Friday, September 21, 2018

एका तस्करासाठी घरफोडी

पुण्यातील ऐन थंडीचे दिवस... विक्रमबरोबर पद्मावती परिसरात दुचाकीवर होतो. अचानक मोबाईल वाजला म्हणून गाडी बाजूला घेऊन तो फोनवर बोलु लागला.  जनवाडी परिसरात कोणाच्या तरी घरी साप शिरल्याची बातमी कळली.  आमच्या ठिकाणापासून अंतर बरेच असल्याने जवळच्या कोणालातरी पाठवावे असा विचार करेपर्यंत सापाचे वर्णन कानावर पडले... काळा रंग, अंगावर पांढ-या रेषा, संध्याकाळची वेळ --- मण्यार सापाची शक्यता गृहीत धरुन आम्हीच जायचं ठरवलं.... 
दुथडी भरुन वाहणा-या रस्त्यातून कसरत करत तब्बल पाऊण तासाने आम्ही तिकडे पोचलो तेव्हा काळ्यामिच्च अंधाराने आमचे स्वागत केले.  संपूर्ण एरियाचेच लाईट गेले होते.. ठायीठायी ठेचकाळत एकदाची सोसायटी शोधली अन फोन करणा-यांचा ठिकाणाही मिळाला.. समोरच्या ब्लॉकच्या दरवाज्याला लहान मुलांच्यासाठी लावलेल्या आडव्या फळीखाली साप असल्याची आणि तो विषारी मण्यारच असल्याची ग्वाही तळमजल्याच्या इतर ब्लॉकमालकानी दिली.  फळी उपसली तर खाली काहीच नव्हते.  महाराज बहुधा आत सटकले होते. दरवाज्याच्या फ़टीतून एकाक्ष नजरेने पाहिल्यावर लादीवरील धुळीत उठलेला नागमोडी पट्टा खात्री पटवून गेला.. दरवाजाचे लठ्ठ कुलूप उघडल्याशिवाय आत जाणे शक्य नाही म्हणून चावी मागितली तेव्हा कळले की तो ब्लॉक फोन करणा-यांपैकी कोणाचाच नव्हता.. मालक परगावी, मुलगा कंपनीत नोकरीला.. त्याचा ठिकाणा, फोननंबर कोणालाच माहित नाही.  तो येणार सेकंड संपवून रात्री दिडदोनच्या दरम्याने.. त्याला या प्रकाराची गंधवार्ताही नाही.. म्हणजे तो येईपर्यंत समोरच्या फँमिलीला जागणे मस्ट... भरीला आपण झोपल्यावर तो साप आपल्या ब्लॉकमधे शिरला तर? ही भिती होतीच.. गृहस्थ भलतेच काकुळतीला आले होते... काहीही करा पण साप पकडा हाच धोशा त्यांनी लावला.. साप पकडण्यापेक्षा या कुलपाचे काय करायचे हाच आमच्यापुढे गहन प्रश्न होता... "कुलुप तोडा" निर्वाणीचा सल्ला आमच्यावर आदळला.. या दोन्ही कुटुंबातील संबंधांची आम्हाला काहीच कल्पना नाही त्यामुळे कुलुप तोडणे हा उपाय की आपत्ती या विचारात आम्ही गुरफटलेले... शेवटी आमची अडचण त्यांच्या लक्षात आली. त्यांनी सोसायटीच्या सर्व सभासदांना एकत्र बोलावले आणि सर्वांची संमत्ती आमच्यासमोर ठेवली.. जबाबदारी घेतल्याचे लेखी देण्याचीही तयारी दर्शवली.. आम्ही गियर टाकला आणि कुलुपाशी झटापट सुरु झाली.  अनेक हल्ले, घाव सोसूनही कुलुप कडीकोयंड्यासकट सुखरुप... सगळ्यांच्या धसमुसळेपणामुळे दाराची चौकट मात्र पांढरे निशाण फडकवू लागली.  हे भलतेच होऊ लागले.. मग आमचा मोर्चा ब्लॉकच्या मागच्या बाजूने बाल्कनीकडे वळला.. मुख्य दरवाज्याच्या अभेद्य तटबंदीच्या मानाने ही बाजू अगदीच दुर्लक्षित होती. किचनची खिडकी उघडी होती, त्यातून सापाने मांडणीमधली पाडलेली भांडी दिसत होती.  चोर घरभर फिरल्याचे ठोस पुरावे होते.. खिडकी उघडी होती पण बाल्कनीचा दरवाजा मात्र आतून कडीत खिळा घालून बंदोबस्तात होता.  खिडकीतून हात घालून काठीने कडी काढायचे आंधळे प्रयत्न अगदी सर्वांनी करुन पाहीले पण कडी जाम... मुख्य दरवाज्याप्रमाणे हा दरवाजा पण घट्ट बंद पण चौकट मात्र भिंतीपासून काडीमोड घेऊन उभी. त्यामुळे ताकद लावून दरवाजा उघडणे आत्मघातकी होते. शेवटी चौसष्ट कलांंपैकी एक कला वापरण्याच्या दृष्टीने नजर फिरवली.. दरवाजाच्या आतल्या कडीला लावलेले बुगडी बोल्ट आतून बाहेर आलेले होते.. त्याचे नटही बाहेरच्याच बाजूला होते.. पक्कड घेऊन सगळे नट काढले तशी आतली कडी कुलुपबंद राहून दरवाजा मात्र उघडला... सर्वत्र शोधाशोध केली तेव्हा ओट्याखाली महाराज ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यांचा यथोचित पाहुणचार करुन आम्ही केलेल्या घरफोडीची पुढील निरवानिरव संबंधितांवर सोपवली.. सगळ्यांची पाचावर धारण बसवणारा, आम्हाला पांढरपेशा जीवनातून उचलून घरफोडीला उद्युक्त करणारा तो साप मण्यार नसून बिनविषारी असा तस्कर जातीचा साप आहे हे ऐकून सगळ्यांचे चेहरे पुढील दिव्य पार पाडण्याच्या कल्पनेने कसनुसे झाले... घरमालकाला विषारी सापाच्या तावडीतून वाचवले असे म्हणता येणार नसल्याने त्यांचे झालेले विनोदी चेहरे नेमक्या त्याच वेळी आलेल्या लाईटच्या प्रकाशात पहात आम्ही कलटी मारली..
-- मनोज भाटवडेकर

Image result for trinket snake

  

3 comments:

  1. खूप जुना प्रसंग आहे....

    ReplyDelete
  2. Head Titanium Ti S6 | TiG
    The head titanium tiamin alloy provides solid steel oxide inclusions. titanium dioxide It is thinkpad x1 titanium suitable for the titanium car top plate of the head, head, and spine. titanium mens wedding band The material used in Weight: titanium earrings 300 gPowder Type: Combination Pack

    ReplyDelete