Tuesday, March 10, 2020

आमची लडाखवारी - भाग २


समुद्रसपाटीपासून सुमारे ११००० फूट उंचीवर लेह शहर सभोवताली उंच पहाड आणि मधे बशीच्या आकारात वसलेले आहे. लेहमधील प्रसिद्ध ठिकाणांबाबत माहिती घेण्यापूर्वी लडाखच्या इतिहासात थोडसं डोकवावे लागेल.  लडाखी राजवंश नामग्याल या घराण्याने 15 व्या शतकाच्या मध्यापासून अगदी 1842 च्या डोग्रा राजांच्या अंतिम आक्रमणापर्यंत लडाखवर राज्य केलं. या कालखंडात अनेक नामवंत नामग्याल राजे होऊन गेले, पैकी तशी नामग्याल हा विशेष दखल घेण्याजोगा. मुस्लिम आक्रमकांची नामग्याल साम्राज्यावरची आक्रमणं परतवून बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन व जतन तर केलेच पण नवनव्या बौद्धमठांची उभारणी (monestaries) त्याने केली.  सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात Tsemo fort मूळचा राजमहाल राँयल पँलेस याची उभारणी पण त्याने केली.  त्याच्या नंतर गादीवर आलेला सेंगे नामग्याल याची कारकिर्द आणखी दैदिप्यमान राहीली. अनेक कल्याणकारी योजना, महत्वाकांक्षी बांधकामे त्याने केली. त्याने केवळ तीन वर्षांत नऊ मजली लेह राजवाडा बांधला अशी माहिती उपलब्ध आहे. ल्हासा येथील प्रसिद्ध पोताला राजवाड्याशी साधर्म्य असणारा हा राजवाडा सध्या पुनर्रचनेसाठी बंद आहे. 
सेंगे नामग्याल ने लेहचं सिल्करुटवरील महत्त्व ओळखलं आणि आपली राजधानी शे वरुन हलवली आणि ती लेहला आणली. सेंगेच्या कारकिर्दीत लेहचं व्यापारी महत्त्व वाढतंच गेलं ते अगदी 1834 मधे डोग्रा राजांनी आक्रमण करेपर्यंत. 1834 ते 1842 तत्कालीन नामग्याल राजाने डोग्रांना झुंजवलं पण अखेर डोग्रांनी नामग्याल राजांना हरवलं. राजा पकडला गेला आणि त्याला स्तोक येथे बंदीवासात ठेवलं गेलं. डोग्रा आक्रमणात कमालीचा उध्वस्त झालेल्या लेह राजवाड्याची दुरुस्ती अलिकडच्या काळात हाती घेण्यात आली.
लेहमधील दुसरी ठळक वास्तू म्हणजे जामा मस्जिद 1685 मधे बांधली गेली. नामग्याल घराण्यातला एक शासक डेलेग नामग्याल याने तिबेट प्रांतामधे लुडबूड सुरु केली. तिबेटी सैन्याने जोरदार प्रतिकार करताना  डेलेगच्या बलस्थानाला म्हणजे बासगोला वेढा घातला. पराभवाच्या भितीने डेलेगने मोंगलांना साकडं घातलं. त्यांनी डेलेगची सुखरुप सुटका केली पण त्याची किंमत डेलेगला मुस्लिम धर्म स्विकारुन चुकवावी लागली आणि अशा रितीने मध्य आशिया आणि भारत यांना एकमेकांपासून विलग करणाऱ्या हिमालय आणि काराकोरम पर्वतराजींच्या मधे वसलेल्या लेहचे व्यापारी महत्त्व उत्तरोत्तर वाढतच गेले.  यारकंद व खोतन या व्यापारी केंद्रातून भारताकडे चालणाऱ्या व्यापाराला लेह हे विश्रांतीस्थान म्हणून मिळाले. एकावेळी दहा दहा हजार घोडे सोबत घेऊन व्यापारी काफिला चालायचा, यावरुन या मार्गावरील संपन्नता लक्षात येईल. 1949 पर्यंत हा आलेख उंचावतच राहीला परंतु पाकीस्तानने काश्मीर मधे घुसखोरी केल्यानंतर हा व्यापार कायमचा थंडावला तो आजवर. या दरम्यान यारकंदचे हजारो मुस्लिम लेहमधे अडकले ते शेवटी लेहजवळच्या चुशोतजवळ वसले. त्यामुळे लेहमधे बौद्ध धर्मियांच्या सोबत मुस्लिमांची पण संख्या नजरेत भरते. यासोबतच आणखी एक व्यापारी मार्ग त्याकाळी अस्तित्वात होता तो म्हणजे तिबेट ते श्रीनगर.  तिबेटहून उच्च दर्जाची पश्मिना लोकर लडाखच्या पूर्व भागातून लेहमार्गे कश्मीरला पाठवली जायची. कश्मीरमधले कुशल विणकर या लोकरीपासून शाल, स्वेटर तयार करायचे.
ला डाख म्हणजे खिंडींचा प्रदेश पुढे अपभ्रंशित होत लडाख, लद्दाख म्हणून ओळखला जातो. याचा सहसा उच्चार लेहलडाख असा करतात पण तांत्रिकदृष्ट्या हे चूक आहे. जम्मू कश्मीर राज्याचा सर्वात उत्तरेकडचा विभाग लडाख, ज्याचे मुख्यालय लेह हे आहे. जम्मू, कश्मीर आणि लडाख अशा तीन विभागात विभागलेले हे भारताचे मुकुटमणी राज्य. लडाखची पूर्व बाजू चीनने बळकावली तर पश्चिम बाजू पाकीस्तानने. परंतु सामरिकदृष्ट्या महत्वाच्या सियाचीन हिमनदीवरील आपल्या कब्जामुळे या दोन्ही देशांवर आपला धाक आहे. नुकत्याच घडलेल्या कलम 370 रद्द करण्याच्या कृतीमुळे लडाख आता केंद्रशासित प्रदेश झाला असून जम्मू कश्मिरपासून त्याची सुटका झाली आहे. केंद्रशासित प्रदेश झाल्या झाल्या भेट देणारे कोकणातील बहुधा पहिले आम्हीच असावेत.
लडाखमधे 77% जनता बौद्धधर्मिय तर 14% मुस्लिम, 8% हिंदू आणि 1% इतर आहेत. इथे बहुतांश जण भोटी अथवा बोधी ही लडाखी भाषा जी मूळची तिबेटी भाषा बोलतात, मात्र पर्यटनामुळे हिंदी आणि इंग्रजी देखील उत्तम बोलली जाते.  Julley म्हणजे नमस्ते म्हणत आपलं स्वागत होतं पण आजकाल julley हा शब्द निरोप घेताना पण वापरला जातो. सिंधू नदी ही लडाखमधून वाहणारी प्रमुख नदी.. जी तिबेटमधील मानसरोवर जवळ उगम पावून चीन, भारत आणि पाकिस्तान मधून सुमारे 3180 किमीचा प्रवास करत समुद्रास मिळते. 
झंस्कारमधे उगम पावणारी सुरु नदी कारगिलजवळ द्रास नदीला मिळते.
नदीचं मूळ शोधू नये म्हणतात पण झंस्कार नदीचं मूळ खूपच रोचक आहे.. झंस्कार नदीला दोन फाटे आहेत. पेन्सी खिंडीतून उगम पावणारी दोडा नदी हा एक फाटा तर दुसऱ्या बाजूला शिंगू खिंडीत उगम पावणारी करग्याग नदी व बारालाच्छा खिंडीत उगम पावणारी त्सरप नदी यांच्या संगमातून निर्माण झालेली लुंगनाक नदी. अशी ही झंस्कार नदी हिवाळ्यातील चदर ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे. मरखा खो-यातून वाहणारी मरखा नदी आपला जलसाठा झंस्कार नदीला अर्पण करते. पुढे ही झंस्कार नदी निमूजवळ सिंधू नदीला मिळते. नुब्रा खो-यातून वाहणारी नुब्रा नदी सियाचेन हिमनदीतून उगम पावते व उत्तर लडाखमधून वाहते. पुढे श्योक नदीशी तिचा संगम होतो आणि दोन्ही नद्यांचा प्रवाह पाकीस्तानमधे स्कर्डूजवळ सिंधू नदीला मिळतो. थोडक्यात लडाखच्या विविध भूप्रदेशात उगम पावलेल्या अनेक नद्या शेवटी सिंधू नदीला मिळतात आणि पुढे पाकीस्तानचा प्रदेश समृद्ध करतात.

मनोज
०६.०८.२०१९

आमची लडाखवारी - भाग १




"ए मनोजकाका, आपण जाऊया ना लडाखला... तू काढ ट्रीप "..   मयुरी, माझ्या पुतणीने अगदी पिच्छा पुरवला होता. "चालेल.. खरंच जाऊया"... असं म्हणायची माझी ही तिसरी वेळ. पण यावेळी मात्र मी खरोखर मनावर घेतलं. श्रीनगर आणि लेह या दोन्ही ठिकाणी माझे टूर आँपरेटर मित्र आहेत. दोघांकडून खर्चाचा अंदाज घेतला पण विचार केला की लडाख करायचं तर आँपरेटर श्रीनगरचा इतक्या लांबचा कशाला? शेवटी तो आपल्याला लेह आँपरेटरच्याच हवाली करणार. लेहला रशीद माझा मित्र टूर आँपरेटर पण सध्या तो माऊंटेनिअरिंगमधे घुसल्याने त्याचा भाऊ जुमाकडून डिटेल्ड प्लँन केला पण का कोण जाणे काहीतरी खुपत होतं. अचानकपणे माझा जुना स्नेहसंबंध आठवला, नितीनला फोन केला. त्याने खूपच उत्साह दाखवला.  इतर टूर आँपरेटर जे करत नाहीत ते आपण करु हाच दोघांमधला समान धागा ठरला.. प्रवासाची आखणी जशी ठरली तशी मेंबर संख्या पण वाढत चालली. 
५ आँगस्टच्या रात्री ९ जण मुंबईहून तर ५ जण पुण्याहून विमानाने श्रीनगर पुढे गाडीने कारगिल, लेह, खारदुंग, नुब्रा व्हँलीतील तुरतूक हे सीमावर्ती ठिकाण, परत येऊन श्योक व्हँलीतून पँगाँग, परतीच्या प्रवासात चांगला पासमधून कारु, आणि लेह असा प्रवास ठरला. अर्थात लडाख म्हटलं की कागदावरचा प्रवास हा फक्त कागदावर राहतो.  सतत अपग्रेडेशन ठेवायची तयारी नसेल तर हाल होतात याचे प्रत्यंतर आम्हाला पण चुकले नाही. 02 आँगस्ट 2019 ला अचानकपणे एक अधिसूचना प्रसिद्ध झाली, ज्यात पर्यटकांनी काश्मीर खोरं तातडीने सोडावं असा स्पष्ट उल्लेख होता...
कारणांबाबत गोंधळ असल्याने काहीच भाष्य करता येत नव्हतं... Wait and watch एवढंच हाती होतं पण प्रवासाची तारीख अगदी जवळची असल्याने मनावर अनिश्चिततेचं सावट होतं. संपूर्ण दिवस असाच गेला. तीन तारखेला मी प्रवासात होतो. कश्मीरमधे काय घडतंय आणि घडणार आहे याची एव्हाना कल्पना आली होती. काश्मीर पूर्णपणे वगळून प्रवास करायचा हाच एकमेव मार्ग उरल्याने दिल्ली ते श्रीनगर या प्रवासाऐवजी दिल्ली लेह असा प्रवास ठरवला. पण् म्हटलं ना, लडाखचे प्रवास कागदावर सोपे  वाटतात... तीन तारखेपासून पावसाने सर्वत्र थैमान सुरु केले. महत्वाच्या मिटींगसाठी मी कोल्हापूरला होतो, परतीच्या प्रवासात रस्त्यामधे तीन ठिकाणी पडलेल्या झाडांमधून मार्ग काढत रात्री उशिरा चिपळूण गाठलं...
  

  
चार तारखेची सकाळ उजाडली तीच रात्रभर न थांबलेल्या पावसाने मुंबई रस्ते बंद झाल्याची बातमी घेऊन. त्यात भर पडली ती दरड कोसळून कोकण रेल्वे बंद झाल्याची.  पावसाने मुंबईची अगदी तुंबई झालेली.  हतबुद्ध व्हावे अशी परिस्थिती निर्माण झालेली. मुंबईला पोचणेच अशक्य वाटू लागले. तसंही दिल्ली लेह तिकीटं काढायचीच होती. सरकारी कृपेने जातानाची तिकीटं चार्जेस न लागता रद्द होणार होती. पटकन निर्णय घेतला आणि मुंबई ऐवजी पुणे लेह अशी तिकीटे काढायची असं ठरवून आँफिस गाठलं... पावसाने मुसळधार रुप सोडून जणू ढगफुटीचा अवतार धारण केला होता. हा हा म्हणता चिपळूणात पाणी भरलं आणि ते माझ्या आँफिसच्या पायरीजवळ आलं... लँपटाँप, प्रिंटर उचलून गाडीत टाकला आणि त्या भरलेल्या पाण्यातून गाडी घराकडे दामटली.



महत्प्रयासाने एकदाची आम्हा नऊजणांची तिकीटं निघाली तर पुण्याच्या पाचजणांची त्याच विमानाची दिल्ली लेह तिकीटं पण काढून झाली. आता मी अगदी आत्मविश्वासाने सगळ्यांना सांगितले की उद्या आपण पुण्याहून थेट लेहला जातोय आणि श्रीनगर वगळता उर्वरित सर्व कार्यक्रम आता ठरल्याप्रमाणे पार पडेल... पण....
५ आँगस्टची सकाळ जास्तच चिंताजनक होती.. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाल्याने कराड रोड किमान तीन ठिकाणी पाण्याखाली होता.. ताम्हिणी घाट दरड कोसळल्याने बंद झालेला तर आंबा मार्गे कोकरुड रस्ता मलकापूर जवळ पाण्याखाली होता. वरंधा आणि महाबळेश्वर कडून जायचं तर जगबुडी पूल केव्हाही बंद होण्याची शक्यता... अर्थात रेल्वेरस्त्याने जाऊन खेड मधून बाहेर पडण्याचा आँप्शन असल्याने त्याचं एवढं संकट वाटत नव्हतं.. आमच्या खेडच्या मंडळींना तिकडेच थांबवून आम्ही चिपळूण सोडलं.. जगबुडी ओलांडली आणि हुश्श झालं.. खेडवाले स्थानापन्न झाले आणि कशेडीदरम्यान वरंधा बंद झाल्याचे कळले. एकमेव तारणहार आंबेनळी घाट धुवाँधार पावसातून पार केला. एरवी एन्जॉय करावं असं दाट धुकं, पण आज तिकडे लक्षही नव्हतं.. कधी एकदा NH4 ला लागतोय असं झालं होतं.
वेण्णा लेकजवळ ओसंडून वाहणारं पाणी रस्ता ओलांडून शेताडीत पसरत होतं पण आमच्या गाडीला अडवू नाही शकलं... पाचगणी ओलांडून पसरणी घाटाला लागलो तेव्हा छान उन्हं पसरली होती... वाई मागे टाकत NH4 ला लागलो आणि आम्ही सुssटssलो....
वाई फाट्यावर पोटपूजा केल्यावर आस्ते कदम पुण्याकडे निघालो.. साधारणपणे साडेपाचला पुण्यात पोचल्यावर विमानाच्या वेळेपर्यंत करायचं काय हा प्रश्न माझ्या मोठ्या बहिणीने पद्माताईने परस्परच सोडवून टाकला.. चहा, विश्रांती, पुन्हा चहा, गप्पा आणि मग जेवण करुन एअरपोर्ट असं शेड्यूल तिनंच फायनल करुन टाकलं.. तिच्याकडे पोचल्यावर आजवरचा ताण एकदम कमी झाल्याने गात्रं सैलावली... थोडीफार डुलकी पण मिळाली.. घरच्यांचा निरोप घेऊन आम्ही एअरपोर्टवर पोचलो... 
जसजशी वेळ जवळ येत गेली तसतसे एकेक मोहरे जमा होत गेले.. पुणेकरांचे विमान आमच्या पाठोपाठच सुटणार होते पण आयत्यावेळी ते तासभर लेट असल्याची घोषणा झाली.. आमच्यावरचं किटाळ तिकडे सरकलं होतं बहुधा... अर्थात पुढील विमानाच्या वेळेमधे पाच तासांचं अंतर असल्यामुळे या उशिराची काळजी नव्हती... 
यथावकाश आमचं विमान सुटलं... प्रत्येकाने झोपेची थकबाकी वसूल करायला सुरुवात केली पण अतिश्रमाने देखील झोप येत नाही... दिल्ली येईपर्यंत मी जागाच होतो.. टाईमपास म्हणून खिडकीच्या काचेला नाक लावून खाली काही दिसतंय का या निष्फळ प्रयत्नात वेळ जात राहीला...
पहाटे पोटात खड्डा पाडण्याचा कार्यक्रम पार पाडत विमान जमिनीला टेकलं.. आमच्या नऊजणांपैकी सहा जणांचं लगेज थेट लेहला मिळणार होतं पण बाकी तीन जणांना सामान कलेक्ट करुन पुन्हा चेक इनचा सव्यापसव्य पार पाडायला लागणार होता... पुणेकर दुसऱ्या टर्मिनलवरुन इकडे येणार होते म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत उभे राहीलो..
एअरपोर्टवरच्या चहाचे दर पाहून कोणाच्याच घशाला त्याची कोरड पडेना पण शेवटी वन बाय टू करत नरडं जरा शेकलं. सुदेशने मात्र एका स्टाफमेंबरला हरभ-याच्या झाडावर चढवून त्यांच्या कँटीनमधला चहा स्वस्तात पदरात पाडून घेतला. बघताबघता एअरपोर्टवर गर्दी वाढली तशी आम्ही निमूटपणे चेक इनचे सोपस्कार पार पाडून विमानात बसलो.. सुरुवातीला ढगातून आणि मग पावसाच्या थेंबातून मार्ग काढत विमान चाललं... काही वेळाने मात्र हवा एकदमच स्वच्छ झाली आणि पायाखाली बर्फाच्छादित पर्वतशिखरं दिसू लागली.. ते विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रत्येकालाच खिडकी हवी होती... विमान ब-यापैकी रिकामं असल्याने सर्वांची तीही इच्छा पूर्ण झाली.. खाली मनाली लेह हायवे दिसू लागला आणि लेह जवळ आल्याचे कळले.. वाळवंटी प्रदेशातील हिरवळीचे पुंजके आणि त्याआधारे वसलेल्या वस्तीच्या खुणा मागे टाकत विमानाने लेह शहरावर घिरट्या घातल्या आणि कोणाला कळायच्या आत स्पितुक मोनेस्ट्रीच्या बाजूने विमानाने धावपट्टीवर सूर मारला..
सर्वाधिक उंचीवरील धावपट्टी असा लौकिक असणारी आणि लष्करी वापराची व मालकीची ही धावपट्टी लांबीला तुलनेत लहान आहे..  एअरपोर्ट इमारत पण तशीच छोटीशी आहे.. बाकी सोपस्कार पार पाडून बाहेर आलो तर दोरजी मला पाहून जुले सर करत पुढे आला.. जुले म्हणजे लडाखी भाषेत नमस्ते... टपावर बँगा चढवून गाडी हलली... हाँटेल खारदुंग ला च्या दारात आमच्या स्वागतासाठी एक सरप्राईज उभं होतं... घरापासून चार हजार किमीवर एक मराठी माणूस आमच्या स्वागतासाठी उभा होता. आपटेकाकांनी सर्वांचे स्वागत करुन चहा देतानाच काही महत्त्वाच्या सूचना व समुद्र सपाटीपासून ११००० फुटांवर घ्यायची काळजी याची माहिती दिली... 
आजचा दिवस हा फक्त लोळून काढायचा असल्याने जेवण झाल्यावर मंडळी जी विसावली ती एकदम संध्याकाळीच उठली.. इतक्या उंचीवर आँक्सिजन कमतरतेमुळे पुरेशी विश्रांती आणि भरपूर पाणी आवश्यक असते.. माऊंटन सिकनेस टाळायचा असेल तर या गोष्टी मस्ट... संध्याकाळचा चहा पिताना टिव्हीवर काश्मीरमधील धामधूम पाहत होतो तर लडाखमधला आनंद अनुभवत होतो... जरावेळाने पाय मोकळे करायला बाहेर एक फेरफटका मारुन परतलो..
उद्याचा दिवस स्थानिक टुरिस्ट स्पाँटचा होता.. थोडं उशिरा निघायचं असल्याने रात्री आमची अंताक्षरी चांगलीच रंगली... जशी थंडी वाढली तशी मात्र बैठक आवरती घेऊन सगळेजण झोपेच्या कुशीत शिरले...

मनोज

०६.०८.२०१९

(क्रमशः)