Monday, August 7, 2017

कलासक्त राजा

कलावंताने मारलेले रंगाचे फराटे सुद्धा कलाचित्र बनतात परंतु हे भाग्य सगळ्यानाच नाही मिळत... त्यासाठी बोटातली जादू कुंचल्याने व्यक्त करता यावी लागते.  कोकण हे मुळातच कलाकारांचे माहेरघर... अनेक कलाकार, रंगकर्मी, नाट्यकर्मी, मूर्तीकार आणि महान गायक या अपरांत भुमीने महाराष्ट्राला दिले आहेत. व्यावसायिक तत्व बाजूला ठेवून कलेचे वेड जपणारी ही मनस्वी मंडळी खूपदा दुर्लक्षित राहतात. असंच काहीसं आबलोलीच्या राजेश शिंदेंच्या बाबतीत झालंय.... व्यवसायाने गेली अनेक वर्ष ते एलआयसीचे विमाप्रतिनिधी म्हणून घराघरात पोचलेत. उत्तम सेवा देताहेत. पण त्याच बरोबर एक उत्कृष्ट मूर्तीकार, उत्तम आखणीकार ही ओळख सर्वदूर होत असलेल्या राजेशजींचा कलाप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकला तेव्हा एकलव्याच्या एकाग्रतेची महती पटली.........

“प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षण आबलोली येथे पूर्ण करतानाच चित्रकलेच्या परिक्षा देऊन झाल्या. मुळातच रंगकामाची आवड असल्याने कारेकरांच्या चित्रशाळेत गेल्यावर गणपतीच्या मूर्ती रंगवायला मिळतात इतक्या अल्पसमाधानावर मी शिकत राहीलो आणि आनंद मिळवत राहीलो. याच कालखंडात नामवंत मूर्तीकार श्री. वेल्हाळ यांचे अपघाती निधन झाले.  त्यांच्या चित्रशाळेतल्या मुर्ती अर्धवट असल्याने गुहागर तालुक्यातले सर्व मुर्तीकार एकत्र येऊन त्यानी उर्वरीत मूर्ती पूर्ण केल्या. इथे माझा पालशेतच्या प्रकाश मोरेंशी संपर्क आला. हा अवलिया मातीकामात मास्टर होता. गणपतीचे कोणतेही चित्र आणा, हुबेहुब मुर्ती रचण्यात त्यांचा हातखंडा होता. माझी रंगकला बघून त्यांनी मला आपल्याकडे संधी दिली.  ख-या अर्थाने मला इथे परिसस्पर्श झाला. हा परिसस्पर्श होता गिरगावच्या के.जी.मोरे गणेश चित्रशाळेच्या भाई मोरेंचा... गुहागरला एके ठिकाणी भाईंनी आखणी केलेली एक मूर्ती होती. मी ती मूर्ती पहायला गेलो. आखणी आणि तिच्यातला जिवंतपणा कसा असतो हे त्या दिवशी मला कळलं. एकदा नाही दोनदा पाहूनही समाधान नाही झालं म्हणून ज्यांनी ती मूर्ती घेतली होती त्यांच्याकडून तिचा फोटो मिळवला.  इथे माझ्या मनाने ध्यास घेतला की अशी आखणी मला करता आली पाहिजे.  जे.जे.स्कूलमधे शिक्षण झालेल्या भाईंकडे मी विचारणा केली की मला तुमच्या चित्रशाळेत संधी मिळेल का? भाई थोडे विचारात पडले कारण त्यांचे भाऊ श्रीकांत मोरे म्हणजे अस्सल कोकणी व्यक्तिमत्व.... एखाद्या शिवीशिवाय वाक्यच पूर्ण होत नाही यावर अपार श्रद्धा असणारे... यांचं जुळायचं कसं? पण काय जादू झाली मला माहित नाही पण आम्हा दोघांचं इतकं जुळलं की घराण्यातल्या काही कला ज्या फक्त त्याच घराण्यात पुढे नेल्या जातात, त्या कलेतील बारकावे इतर कोणाला शिकवले गेले असतील तर ते फक्त मलाच.... गणपतीचे रंगकाम करताना दोन गोष्टींवरच मूर्तीमधे जिवंतपणा येतो तो म्हणजे बॉडी कलर आणि आखणी. मोरेंकडे बॉडी कलर बनवण्यासाठी एक स्वतंत्र खोली होती, त्यात कोणालाही प्रवेश नसायचा. सहसा या गोष्टींसाठी फक्त चित्रशाळेचा मालक किंवा त्या घराण्याचा वारसदार यांचाच मान.. पण श्रीकांतजीनी त्यांचे व्यावसायिक गुपित उलगडताना कोणते कलर किती प्रमाणात घ्यायचे हे नुसतंच सांगितलं नाही तर त्यानंतर प्रत्येकवेळी ते माझ्याकडून करवून पण घेतलं.  दरवर्षी गुरुपौर्णिमेला भाई आणि श्रीकांतजीना गुरुवंदना करुन मी नारळीपौर्णिमेपर्यंत गिरगावला त्यांच्या चित्रशाळेत असायचो. हा रिवाज 1992 सालापासून अगदी 2015 सालापर्यंत चालू राहीला. नारळी पौर्णिमेनंतर आबलोली, गुहागर, अडूर, आरे, शीर, इ. ठिकाणच्या अनेक स्थानिक चित्रशाळांमधून आखणीच्या कामाला जाण्यामुळे इथेही स्वतंत्र ओळख होऊ लागली होती. अशा या रंगकामातलं दुसरं महत्वाचं अंग म्हणजे आखणी... सहसा ती कोणत्याही कारागिरासमोर केली जात नाही. आखणी करणा-याचं टेबल, रंग, ब्रश आणि जागा.. सगळंच वेगळं ठेवलेलं असतं. तोपर्यंत मी आखणी करायचो पण भाईंनी केलेली आखणी पाहिल्यावर आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे हे कळलं. आखणी करण्यात भाईंचा हात कोणीच धरु शकायचा नाही. झरझर चालणारा ब्रश काही कळायच्या आत सोंडेवर वेलबुट्टी आणि नक्षीकाम करुन मोकळा व्हायचा. आखणीतला सर्वात महत्वाचा आणि कठीण भाग म्हणजे मूर्तीचे डोळे. त्यातही गणपतीचे डोळे आणि सोबत असणा-या वाघ, सिंह, हत्ती, गाय, मोर आदी पशुपक्ष्यांचे डोळे यात प्रत्येकाच्या डोळ्य़ातले भाव निराळॆ. ते उमजणं आणि रेखाटणं म्हणजेच आखणीच्या कामातली पोस्ट पीएचडी. भाईंसारखी आखणी शिकण्याचा ध्यास मला गप्प राहू देत नव्हता. बसल्या जागेवरुन जे काही दिसेल, किंवा नंतर पूर्ण झालेल्या कामाचे निरिक्षण करुन जे काही उमजेल त्यावरच सारी भिस्त. जणू एकलव्याचीच शिकवणी. एक दिवस इतर कारागिर जेवायला गेलेले असताना मी सहज म्हणून पुढ्यातल्या मूर्तीच्या बैठकीवर एक डोळा रेखाटला आणि काम संपवून जेवायला गेलो. थोड्या वेळाने भाई चित्रशाळेत आले आणि तो डोळा पाहून गरजले, “ हा डोळा कोणी काढला?” मी जरा दबकतच पुढे झालो. हातात हात घेऊन प्रेमभरे त्यानी कामाची पावती दिली... इतकंच नाही तर सांगून टाकलं की आजपासून तू फक्त आखणीलाच बसायचं.  साक्षात गुरुनंच केलेल्या कौतुकानं मला कृतकृत्य झालं..... भाई एवढ्यावर थांबले नाहीत तर स्वत: उठून रंग, ब्रशसह मला घेऊन बसले आणि हाताला धरुन शिकवणी सुरु झाली. दरवर्षीचा हा रंगकामाचा आणि आखणीच नेम 2015 पर्यंत सुरु राहीला.  हळूहळू आखणीकार ही ओळख सर्वदूर होत गेली आणि लोकांचा आग्रह संपूर्ण मूर्तीच तुमच्या हातची हवी इथपर्यंत पोचला.  मित्र, नातेवाईक यांचा आग्रह मोडवेना आणि 2016 ला पहिल्यांदाच स्वत:ची चित्रशाळा सुरु झाली. पैशासाठी गुणवत्तेशी तडजोड नाही म्हणून वेळेची आखणी करुन तेवढ्याच मूर्ती बनवल्या. गंमत म्हणजे एक अपवाद वगळता इतर सर्व मूर्तींच्या रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी इतक्या दूरवरुन ऑर्डर्स आलेल्या. तीन फूट, पाच फुटाच्या मूर्ती या हातखंडा बनून गेल्या. सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची आखणी करणं आधीपासूनच सुरु होतं. यावर्षी मात्र लोकांनी खूप आधीपासूनच लकडा लावल्याने मूर्तींची संख्याही वाढली आहे, त्यात घरगुती छोट्या एक, दिड फूटाच्या मूर्तींचा पण सहभाग आहे. बहुधा पुढच्या वर्षी आहे ती जागा पण अपुरी पडणार अशी चिन्हं आहेत”. 
  

ज्या प्रकाश मोरेंमुळे ही पुढली वाट गवसली ते प्रकाश मोरे काळाच्या उदरात गडप झाले.  गुरुस्थानी असणा-या श्रीकांतजी आणि भाई या दोघांविषयी बोलताना राजेशजींची डोळे मधूनच ओलावत होते. किती बोलू असं होत होतं त्यांना... गणपतीच्या मूर्तीची सजावट हा एक स्वतंत्र विषय. मूर्तीचे सौंदर्य दागिन्यांच्या रुपाने आणखी खुलवता येतं.  राजेशजींच्या अर्धांगिनी सौ. ऋतुजा यांचा यात हातखंडा आहे.  मोती, विविधरंगी खडे, भिकबाळी लेवून मूर्तीचं ऐश्वर्य आणखीच उठून दिसतं. पर्यावरणपूरक मखरांची गरज लक्षात घेऊन दीर्घकाळ टिकणारी आकर्षक मखरं देखील त्यानी याच वर्षापासून ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहेत. गणेशोत्सवासाठी मूर्ती बनवण्याचा कालावधी वगळता उर्वरीत वेळात एलआयसी प्रतिनिधी म्हणून आबलोली पंचक्रोशीत पोचलेले, मृदूभाषी राजेश शिंदे (मोबाईल क्र.9421141551) यांच्या कलेला विनम्र प्रणाम. 







No comments:

Post a Comment