Friday, June 2, 2017

आठवणीतला पाऊस

साधारणपणे जूनचा पहिला आठवडा हा शाळा आणि पाऊस सुरु होण्याचा.... त्यामुळे पहिला पाऊस पडला  कि राखाडीने कंदीलाच्या काचा चमकवणे आणि शाळेच्या आदल्या दिवशी दप्तरात वह्या, पुस्तकं, कंपासपेटी नीट लावणं आणि मुख्य म्हणजे पेनात शाई भरुन ठेवणे ही कामं म्हणजे अगदी आनंदाचा गाभा असायचा.  नवीन वह्यापुस्तकांचा कोरा वास छाती भरुन घेतल्यानंतर त्यांना कव्हर घालण्याचा समारंभ व्हायचा. असा हा कोरा वास आणि त्यांचं नवं रुपडं परत पुढल्या वर्षाशिवाय लाभणार नसायचं..... अंधार पडू लागलेला असायचा.. आई तन्मयतेने काच घासत असायची... तिची ती काच घासण्यातली लय नजर भारुन टाकायची... वडील देवघरात परवचा म्हणत असायचे. वाती, राँकेल भरुन कंदील तयार होता होता अचानकपणे आकाशातून वीजेचा लोळ धरणीवर उतरायचा अन पत्र्यावर पावसाची टिपरी वाजायला लागायची... लाईट दुस-या दिवशी सकाळीच येणार हे इतकं अंगवळणी पडलेले असायचे. जोरदार पावसानं वातावरण शीतल होत असतानाच आईची हाक यायची... चला रे जेवायला.... गरम भात, कुळथाचं पिठलं, पापड असा ठरलेला मेनू जेवून आत्माराम शांत व्हायचा.... पेट्रोमँक्स बहुधा श्रीमंतांकडे किंवा हौशी आणि चार पैसे राखून असणाऱ्या कडेच असायच्या. त्यामुळे कंदीलाच्या प्रकाशात जेवणं आटपली की कपाटातल्या गोधड्या बाहेर निघायच्या आणि त्या उबेत कधी डोळा लागायचा ते कळायचंच नाही. सकाळी उठल्यावर जडावलेल्या डोळ्यासमोर धरतीचं वेगळंच रुप समोर यायचं आणि आमचं शैक्षणिक वर्ष सुरु व्हायचं
-- मनोज भाटवडेकर

No comments:

Post a Comment