वेणूआजीच्या येरझाऱ्या सुरुच होत्या. सूर्य पश्चिमेकडे कलला. पावसामुळे अधिकच अंधारलेली संध्याकाळ मनाची घालमेल करत होती. पावलं वाजली तशी वेणूआजी पाय ओढीत दरवाज्याकडे गेली. दबक्या पावलानं येणाऱ्या मांजरीची पावलं ऐकू आली पण ऐकू येऊ शकणारी पावलं मात्र अजून ऐकू येत नव्हती. उद्यावर गणपती आले तरी मनाला प्रसन्नता नव्हती. सरावाने बहुतेकशी तयारी करुन झाली होती पण एकट्या घराला पन्नास वर्षांपूर्वीची ती धांदल, गडबड आता पारखी झाली होती. बघताबघता वेणूआजी भूतकाळात गेली.
वृद्ध सासू, नवरा, दिर, चार मुलं असं गोकूळ होतं हे घर... सणवार अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडायचे. गणपतीच्या दिवसात तर कंबरेचा भुगा व्हायचा. दहा पिढ्यांची परंपरा तोंडपाठ असणारी सासू होती.. मनानं अगदी प्रेमळ पण वयाने शरीराची धनुकली केलेली. कपाळीचं कुंकू किर्तनाची परंपरा चालवत होतं, त्यामुळे खर्चाची तोंडमिळवणी करताना जीव अगदी मेटाकुटीला यायचा. दारासमोरच गोठा होता त्याचं दुधदुभतं घरी खाऊन उरेल ते विकून चार पैसे कनवटीला लावता यायचे. परसांव मोठं होतं तिथे पावसात भाज्या करायच्या त्या अगदी दिवाळीपर्यंत तोंडी पुरायच्या.... थंडीत केलेले कुळीथ, मूग, पावटा वर्षभर पुरायचा. संपन्नता नव्हती पण विपन्नावस्था नक्कीच नव्हती. माहेर असं उरलंच नव्हतं त्यामुळे सासरचे संस्कार, परंपरा जोपासण्यात वेणूआजीचं अवघं आयुष्य गेलेलं... चैत्रातल्या हळदीकुंकवापासून जी सुरुवात व्हायची, ती रामनवमी, हनुमानजयंती पार पडेतो चातुर्मासातल्या व्रतवैकल्यासाठी कोणाचातरी डेरा पडायचा. पाठोपाठ गणपती, नवरात्र, दिवाळी, शिवरात्र आणि मग शिमगा... वेणूआजीला उसंत नसायची. शिरुभाऊंची किर्तनसेवा चालूच होती. मुलं मोठी होत गेली. सासूने इहलोकीची यात्रा संपवली. जावई आले, नातवंड आली.. पाठोपाठ सून आली पण घरात बाळपावलं पडायच्या आत कर्ताधर्ता मुलगा गेला. सुनेनं पाठ फिरवली तरी वेणूआजी डगमगली नाही. वृद्ध दिर आणि सौभाग्यासाठी ती राबतच राहिली. मुली, जावई येऊन जाऊन होते. थोरलीची मदत होतीच भरीला दिराची पेन्शन असल्याने घरात चार दिडक्या खेळत्या राहिल्या. वेणूआजी म्हातारपणाकडे झुकली आणि अचानक दिराने देह ठेवला. आता त्या घरात दोघंच उरली. खेडेेगाव असल्याने दारावरुन जाणा-या येणा-यासाठी हक्काच्या घराचे दरवाजे सताड उघडेच असायचे. वाडीतल्या लोकांची ओटीवर उठबस व्हायची तेवढाच विरंगुळा.
"वेणूआजी, अगं पाट दे... मूर्ती आणून ठेवतो" शेजारच्या मुलांचा पुकारा ऐकून आजी तंद्रीतून जागी झाली. "हो, खरंच की, मूर्ती आणून ठेवायला हवी".. असं म्हणत पाट, विडासुपारी, नारळ आणि वस्त्र देऊन आजी परत ओटीवर बसली. दारात झोपाळा होता पण कधी बसायला वेळच मिळाला नाही आणि मग पुढे सवय नाही म्हणून गरगरायचं.. वेणूआजी त्या झोपाळ्याकडे बघताबघता पुन्हा तंद्रीत गेली.
नैवेद्यासाठी मोदक हवेत म्हणून खूपदा थोरली मदतीला यायची. तिच्या घरी पण गोतावळा खूप, मग वेणूआजीची एक मैत्रीण होती ती आणि आजी मिळून मोदक करायच्या. बघताबघता पाच दिवसांंचा गणपती हळूच दीड दिवसावर आला. थोरलीची जबाबदारी मधली आणि धाकटीनं आपल्या शिरावर घेतली. शिरुभाऊंना गणपतीची उस्तवार कठीण होऊ लागली म्हणून मग थोरलीचा लेक घरचा गणपती बसवून आजोळचा गणपती बसवायला यायचा. आता मात्र नोकरीमुळे ही कसरत त्यालाही कठीण होऊ लागली.
वृद्धत्वानं एके दिवशी वेणूआजीच्या हातातला शिरुभाऊंचा हात आपल्या हाती घेतला आणि मग आजी अगदीच एकटी पडली. म्हातारपण कान आणि गुढगेदुखीच्या रुपात खुणावत होतं तरी वेणूआजीचा एकटा हात घरावर फिरत होता, सणवार पार पाडले जात होते. गेली चार वर्ष खूपच दगदग होते आहे हे पाहून मधलीनं आईला फर्मावलं... "यावर्षी गणपतीला प्रार्थना कर. इतकी वर्षे सेवा केली पण आता नाही झेपत. यावर्षीची ही अखेरची सेवा गोड मानून घे"
पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।।
मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तिहीनम् सुरेश्वर।
यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।
अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।
तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।।
वर्षानुवर्षे गणपती पूजा सांगणारे भार्गवगुरुजी खर्जातल्या स्वरात प्रार्थना करत होते. मनाची चलबिचल, अस्वस्थता मागे टाकून वेणूआजीने एकदाचा धीर केला आणि गुरुजींना थांबवले. मधलीचा मानस ती आपल्या मुखाने व्यक्त झाली खरी पण डोळ्याला लागलेल्या धारा आणि रुद्ध झालेला कंठ तिला पुढे बोलू देईना. चमत्कारिक परिस्थितीत सगळे अवघडून उभे असतानाच धाकटी पुढे झाली. "गुरुजी, ही म्हणत्ये ते खरं असलं तरी तिचं मन ते स्विकारणार नाही. सणवार, उत्सव यापुढे पार पाडताना कठीण होणार असलं तरी या वयस्कर लोकांचं जगण्याचं हेच बळ आहे. करु काहीतरी आम्ही. पुढच्या वर्षाचं पुढल्या वर्षी बघू पण आत्ताच प्रार्थना करुन तिला विरक्त नका करु. नाही जमणार तिला ते" धाकल्या जावयानं पण मान डोलावली. वेणूआजीच्या डोळ्यात निराळीच चमक आली. घोगरा झालेला आवाज मोकळा झाला. गुरुजी पण गालातल्या गालात हसले आणि मंत्रपुष्पांजली म्हणू लागले.
"गणपती बाप्पा मोरया"... जोराचा गजर झाला.. वाडीतली मुलं गणपती घेऊन दारात उभी होती. पायावर दूधपाणी वाहून मुलांंना आत घेतलं. नेहमीच्या जागेवर बाप्पा विराजमान झाले. परातीत चिवडा ओतून मुलांच्या समोर धरत वेणूआजी प्रत्येकाची चौकशी करत होती. "उद्या येतांव आरतीला, भरपूर प्रसादी करुन ठेवा" फर्माईश करुन मुलं पसार झाली. अंधार दारा खिडक्यांमधून घरात घुसला तशी आजीने चारीठाव दिवे लावले. शुभंकरोती म्हणून देवाला हात जोडले तरी उद्याची चिंता काही मिटली नाही. भार्गवगुरुजींचा निरोप होता, उद्या सकाळी नऊ वाजता येणार असल्याचा. म्हणजे सकाळी उठल्यावर बाकी तयारी केली तरी चालणार होती पण मग आत्ताची अस्वस्थता जायला म्हणून आजी फुलवाती वळायला बसली. "हे असते तर आत्तापर्यंत चार वेळा चहा टेकायला लागला असता आणि मग प्रत्येक चहानंतर पान चुरडायला हवंच" आजी शिरुभाऊंच्या आठवणीत गुंतली. वाती झाल्या, समया सजल्या. "तरीच म्हटलं काहीतरी विसरलंय, गणपतीला कापसाची वस्त्र राहिली." तीनफेरी वस्त्र करुन झालं, ताम्हन भरलं, विडे, सुपारी, पत्री, नारळ, हळदकुंकू, अबीर, बुक्का.... सगळ्या तयारीवर आजीची नजर फिरली आणि चेहऱ्यावर खुशी आली. "यांना अशी साग्रसंगीत तयारी लागायची, चालवून घेणं अजिबात जमायचं नाही. पण खरं सांगायचं तर त्यातही एक आनंद होता" उसासा टाकून वेणूआजी वळली तर दारात धाकलीचा लेक हजर... आsज्जीsss करत आत आला. "गणपती गजानना, तूच तुझी सेवा करुन घेतोयस रे.... अरे, मला उद्याच्या पूजेची काळजी आणि तू इकडे छान पाटावर बसून निवांतपणे व्यवस्था करुन मोकळा... तुलाच रे बाबा माझी काळजी..."
"काय वेणूआजी? यंदा करायची का प्रार्थना?" भार्गवभटजी मिश्कील आवाजात विचारत होते.
"माझा हा नातू असेपर्यंत मनात सुद्धा नका आणू.. साग्रसंगीत होऊ द्या पूजा..." आनंदविभोर वेणूआजी उत्तरली.
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता। विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी । गणपती बाप्पा मोरया ॥
छान...
ReplyDeleteMast
ReplyDeleteछान च लिहिलंय हो
Deleteभावस्पर्शी
Maat
ReplyDeleteMast
ReplyDeleteवेणू आजी डोळ्या समोर उभ्या राहिल्या. तुमच्या कडे शब्द संपत्ती खूप आहे.. लेख खूप छान
ReplyDeleteसुंदर रेखाटलय व्यक्तीचित्र
ReplyDeleteअप्रतिम, वेणू आजी चे चित्र डोळ्यापुढे अगदी स्पष्ट दिसतंय,कोकणातील कित्येक घरांमध्ये अशा वेणूआजी आहेत
ReplyDelete