाजोपयोगी कार्याचे आयोजन असेल तर नानांचा उत्साह पु.लं, च्या रावसाहेबांपेक्षाही कांकणभर जास्त असायचा...
2001 साली माझ्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन नानांच्या हस्ते झालं... माझी व्यावसायिक माहिती मिळवून ती माझ्याच वरिष्ठांसमोर नानांनी इतक्या खुबीने मांडली की मीच का तो असे माझे मलाच आश्चर्य वाटले.  पुढील काळात व्यवसाय वृद्धिसाठी मला शेजारी रिकामा असणारा सारस्वत बँकेचा गाळा विकत मिळणं गरजेचं होतं.  त्यासाठी मी नानांना गा-हाणं घातलं.. पुढच्या दोनच दिवसात बँक चेअरमन खा.एकनाथ ठाकूर चिपळूणला येणार होते. नानांचे हे एक मोठे वैशिष्ठ्य होतं की त्यांच्याकडे कोणाचा कुठे दौरा आहे इ. माहितीचे रोजचे अपडॆट्स असायचे.  मला घेऊन नाना थेट खा.एकनाथ ठाकूर साहेबाना भेटले आणि त्यांच्याकडून त्यांनी ऑन दि स्पॉट शब्द मिळवला...... “नाना, मी हा गाळा याला दिला”.....  पुढील कार्यवाही व्हायला तीनचार वर्ष गेली पण नानांची शब्दविनंती ठाकूरसाहेब आणि सारस्वत परिवाराने खाली पडू दिली नाही.
2002 साली मी आणि माझा मित्र आशिष चितळे, दोघांनी बाईकने लेहलडाखला जायची कल्पना नानांकडे मांडली. चिपळूण तालुक्यातले आम्ही पहिलेच असण्याची शक्यता वर्तवताच नाना उद्गारले... “हे बघ, हे असे संकुचित वर्तुळात नाही राहायचं... आपल्या कक्षा रुंद असल्या पाहिजेत. उल्लेख करताना कोकणातले पहिले असंच म्हणायचं”  नानांचे कोकण या शब्दावर स्वत:च्या प्राणापलिकडे प्रेम होते. आमच्या या धाडसी मोहीमेत नानांचा उत्साह आमच्याहून जास्त होता.  रोज फोन करुन विचारायचे की काय रे... तयारी कुठवर आली आहे? काय मदत हवी आहे? अवजड उद्योग मंत्री मा. मनोहरपंत जोशी, तसेच हिरो होंडा कंपनी यांना नानांनी स्वत:हून पत्र लिहिली आणि आम्हाला यथायोग्य मदत मिळवून दिली. इतकंच नाही तर आम्ही यशस्वीपणे परत आल्यावर दै.सागरच्या पाडवा पुरवणीमधे माझं भलं मोठं प्रवासवर्णन छापलं... एखाद्या दिवाळी पुरवणीत केवळ दोनच लेख असण्याचे हे एकमेव उदाहरण असावे. या पुरवणीने आम्हा दोघांना अपार प्रसिद्धी दिली.
नाना श्रद्धाळू होते पण त्यांच्याकडे धार्मिक अवडंबर नव्हतं... धर्मातल्या चुकीच्या प्रथांवर टिका करायला त्यानी मागेपुढे पाहिले नाही.  चिपळूण नजीकच्या एका देवस्थानात उत्सवाच्या अखेरीस पशुबळी देण्याची प्रथा त्यांना अस्वस्थ करायची पण करता काही येत नव्हते.  नानांना त्याची खंत होती. नाना आणि माझ्यात निसर्गप्रेमाचा एक समान धागा होता... नाना एकदा मला म्हणाले, “अरे एका निष्पाप जीवाचा बळी देऊन कोणताच देव प्रसन्न होत नाही रे...  हे थांबविण्यासाठी काही करता येईल का?  त्यानी असं विचारल्यावर मी एवढंच म्हणालो की करता खूप काही येईल पण मग इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा अशी परिस्थिती आली तर तुम्हाला अडचण होईल.  पण नानांनी एका शब्दात होकार दिला आणि म्हणाले माझी काळजी करु नकोस..... ही पशुहत्या केवळ इथलीच नाही तर देवाच्या नावावर होणा-या कोकणातल्या प्रत्येक देवस्थानातली बंद व्हायला पाहिजे. नानांच्या शब्दांनी बळ आलं. माझ्या कुवतीनुसार मी जे काही केलं त्यानुसार थेट दिल्लीतून मनेका गांधी यांचा जिल्हा न्यायाधिशांना फोन आला, इतरांनाही फोन गेले.  यंत्रणा हलली आणि कोणतीही कटूता न येता तिथली ही प्रथा बंद झाली. इतर ठिकाणची पण प्रथा जेव्हा बंद होईल तेव्हा निसर्गप्रेमी नानांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल.
नानांविषयी आठवणी इतक्या आहेत की परिचितांचे एकेक कथासंग्रह होतील. अत्यंत विद्वान, व्यासंगी, उत्साही, निर्मळ मनाच्या आणि कित्येकाना गुरुस्थानी असणा-या माझ्या नानांना श्रद्धांजली अर्पण करताना पुढील ओळी आठवतात.....

पुरी जिंदगी इत्र लगा लगा के मर गये,
फिरभी राखसे खुशबू नही आई।
आओ अच्छे कर्मोंका इत्र लगाए जीवन मे,
ताकी मरने के बाद राखसे भी कर्मों की खुशबू आए।।

अच्छे कर्म करते करते नाना स्वत:च अत्तर बनून गेले.  जो संपर्कात आला त्याला त्यांचा सुगंध लाभला.... 

मनोज भाटवडेकर, चिपळूण
9822160605, 9421253153

Friday, June 2, 2017

आठवणीतला पाऊस

साधारणपणे जूनचा पहिला आठवडा हा शाळा आणि पाऊस सुरु होण्याचा.... त्यामुळे पहिला पाऊस पडला  कि राखाडीने कंदीलाच्या काचा चमकवणे आणि शाळेच्या आदल्या दिवशी दप्तरात वह्या, पुस्तकं, कंपासपेटी नीट लावणं आणि मुख्य म्हणजे पेनात शाई भरुन ठेवणे ही कामं म्हणजे अगदी आनंदाचा गाभा असायचा.  नवीन वह्यापुस्तकांचा कोरा वास छाती भरुन घेतल्यानंतर त्यांना कव्हर घालण्याचा समारंभ व्हायचा. असा हा कोरा वास आणि त्यांचं नवं रुपडं परत पुढल्या वर्षाशिवाय लाभणार नसायचं..... अंधार पडू लागलेला असायचा.. आई तन्मयतेने काच घासत असायची... तिची ती काच घासण्यातली लय नजर भारुन टाकायची... वडील देवघरात परवचा म्हणत असायचे. वाती, राँकेल भरुन कंदील तयार होता होता अचानकपणे आकाशातून वीजेचा लोळ धरणीवर उतरायचा अन पत्र्यावर पावसाची टिपरी वाजायला लागायची... लाईट दुस-या दिवशी सकाळीच येणार हे इतकं अंगवळणी पडलेले असायचे. जोरदार पावसानं वातावरण शीतल होत असतानाच आईची हाक यायची... चला रे जेवायला.... गरम भात, कुळथाचं पिठलं, पापड असा ठरलेला मेनू जेवून आत्माराम शांत व्हायचा.... पेट्रोमँक्स बहुधा श्रीमंतांकडे किंवा हौशी आणि चार पैसे राखून असणाऱ्या कडेच असायच्या. त्यामुळे कंदीलाच्या प्रकाशात जेवणं आटपली की कपाटातल्या गोधड्या बाहेर निघायच्या आणि त्या उबेत कधी डोळा लागायचा ते कळायचंच नाही. सकाळी उठल्यावर जडावलेल्या डोळ्यासमोर धरतीचं वेगळंच रुप समोर यायचं आणि आमचं शैक्षणिक वर्ष सुरु व्हायचं
-- मनोज भाटवडेकर