लडाखमधे प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वत्र बौद्ध संस्कृतीची धार्मिक बांधकामे दिसतात. या धार्मिक स्थळांना मोनेस्ट्री किंवा तिबेटी भाषेत गोम्पा म्हणतात. गावापासून थोडंसं दूर पण नजरेत गांव बसेल अशा उंचीच्या पहाडावर छोट्या छोट्या इमारतींचा समूह म्हणजेच मोनेस्ट्री किंवा गोम्पा. आपण जेव्हा त्याला भेट देतो तेव्हा त्याची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. Chorten हा तिबेटी शब्द म्हणजे स्तूप. लडाखमधे प्रवेश केल्यापासून ठिकठिकाणी आपल्याला असे स्तूप दिसतात. जुन्या काळी असे स्तूप बुद्धाचे अवशेष जतन करण्यासाठी बांधले गेले परंतु आता बोधिसत्वाचा आदर अथवा एखाद्या पूजनीय धर्मगुरुचे अवशेष जतन केले जातात. हे बांधकाम पंचतत्व, बौद्धमूर्ती आदी अनेक गोष्टींशी साधर्म्य दाखवतं. मोनेस्ट्री च्या आवारात आपल्या धार्मिक वचनं लिहीलेल्या पताका फडकताना दिसतात.
केवळ मोनेस्ट्रीच नाही तर वृक्ष, पूल, आणि खिंडीच्या माथ्यावर देखील विहरताना दिसतात. निरनिराळ्या रंगाच्या कापडी पताका चटकन लक्ष वेधून घेतात. काही ठिकाणी भलामोठा ध्वज फडकताना पण दिसतो. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या सर्व प्राणिमात्रांच्या भल्यासाठी त्यावर धार्मिक चिन्हं अथवा प्रार्थना छापलेल्या असतात. घाटमाथ्यावरुन प्रवास करणारे सुखरुप राहावेत अशासाठी खिंडींमधे पण पताका लावल्या जातात.
लडाखमधल्या विरळ वातावरणाला सरावायचं असेल तर हा प्रवास खरंतर श्रीनगर पासून सुरु करावा. परंतु कलम 370 ने आमचा प्लँन कलम केला. आम्ही विमानाने थेट लेहला उतरलो. आला दिवस झोपूनच काढला होता. आजचा दुसरा दिवस स्थानिक स्थलदर्शनासाठी ठेवला होता.
सकाळी पहिलीच किरणं डोळ्यावर आली आणि मंडळी उठून आवरायला लागली. भरपेट नाश्ता करुन गाडी निघाली. लडाखमधली सर्वात जुनी म्हणजे 1630 मधे स्थापन झालेली आणि तितकीच श्रीमंत असणाऱ्या हेमिस मोनेस्ट्रीसाठी आम्ही निघालो. मनाली रस्त्याने कारु येथे पोचल्यावर मनाली रस्त्याशी काडीमोड घेतला आणि सिंधू नदी ओलांडून गाडी पहाडी रस्त्याला लागली. सुमारे पाच किमी अंतर कापल्यावर खाणाखुणा दिसू लागतात.
हेमिस मोनेस्ट्री ही इतर मोनेस्ट्री प्रमाणे डोंगराच्या टोकावर नसून पुढे आलेल्या धारेच्या आड लपलेली असल्याने अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. आपण गाडीतून उतरतो आणि जेमतेम पाचपंचवीस पाय-या चढलो की मोनेस्ट्रीच्या प्रांगणात आपला प्रवेश होतो. हेच ते प्रांगण जिथे प्रसिद्ध हेमिस उत्सवाचे कार्यक्रम साकार होतात. लडाखमधील बहुतांश मोनेस्ट्रींचे उत्सव हिवाळ्यात असतात पण हीच एकमेव जिचा उत्सव उन्हाळ्यात म्हणजे जून, जुलैमधे असतो.
उत्सवावेळी या प्रांगणात पाय ठेवायला जागा नसते. ड्रम आणि तिबेटी शिंगांच्या आवाजावर नृत्याविष्कार दाखवले जातात. विशिष्ट पेहराव आणि मुखवटे घालून केलेले नृत्य हेच खरे या उत्सवाचे आकर्षण. अगदी पुरातन असल्याने ह्या मोनेस्ट्रीला सर्वाधिक महत्त्व आहे. हेमिस नंतर आपण सिंधूच्या दक्षिण तीरावरुन लेहकडे जाऊ शकतो... जाताना मथो काँगरी, स्तोक काँगरी ही शिखरं आपली सोबत करतात. आम्ही लेहवरुन थेट आलो असल्याने पुन्हा सिंधू ओलांडून उत्तर तीरावरुन आमचा प्रवास सुरु झाला. थिक्से पँलेस मधील मैत्रेय बुद्धाचा दुमजली पुतळा पाहून आम्ही शे पँलेसकडे सरकलो.
उन्हं अगदी डोक्यावर आल्यामुळे शे पँलेस बाहेरुनच पाहून प्रसिद्ध चित्रपट थ्री इडियटच्या शाळेजवळ आम्ही पोचलो. येणाऱ्या पर्यटकांमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून आता प्रवेशद्वाराजवळच एक डमी इमारत आणि त्यावर हुबेहूब चित्रं रेखाटली आहेत... सेल्फी और ग्रुप फोटो तो बनता ही था।... जवळच्याच कँफेटारियामधे सँडवीच, मोमोज्, थुक्पा खाऊन पोटं भरली.
हेमिस मोनेस्ट्री ही इतर मोनेस्ट्री प्रमाणे डोंगराच्या टोकावर नसून पुढे आलेल्या धारेच्या आड लपलेली असल्याने अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. आपण गाडीतून उतरतो आणि जेमतेम पाचपंचवीस पाय-या चढलो की मोनेस्ट्रीच्या प्रांगणात आपला प्रवेश होतो. हेच ते प्रांगण जिथे प्रसिद्ध हेमिस उत्सवाचे कार्यक्रम साकार होतात. लडाखमधील बहुतांश मोनेस्ट्रींचे उत्सव हिवाळ्यात असतात पण हीच एकमेव जिचा उत्सव उन्हाळ्यात म्हणजे जून, जुलैमधे असतो.
उत्सवावेळी या प्रांगणात पाय ठेवायला जागा नसते. ड्रम आणि तिबेटी शिंगांच्या आवाजावर नृत्याविष्कार दाखवले जातात. विशिष्ट पेहराव आणि मुखवटे घालून केलेले नृत्य हेच खरे या उत्सवाचे आकर्षण. अगदी पुरातन असल्याने ह्या मोनेस्ट्रीला सर्वाधिक महत्त्व आहे. हेमिस नंतर आपण सिंधूच्या दक्षिण तीरावरुन लेहकडे जाऊ शकतो... जाताना मथो काँगरी, स्तोक काँगरी ही शिखरं आपली सोबत करतात. आम्ही लेहवरुन थेट आलो असल्याने पुन्हा सिंधू ओलांडून उत्तर तीरावरुन आमचा प्रवास सुरु झाला. थिक्से पँलेस मधील मैत्रेय बुद्धाचा दुमजली पुतळा पाहून आम्ही शे पँलेसकडे सरकलो.
लेहजवळचं चोगलमसार हे ठिकाण सिंधू उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. स्व.अटलजींच्या संकल्पनेतून सुरु झालेला हा महोत्सव दरवर्षी जून महिन्यात सिंधूपूजनाने सुरु होतो. हिंदूधर्मियांना वंदनीय असलेल्या सिंधूचे पाणी प्रोक्षण करुन तिला नमन केले. खुद्द लेह शहरात अनेक पर्यटनस्थळं आहेत. समस्त भारतीयांना अभिमान वाटावं असं एक म्हणजे हाँल आँफ फेम हे भारतीय लष्कराचे संग्रहालय.
इथे भारतीय सैन्याची शौर्यगाथा सांगणारे अनेक फोटो, शस्त्रं, पोषाख ठेवलेले आहेत. तिथल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात यासाठी एक वस्तू विक्री केंद्रही आत आहे. आम्ही यानंतर झोरावर फोर्ट आणि शांति स्तूप पाहणार होतो पण नुकताच हाँल आँफ फेम इथे साउंड अँड लाईट शो सुरु झालाय. बाकीचं नंतर पाहू पण हे आज पाहू या विचाराने आम्ही थांबलो. अर्थात हा निर्णय अत्यंत योग्य ठरला. अंगावर रोमांच आणणारा ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम व त्यापाठोपाठचा हा शो डोळ्यांची पारणं फेडतो. एकाचवेळी सैनिकांचा जिवंत देखावा आणि पडद्यावरची कहाणी सारा आसमंत भारुन जातो.
भारतीय सैन्य आणि त्यांच्या शौर्यगाथा यांनी अंगावर आलेले रोमांच जपत आम्ही हाँटेलवर परतलो. प्रत्येकाच्या मुखी एकच विषय होता. पुढ्यात आलेले गरमागरम जेवण हादडल्यावर आमची अंताक्षरी रंगली. बोचऱ्या वा-यानं हळूच कानात उत्तररात्र सुरु झाल्याचं सांगितलं आणि सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये परतले.

मनोज
०७.०८.२०१९

No comments:
Post a Comment