॥ श्री ॥
उभाभ्याम् उतते नमो।
उभाभ्या मुतते नमो।
उभाभ्याम् उतते नमो।
उभाभ्या मुतते नमो।
कोणाचा बापूस मुततोय उभ्यानं?... भिकारभांचोद साले..
चारवेळा सांगितले "उभाभ्याम् उतते नमो" तरी पुन्हा "उभाभ्या मुतते?..." अण्णा कडाडले.
घनुअण्णांकडे रुद्राची संथा घेणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी अशा शिव्या खाल्ल्याशिवाय आपली रुद्राची संथा पूर्ण केलीच नसेल.
उभाभ्या मुतते नमो।
उभाभ्याम् उतते नमो।
उभाभ्या मुतते नमो।
कोणाचा बापूस मुततोय उभ्यानं?... भिकारभांचोद साले..
चारवेळा सांगितले "उभाभ्याम् उतते नमो" तरी पुन्हा "उभाभ्या मुतते?..." अण्णा कडाडले.
घनुअण्णांकडे रुद्राची संथा घेणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी अशा शिव्या खाल्ल्याशिवाय आपली रुद्राची संथा पूर्ण केलीच नसेल.
पागेवरची जोशी आळीतील
ब-यापैकी भिक्षुकांची घरं.. पण केवळ भिक्षुकीच करावी म्हणून नाही तर जिभेला चांगलं
वळण लागावं, जोडाक्षरांमुळे वाणी शुद्ध
व्हावी यासाठी सुरुवातीला अगदी रामरक्षेपासून ते संपूर्ण याज्ञिकीपर्यंत
संध्याकाळी मुलांना कोणाकोणाकडे पाठवलं जायचं. जसा घरोबा तशी मुलांची संख्या
असायची. पण रुद्र, महिम्न इ.साठी घनुअण्णाच..
त्याकाळी चातुर्मासात वामनभटजींसारखी दिग्गज मंडळी पागेमधे वास्तव्यास असायची.
तीही मंडळी वैदिक सूक्तं शिकवायची. पण वर्षभराचं व्रत फक्त अण्णांनी पत्करलं होतं.
कृष्णेश्वर मंदीराला लागूनच
घनःशाम वासुदेव उर्फ घनुअण्णा भागवत यांचं घर... पुलं म्हणतात तसं, मूळ नावाने
आमच्याकडे फारसं कोणी कोणाला संबोधत नाही. त्यामुळे हाक मारायच्या नावाचं, त्या मूळ नावाशी आणि त्यातून
व्यक्त होणाऱ्या स्वभावाशी सख्य असेलच याची खात्री नाही. आम्ही मुलं सुटीमधे
देवळात पत्ते खेळायचो. शेजारी अण्णांचं घर आहे याची जाणीव सुरुवातीच्या काही
डावांनंतर सुटायची आणि आवाजाने झोपमोड झालेले अण्णा दबक्या पावलाने देवळात
शिरायचे. अण्णा आले हे कळेपर्यंत उशीर व्हायचा आणि मग दाणादाण उडायची. कोणाची तरी
गचांडी धरली जायची, त्यानंतर मग अ ते ज्ञ
पर्यंतच्या शिव्यांची लाखोली आणि कधीतरी तोंडी लावायला पाठीत धपाटा बसायचा. जी गत
पत्त्याच्या खेळाची, तीच डबा ऐसपैसची.
रस्त्याच्या पलिकडे देवळाचं परडं, तिथेच क्रिकेट खेळायचो, विटीदांडू खेळायचो.. पण लोखंड जसं लोहचुंबकाकडे खेचलं जातं ना, तसे आमचे बाँल, विट्या त्यांच्या घराच्या
अंगणात जायचे. परत आणायला वाघाच्या गुहेत कोण जाणार, पेक्षा
वस्तू नवीन आणण्याचाच मार्ग सोपा असायचा. एकंदरीत काय, आमच्या बालजीवनात घनुअण्णा म्हणजे शोलेतले गब्बरसिंग किंवा
मि.इंडियातले मोगँबो.... हो, खरंतर मोगँबोच जास्त शोभले
असते.
अशा परिस्थितीत एकदा ती काळीकुट्ट संध्याकाळ
उजाडली. गीतेचे अध्याय शिकण्यासाठी
आम्हा भावंडांची रवानगी अण्णांकडे झाली. रस्त्यावरुन आठदहा भक्कम पाय-या उतरुन
प्रशस्त अंगण पार करुन ओटीवर बसायचं. पाय-या उतरण्यापूर्वी डाव्या हाताला रामाचं
छोटेखानी मंदिर होतं. अंगणात खाली उतरताना बाजूला चाफ्याची झाडं होती. संध्याकाळी
चाफ्याचा छान वास पसरलेला असायचा. रामाचं दर्शन घेऊन कृष्णाचे उपदेश मुखी घटवण्यासाठी या
घनःश्यामासमोर मी आणि माझी बहीण स्थानापन्न झालो. गाडी दोन स्टेशनं पार करुन
तिसऱ्या अध्यायावर आली आणि आमचं दैव फिरलं. रामाच्या देवळाच्या मागे एक कुत्री
व्यायली होती. आठपंधरा दिवसाची ती पिल्लं आम्ही गीता म्हणायला लागलो की केकटायला
लागायची आणि आम्ही खुदखुदू हसायचो.. चारदोनदा आमचं खिखिखीखी ऐकून शीघ्रकोपी
अण्णांनी आम्हाला अक्षरशः हाकलून दिलं आणि कृष्णाच्या उपदेशाला आम्ही मुकलो.
एकंदरीत काय, अण्णा आमच्या मनातली
त्यांची खलनायकी भुमिका हटवू शकले नाहीत. आम्ही मोठे होत चाललो आणि मग मात्र हा
बरक्या फणसासारखा असणारा माणूस नव्याने कळत गेला.
घनुअण्णानी लष्करात नोकरी
केली होती, ती दुसऱ्या महायुद्धानंतर सोडली. निवृत्तीनंतर आपल्या घरी गुरंढोरं, शेती, बि-हाडकरुंची भाडी आणि अगदी
नंतरच्या काळात अल्पशी पेन्शन यावर गुजराण होत होती. सोबतीला अण्णांनी अनेक
उद्योगधंदे केले, उद्योगधंद्यांप्रमाणेच अनेक
नोक-या पण केल्या. मात्र प्रत्येक ठिकाणी स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा किंवा सचोटी हे दुर्गुणच ठरले.
अण्णाना तीन मुलं.. माधव, मुकुंद, आणि मंगल. माझ्या कळत्या वयात मुकुंददादा नोकरीमुळे मुंबईत, मंगलताई लग्न होऊन ती पण मुंबईलाच.. माधवदादा वीजमंडळातल्या
नोकरीमुळे चिपळूण, दापोली, रत्नागिरी इथे राहीला. माधवदादाला नोकरी लागली आणि घरची आर्थिक घडी सुधारली. आमची काकू मंगलची आई याच संबोधनाने प्रसिद्ध. मुलं चिपळूणच्या बाहेर असल्याने या दोघांच्या
सोबतीला घराच्या पडवीला बि-हाडं असायची. कालांतराने "आपल्याला एवढी जागा कशाला" म्हणून अण्णानी आपलं बि-हाड
पडवीला हलवलं आणि राहती प्रशस्त जागा वीजमंडळाच्या एका कार्यालयाला भाड्याने दिली.
एकंदरीत अण्णांचं छान चाललं होतं. सुस्पष्ट वाणी आणि वकिली मुद्दे यामुळे एखाद्याला सहजतेने बोलण्यात
अडकवायचे पण तितक्याच आपुलकीने दोन कुटुंबात मध्यस्थी पण करायचे. त्यांनी कधी
कोणाचं वाईट चिंतलं नाही, आणि केलंही नाही.
टिपिकल कोकणी शिडशिडीत
देहयष्टी, दंताजीचे ठाणे उठलेले, तोंडातल्या कवळ्या खुळखुळवत न्यम् न्यम् करत बोलण्याची स्टाईल, डोक्यावर मोजके पण स्वभावाप्रमाणेच ताठ केस, आळीच्या बाहेर फारसं बाहेर कुठे जाणं नसल्यामुळे चट्टेरी पट्टेरी
अर्धी चड्डी, पैरण, हातात काठी आणि खांद्यावर टाँवेल हा कायमचा ड्रेस. कधीकधी चड्डीऐवजी
उभे लावल्यागत अर्ध धोतर. रात्रीच्या वेळी चार सेलची स्टीलची बँटरी या सगळ्या
साजात अँड व्हायची. बाजारात जाताना किंवा एखाद्या समारंभात जाताना मात्र त्या
देहाला इतर कपडे चिकटायचे. जिभेला स्पष्टवक्तेपणा पेक्षाही फटकळपणाचीच बाधा जास्त
आणि सोबतीला शिव्यांची खैरात, तशी ती बहुतांश कोकणी
माणसाकडे असतेच. गावात येणंजाणं सगळ्यांकडे होतं पण हा माणूस स्वतःमधेच जास्त
रमला. लष्कराच्या नोकरीमुळे वारुणीचं आणि सामिषाचं अजिबात वावडं नव्हतं.. त्यामुळे इतरांना काय वाटेल ही बाब त्यांनी आयुष्यभर फाट्यावरच
मारली.
माझ्या वयाच्या बावीस तेवीशीत
मला रुद्र शिकण्याची उपरती झाली. तोपर्यंत अण्णांचं भय वगैरे उरलं नव्हतं.
त्यामुळे पावलं तिकडेच वळली. "आता कुठला तू रुद्र शिकणार... छट्.."
अण्णा नाही म्हणून मोकळे झाले. संध्याकाळची आचमनं सुरु होती म्हणून मी विषय वाढवला नाही पण दुसऱ्या दिवशी "ती"
संध्या सुरु व्हायच्या आधीच अण्णांना गाठलं. "मी आजवर रुद्र शिकवायचे कधी
पैसे घेतले नाहीत. चारपाच डझनाहून जास्त पोरं शिकवली पण हल्ली शिकायला येणारा
रुद्र अर्धवट टाकून जातो आणि मी इथे माझी कामं टाकून उपटत बसतो... तेव्हा जमणार
नाही.. एखाद्या दिवशी येणार नसलास तर आधल्या दिवशी सांगायचं..."या आणि अशा
असंख्य अटी व दक्षिणा ठरल्यावर माझा रुद्र सुरु झाला. अण्णांच्या पद्धतीने किमान
साडेतीन महिने अपेक्षित असताना तीनच महिन्यात माझा रुद्र शिकून पूर्ण झाला.
शिकवण्याची पद्धतही अगदी परंपरागत.. संधीविग्रह करत ऋचा सोडवून मुखोद्गत करायची.
सलग सात दिवस म्हटली की वज्रलेप होते असं सतत सांगायचे, त्यामुळे रोज आधी घेतलेल्या संथेचे पठण, मग पुढची ऋचा असं सात दिवस चालायचं. लघुगुरु स्वर, त्यानुसार हाताची आणि मानेची हालचाल करायला अण्णानी शिकवलं. पुढचं
अक्षर -हस्व असेल तर मागचं अक्षर दीर्घच म्हणायचं तरच पुढचं -हस्व येतं, शब्दानंतर विसर्ग असेल तर पुढच्या अक्षराचा उच्चार विसर्गाऐवजी
करायचा, शब्दाच्या शेवटी अनुस्वार असेल तर त्याचा उच्चार
पुढील अक्षरानुसार बदलतो हे पहिल्याच ऋचेत शिकवल्यामुळे मला पुढे कठीण गेलं नाही.
हरि:ओम् इडादेवहूर्मनुर्यज्ञनीर पासून सुरु झालेली रुद्राभ्यासाची माझी गाडी दरमजल करीत भौवनश्चभुवनश्चाधिपतिश्च ला जाऊन पोचली. पुढे पुरुषसूक्त, श्रीसूक्तही शिकवून झालं. कधीतरी कोणीतरी म्हटलेलं माझ्या लक्षात होतं की सौरसूक्त शिकायला खूपच कठीण. अण्णांचा मूड बघून हळूच विचारलं.."शिकवाल का?".."छट, आजवर दहाबारा जण अर्धवट टाकून गेले. एकच शिकला. आता बास" पण मीही चिकाटीने आग्रह करत राहीलो.
अखेरीस पूर्वीच्याच अटींवर सौर शिकणं सुरु झालं. खाडा न करता जात राहिलो आणि सौर
पूर्ण केल्याचा आनंद माझ्यापेक्षा अण्णांंना जास्त झाला. शेवटच्या दिवशी उठताना
नमस्कार करुन बाहेर निघालो तर हाक मारुन परत बोलावलं, उशीखालचे पैसे हातात कोंबून म्हणाले "हे तू दिलेले पैसे. मला
मिळतं ते पुरतं, पण विद्यादानम् अशिष्याय न
देयम् म्हणून तुझ्या चिकाटीची परिक्षा पाहिली." पुन्हा एकदा वाकून नमस्कार
केला आणि बाहेर पडलो.
रुद्र शिकवण्याच्या निमित्ताने
त्या घरात रुद्राची इतकी आवर्तनं झाली होती की घरातल्या आणि बि-हाडातल्या माणसांना
वेगळं शिकवावंच लागलं नसेल. एकदा असंच अण्णा काकूवर भडकले होते, शब्दानं शब्द वाढला आणि "रुद्रातलं काय कळतं तुम्हाला” असं म्हटल्याबरोब्बर काकूनं खणखणीत आवाजात एक दोन
नमक दणकवले आणि त्यांच्या पुढ्यातला ग्लास उचलून निघून गेली. अण्णांची रोज रुद्र शिकवताना इतरही काही आचमनं चालायची, पण कधी स्वर किंवा शब्द
चुकला नाही. सगळी वैदिक सूक्त मुखोद्गत असल्याने पोथीत बघूनही कधी शिकवावं लागलं
नाही.
एकदा अण्णाना मी विचारलं, की "तुम्ही भिक्षुकी, किंवा गेलाबाजार गावकीच्या महारुद्राला का जात नाही?" अण्णा म्हणाले, "भिक्षुकाने भिक्षुकीचे नियम पाळले पाहिजेत. यजमान माझ्या रुपात परमेश्वराला पाहतो, मला नमस्कार करतो आणि इकडे मी सामिष खाणार, संध्याकाळची आचमनं करणार.. पाप आहे रे हे.. मला नाही रुचणार ते. राहीला भाग महारुद्राचा..... आपण कोणासाठी म्हणतो सांग? ज्यांंच्यासाठी म्हणतो त्याला ऐकू जायला नको?.... उगाच आपली शर्यत लावल्यासारखं गुडगुड करत एक दीड मिनिटात नमक संपवायचा मला पटत नाही. मी रुद्र माझ्यासाठी म्हणतो तर तो एकेक स्वर सुस्पष्ट आलाच पाहिजे." दक्षिणा मिळते म्हणून अण्णानी कधीच याबाबतीत तडजोड केली नाही याचं हे उत्तम उदाहरण होतं.
वय वाढत चाललं तरी अण्णा
लोखंडी कांबीसारखे खणखणीत होते. रात्री देवळाच्या बाकांवर मुलं बसायची तिथे गप्पा
मारायला यायचे. गतजीवनातले चिटवळ किस्से सांगून हसवायचे. एकदा तर रात्री
आमच्याबरोबर काँफी प्यायला स्टँडवर पण आले होते. सर्व वयोगटातील लहानमोठ्यांबरोबर
रमायचे. त्यामुळे आम्हाला पण कधी शेजारी अण्णा आहेत म्हणून जीभ चावण्याचे किंवा
जिभेला लगाम घालण्याचे प्रसंग कधी आले नाहीत. उलट आपली स्वत:ची भर घालायचे. नाटक,
किर्तन, गाणं आणि गाईगुरं या सगळ्याचीच आवड होती त्यांना.
राहत्या घराचा परिसर मोठा
असल्याने तिथे अपार्टमेंट बांधायची ठरलं. जोशीआळीतली पहिली अपार्टमेंट या कल्पनेचं
मोरपीस अण्णांच्या मनावर फिरत होतं. मोजणी, आराखडा, परवानग्यांंसाठी वेळ लागणारच होता. घराच्या मागच्या बाजूस मोठं आवार
होतं, त्या बाजूने बांधकामाला सुरुवातही झाली. असेच एकदा
मुलांसोबत स्टँडवर काँफी पिऊन आले आणि घरी झोपायला गेले ते रात्री झोपेतच काँटवरुन
कोसळले. ब्रेन हँमरेजचं निदान झालं. हाँस्पिटलमधे दाखल करुन
तब्बल वीस दिवस उलटले, पण अण्णा त्यातून उठले
नाहीत. 21 एप्रिल 1997 ला अण्णा जीवनाचं महायुद्ध हरले. अपार्टमेंट पूर्ण होण्यापूर्वीच
राहत्या घरी अचेतन रुपात विसावलेले अण्णा आजही नजरेसमोर येतात. अनेक किस्से, आठवणी नजरेसमोर साकार होतात.
पुलंचा अंतु बर्वा खूपदा आम्ही घनुअण्णांच्याच रुपात पाहीला. आजही रुद्र म्हणताना समोर अण्णा आहेत असा भास
होतो आणि हमखास उभाभ्याम् ला अडखळायला होतं. गर्भाश्चमे वत्साश्चमेच्या वेळच्या
नेत्रपल्लव्या आठवतात आणि कानात शब्द कडाडतात... Xतमारिच्यांनो काय चाललंय?
अण्णा जाऊन आजच 23 वर्षे झाली.... दूरवरुन कोणीतरी रुद्राचं आवर्तनं म्हणताना कानावर
येतं, अण्णांची आठवण येते, न राहवून
मीही पुढची ऋचा पुटपूटू लागतो. अचानकपणे अण्णांचा आवाज कानात घुमू लागतो.. "असं मुळमुळीत वाजश्च प्रसवश्चा काय म्हणतो...
खणखणीतपणे म्हण... तो पुढचा प कसा जोडाक्षराप्रमाणे आला पाहिजे, त्यासाठी ते अक्षर तिथे तोडायचं.. वाजश्चप् प्रसवश्चा पिजश्चक्
क्रतुश्च सुवश्चमूर्धाचव् व्यश्नियश्चांत्यायनश्चांत्यश्च... असं चाबकाच्या
फटका-याप्रमाणे खटके आले पाहिजेत"... आज अण्णा या जगात नाहीत, परंतु सूक्त कोणतंही असो, अण्णांची आठवण
अविभाज्यच....
॥ ओम् तत्सद् ॥
मनोज भाटवडेकर
9421253153



