"अहो वैनी, असं काय करता? ओली बाळंतीण तुम्ही नी रडतांय काय?"
"अग हिरा, तीन महिने झाले, शाळेवर हजर व्हायला लागेल. आडगावी शाळा... लेकाला सोबत तरी कशी नेणार आणि इथे ठेवायचं तर कुणाकडे ठेवणार?"
"मनोजची काळजी करु नका, मी सांभाळेन. सकाळी भांडी घासून झाली की माझ्यासोबत घरी नेत जाईन. माझ्या चार मुलग्यांसारखाच हा पाचवा मुलगा. तुम्ही नका काळजी करु"
त्या दिवसापासून हिराताई माझी दुसरी आईच झाली. बापू मुंबईला पोलिसात, पदरात चार मुलगे. पगार बेताचा, महागाईचा काळ त्यामुळे धुणीभांडी करुन संसाराला हातभार लावणा-या अनेक कर्तबगार स्त्रियांप्रमाणेच हिराताई पण आमच्या घरी यायची. खरंतर आमच्या घराशी तिचा त्याहूनही जुना स्नेहसंबंध. हिराताईची आई म्हणजे शांताबाई आणि माझी आज्जी ताईआजी यांच्यापासून सुरु झालेला. दोघी जीवाभावाच्या मैत्रिणीच. त्याकाळी आर्थिक, सामाजिक कोणतीच भिंत त्यांच्या आड नव्हती. शांताबाईच्या सोबत हाताशी म्हणून हिराताई यायची. लग्न झाल्यानंतर काही काळ गेली असेल मुंबईत, पण जागा आणि खर्च यांचा ताळमेळ त्याहीकाळी जमत नसे. शेवटी पुन्हा बि-हाड चिपळूणला हललं आणि मग शिमगा, गणपतीला बापू चिपळूणला यायचे.
शांताबाई अत्यंत सोशिक, गरीब स्वभावाची. बोलणं पण इतकं हळूवार की मनातला सल तिच्याजवळ बोलताना समोरचीला आधारच वाटावा. कोणाला दुखवणं नाही की इकडचं तिकडे सांगणं नाही. तो काळच मुळी माणसं जोडून राहण्याचा असल्याने प्रेमळ स्वभावाच्या शांताबाईचे हे सगळे संस्कार हिराताईवर होत होते. या पार्श्वभूमीवर माझ्या आईची अडचण सोडवायला हिराताई पुढे आली नसती तरच नवल होतं. शांताबाईची सगळी कामं पुढे हिराताईने आपल्या अंगावर घेतली आणि मग आमच्या घरी तिचा राबता सुरु झाला. जसं आजीसोबत तिचं सूत जमलं तशी माझ्या आईजवळ पण तिची गट्टी जमली. हिराताई जरा स्पष्टपणे बोलणारी असल्याने कधीकधी माझ्या बाबांना पण तोंडावर सुनावून मोकळी व्हायची.
एकदा एखादी जबाबदारी घेतली की मग मागेपुढे नसल्याने सकाळी आमच्या घरची कामं झाली की मला घेऊन हिराताई तिच्या घरी घेऊन जायची. दुपारचं जेवण वगैरे सगळं तिकडेच. मी हळूहळू मोठा होत होतो. तरीही नकळतं वय होतं. कधीतरी वाराच्या दिवशी माझी जेवणाची वेळ आणि बाकीच्यांची वेळ वेगळी असते हे कळायला लागलं. त्यांच्या ताटातलं वेगळेपण मला कळतं हे समजताच हिराताई मुलांना जेवायला वाढून मला घेऊन बाहेर जायची. "ब्राह्मणाचं पोर आहे, विश्वासानं सोपवलंय माझ्याकडे तर भ्रष्टकार होता कामा नये" या जाणीवेतून ती लक्ष ठेऊन असायची. शाळेचं दप्तर, डबा घेऊन मी हिराताईचं बोट धरुन तिच्या घरी यायचो. रस्त्याच्या पलिकडेच शाळा असल्याने शाळेची वेळ होईपर्यंत मी तिथेच असायचो. जेवण भरवणं, भांग पाडून शाळेची सगळी तयारी इतक्या मायेनं करायची की आई मला सोडून शाळेत जाते याचं कधीच काही वाटलं नाही. कधीतरी असाही प्रसंग घडला असण्याची शक्यता आहे की संध्याकाळी आई आल्यावर घरी जायला मी नकार पण दिला असेल.
हिराताईच्या आसपास घरं खूप, मुलांची संख्या पण बक्कळ, त्यामुळे खेळायला सवंगड्याचा तुटवडा नाही. कोकणातले मुख्य सण दोन, गणपती आणि शिमगा. गणपतीची मोठी मूर्ती असते हे मी हिराताईकडेच पाहिलेलं अन्यथा आमच्याकडे सर्वात कमी किमतीची मूर्ती हाच निकष असायचा आणि चारपाच आरत्या झाल्या की घालीन लोटांगण व्हायचं. पण गोगडेवाडीत ढोलकी, टाळ वाजवून होणाऱ्या दहापंधरा आरत्यांची कायमच ओढ असायची. गणपतीच्या दिवसात खेळे, जाकडी इथेच पाहिली. जी गत गणपती उत्सवाची, तीच शिमग्याची. भैरीबुवाची पालखी आली की मग हिराताईकडून फुगा ठरलेला. फुग्याला शेपटी जोडून तिचा मुकुट करुन माझ्या डोक्यावर चढवायची. अजूनही शिमगा म्हटलं की मला तो फुगा आठवतो.
कधीतरी बापू मुंबईहून यायचे. आपल्या मुलांबरोबर मलाही कपडे. खाऊ आणायचे पण त्याकाळी पोलिसांची इतकी भिती असायची की मी बापूंजवळ फारसा जायचो नाही. हिराताईची मांडी हेच आमचं सिंहासन होतं. चौथीला मला स्काँलरशिप मिळाली याचा हिराताईला काय आनंद.. सुभाषला म्हणायची बघ, त्याची आईसुद्धा जवळ नसते अभ्यास घ्यायला पण मार्क बघ... तुम्हा मेल्याना आयशीच्या जवळ असून चांगले मार्क मिळवता येत नाहीत. समोरची शाळा चौथीपर्यंतच होती. पाचवीला मी हायस्कूलला गेलो, या घरचा संपर्क थोडा कमी झाला. पुढे बापूना मुंबईत खोली मिळाली. हिराताई मुंबईला गेली आणि मग पुढे तीही बापू़ंसारखीच सणावारी चिपळूणला यायची. अनिलदादा, सुनीलदादा, दिलिप, आणि सुभाष आपापली शिक्षणं संपवून नोकरी, धंद्याला लागले. जिथून बापू निवृत्त झाले, त्याच पोलिस खात्यात सुनिलदादा नोकरीला लागला याचा हिराताईला प्रचंड आनंद झाला. मी आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईत गेलो तेव्हा मुद्दाम तिच्या खोलीवर गेलो होतो.
चारी मुलांचे संसार सुरु झाले, जागा अपुरी म्हणून हिराताई बापू चिपळूणला आले. रोज नाही तरी दोनचार आठवड्यातून एकदा तिची चक्कर व्हायची आमच्याकडे. दिलिप वीजमंडळात चिपळूणलाच आला, सुभाषने रिक्षाव्यवसाय स्विकारला. वृद्धत्वाने बापूंना आपल्यासोबत नेले पण हिराताई लोखंडी कांबीसारखी खणखणीत होती. चार सुना, नातवंडं, पतवंडं यांच्या गोकुळात छान रमली होती. तिच्या तरुणपणातील हालअपेष्टा आणि कष्ट यांची जाण माझ्या चारही भावांना आणि वहिनींना असल्याने तिच्या म्हातारपणी तिला सगळ्यांनीच सुख दिलं. सुभाष शेंडेफळ त्यामुळे तिचा त्याच्यावर कांकणभर जीव जास्त. मी सुभाषसोबतच राहणार हे तिने आधीपासूनच बहुधा ठरवलेलं, त्यामुळे चिपळूणला सुभाषसोबत आणि सुनेसोबत तिचं छान जमलं. सगळं कसं उत्तम चाललेलं होतं तरीही, कुठेतरी मनात दिलिपदादाची काळजी होतीच. किरकोळ आजारानं त्याची बायको जग सोडून गेलेली. हे दु:ख पचवून हिराताई पुन्हा उभी राहिली तर सुनिलदादाच्या बायकोची काळजी मागे लागली. पण स्वत: धीर न सोडता सगळ्यांना आधार म्हणून हिराताईच उभी राहिली. शरीरावरती वय आणि कष्ट दिसत होते. सोबत मनही जरा डाकलक झालं होतं. बाहेर कोणाकडे जाण्याची उमेद हरवलेली, पण तरीही ती लवकर सावरली. अनिलदादा, दिलिप दोघंही निवृत्तीनंतर चिपळूणलाच स्थायिक होणार हे टॉनिक तिला पुरलं. मी नवीन घर बांधलं याचं तिला कोण कौतुक... दिवसभर हौसेनं वावरली. माझ्या मीठमोह-याच काढायच्या बाकी होत्या.
मुलगे, सुना, नातवंडं, पतवंडं यांच्या गोकुळात रमलेली हिराताई बघितली की मन प्रसन्न व्हायचं. वाढत्या वयातही नातवंडांवरची जरब आणि माया जराही कमी झालेली नव्हती. पै पाहुणा, शेजारपाजार तिला हवा असायचा. मी तिला खूपदा म्हणायचो की अगं सुभाषला सांग सकाळी रिक्षातून माझ्याकडे सोडायला, रहा दिवसभर, जेव खा, गप्पा मार. संध्ययाकाळी मी सोडीन... पण नाही, ती नंतर कधी आलीच नाही. विचारलं की म्हणायची, "अरे मी नाही जात घर सोडून कुठेही.. वाटतंच नाही जावसं कोणाकडे". तिच्या मनात काय सल होता तो कधी कळलाच नाही.
”ताई हथरुणावर पडून आहे, बघून आलास काय?” बालाताई मला विचारत होती. दुपारी ऑफिसला जाण्याआधी मी हिराताईचं घर गाठलं. तिची निस्तेज अशी कुडी बघून मलाच भडभडून आलं. “बरेच दिवस अन्नच सोडलंय... घोटभर चहा, चार चमचे पेज, ज्यूस यावरच आहे. काही दिलं तरी खात नाही” घरची मंडळी सांगत होती. बळेबळे चहा पाजला, गप्पा मारल्या पण ती नेहमीची हिराताई नव्हती. कुठेतरी ट्रान्समधे हरवलेली.. “परत येतो उद्या तुला भेटायला” असं सांगून बाहेर पडलो. संध्याक़ाळी घरी आलो, खूप सा-या आठवणी उचंबळून आल्या त्या शब्दबद्ध करायला घेतल्या. अर्ध्याहून अधिक उतरवूनही झालं. तिच्यावर लिहिलेलं तिलाच वाचून दाखवायचं होतं पण अर्ध्यावरती शब्दच हरवले. हिराताईला पैलतीरावरचे बापू हाका मारताना दिसत होते. ऐलतीर कधीही सुटेल अशी स्थिती होती. अर्धवट राहीलेलं परत लिहायचा प्रयत्न केला परंतु सरस्वती माझ्यावर पुन्हा प्रसन्न झालीच नाही.
17 तारखेला बालाताईकडे परत एकदा चौकशी केली, परिस्थिती जैसे थे असल्याचं कळलं. पुन्हा एकदा भेटून येऊ असा विचार करत असतानाच संध्याकाळी कळलं.. “हिराताई गेली...” बालपणातला मायेचा धागा तुटला. डोळ्यात खळ्ळकन पाणी आलं. कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्यावर आपल्या मुलांपेक्षाही कांकणभर सरस प्रेम करणारी माझी हिराबा गेली...
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृण्हाति नरोSपराणि ||
तथा शरीराणि विहाय जीर्णा
नन्यानि संयाति नवानि देही ||
॥ ॐ तत्सद ॥
मनोज भाटवडेकर
२१.०९.२०२०
Very nice heart touching
ReplyDeleteअगदी सुरेख शब्दचित्र....
ReplyDelete