Monday, March 10, 2025

महाकुंभ २०२५ - दिवस तिसरा


जागरण मोडावं म्हणून निद्राधीन होण्याचा प्रयत्न केला खरा, पण बाजूने जाणा-या भाविकांचा जयघोष आम्हाला जागं ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होता. अधूनमधून डुलक्या काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर गात्रं शिथिल झाल्याच्या समाधानात अंगावरची रजई उडवून बाहेर आलो. विवेकानंद केंद्रातर्फे उभारलेला कॅम्प न्याहाळत असतानाच जीवनव्रती कल्पना दिदी आणि हार्दिकभैय्या यांची भेट झाली. आदल्या दिवशी त्यांचं तिथे येणं अपेक्षित असताना त्यांची ट्रेन अर्ध्यातच खंडीत झाली होती आणि मग दोन तीन ट्रेन्स बदलत ते आज सकाळी प्रयागराजच्या केंद्रावर पोहोचले होते. दोघांनीही विवेकानंद मिशनचं सेवाव्रत स्विकारलंय. चहा, नाश्ता आटोपल्यानंतर आम्ही त्यांचे समवेत स्नानासाठी संगमावर निघालो. गंगा, यमुना यांच्या जयघोषात चालणा-या जनसमुदायासोबत आमची पावलं पडू लागली. जनसागर म्हणजे काय ते अनुभवताना गर्दीत हरवू नये म्हणून एकमेकांवर लक्ष ठेवण्यात अतोनात तारांबळ उडत होती. अनेकांनी एकमेकांच्या हातांना उपरणी बांधली होती, तर कोणी निशाण काठी घेऊन चालत होतं. खोयापाया केंद्राला जराही उसंत नव्हती. साधारणपणे एक दीड किमी चालून यमुनेच्या धक्क्यावर आलो. सर्वत्र अफाट जनसमुदाय आणि यमुनेच्या पात्रातील बोटी यांचीच भाऊगर्दी होती. खूप वेळाने आम्हाला बोट मिळाली. आम्हाला हुश्श झालं पण खरी परीक्षा पुढे होती. किनाऱ्यावरुन नदीपात्रात बोट लोटण्यासाठी नावाड्यांची जी काही पराकाष्ठा चालली होती ती पाहून खरंच या कष्टाचं मोल होऊ शकत नाही याची जाणीव झाली. आणि हे एकदा नव्हे तर तब्बल चार वेळा... कारण संगमावर पोचलो तरी तराफ्यापर्यंत बोट पोचवणं आणि परतीच्या प्रवासात याचीच पुनरावृत्ती करणं होणार होतं. 

महत्प्रयासाने आमची बोट यमुनेच्या प्रवाहात शिरली. नावाडी माहिती देत होते. यमुनेचं पाणी गर्द हिरवट, खोल आणि संथ तर गंगेचा ओघ निळसर, उथळ आणि प्रवाही... यमुनेच्या पृष्ठभागावर विहरणारे स्थलांतरित पक्षी सीगल्स अक्षरशः हजारोंच्या संख्येने होते. बोटी जवळ आल्या की थवा उडतानाचा नजारा म्हणजे निव्वळ नेत्रसुख होतं. विशेष म्हणजे हे पक्षी गंगेच्या प्रवाहात आढळत नाहीत. जणूकाही संगमापर्यंतचं यमुनेचे पाणी हीच त्यांची हद्द....

समोरचा घाट व्हिआयपी मंडळींसाठी होता. दोन्ही घाटांवरुन भाविकांना सातत्याने सावधगिरीच्या सुचना दिल्या जात होत्या. परंतु कोठेही श्रद्धाळूंना हाकलले जाताना आढळलं नाही. संगमाजवळ पोचताच तराफ्यावर आपली नाव टेकवण्याची परिक्षा पार पडल्यानंतर हर हर गंगेच्या जयघोषात आम्ही पाण्यात उतरलो. साधारणपणे अकराचा सुमार असल्याने काकडायला झालं नाही. नावाड्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवाही गंगा तिच्या सोबत आणलेल्या चंदेरी वाळूने आमच्या पावलांना गुदगुल्या करत होती. गंगेला हळदकुंकू, वस्त्र, सौभाग्यलेणं अर्पण केलं, सोबत आणलेल्या द्रोणातून फुलवाती प्रज्वलित करुन प्रवाहात सोडल्या. कुलदैवत, ग्रामदैवत, पूर्वज, आप्तस्वकीय, पशुपक्षी आदी सर्वांचं स्मरण करुन अर्घ्य दिलं. सर्व ज्ञात अज्ञात, परिचित, सजीव यांच्यासाठी प्रार्थना केली.  प्रथेप्रमाणे अकरा वेळा गंगेत डुबक्या मारल्या. आम्ही उभे असलेल्या ठिकाणी पाणी जरा उथळच होतं म्हणून अजून पुढे जाऊन पुन्हा डुबक्या मारल्या. तरीही मन भरेना, मग जरा मोकळ्या जागी जीममधे डीप्स मारतात तशा पद्धतीने संपूर्ण शरीर पाण्याखाली नेण्याचा आनंद मिळवला. 

तासभर स्नानाचा आनंद लुटूनही मन भरलं नव्हतं. नावाडी देखील निवांत होते. दुसरी फेरी मिळावी यासाठी त्यांची जराही भुणभुण नव्हती. आम्हाला जरा नवलच वाटलं... येणा-या जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा कोलाहल कानी पडत होता. गंगेच्या प्रवाहात पाण्याखाली डोकं नेताच मात्र निव्वळ शांतता. बराच वेळ थांबूनही "के दिल अभी भरा नहीं" अशी आमची अवस्था झाली होती. खोल पाण्यात डुबक्या मारण्याच्या मोहात आमच्या बोटी पासून दूर आलो होतो. दूरवरुन सगळंच सारखं दिसू लागलं. अंदाजानेच तराफा शोधून आमच्या बोटी जवळ आम्ही उभे राहिलो. आता मात्र प्रवाहातून बाहेर येण्याची आवश्यकता होती. आमच्या बोटीतील इतर भाविक स्नान आटोपून कपडे बदलून नाव निघण्याच्या प्रतिक्षेत होते. तराफ्याच्या दिशेने टाकलेल्या पावलाला मऊशार वाळूत काहीतरी टोचलं. पाण्यात हात घालून हातात आलेली वस्तू बाहेर काढली तो गंगेला अर्पण केलेला तांब्याचा गडू होता. शिगोशीग भरलेली वाळू आणि तो गडू हा गंगेचा प्रसाद समजून सोबत घेतला. बोटीतील रिकामे बुधले घेऊन पुन्हा प्रवाहात लांबवर गेलो. जिथे कोणी नाही अशा ठिकाणी ते बुधले गंगोदकानं भरुन आणले. आमची भाग्यरेषा ठळक होती म्हणून आम्हाला या महाकुंभात गंगास्नान घडलं पण ज्यांना जमलं नाही किंवा जमणार नव्हतं, त्यांना घरच्या घरी गंगास्नान व्हावं म्हणून आवर्जून मोठे बुधले भरुन गंगाजल सोबत घेतले. पुन्हा एकदा यमुनेच्या पाण्यात बोट नेण्याची परिक्षा आमच्या नावाड्यांनी दिली आणि काही काळातच आम्ही अरैल घाटावर पोचलो.  इतका वेळ झाला होता पण कोणालाच भुकेची जाणीव नव्हती. केंद्रावर परत आल्यावर घड्याळाकडे लक्ष गेलं तेव्हा कळलं की जवळपास तीन वाजायला आले होते. अर्थातच कोठेही जेवण मिळणं शक्य नव्हतं. सोबत आणलेला खाऊ हाच आमच्या पोटाचा आधार ठरला.

विश्रांतीनंतर चहा घेऊन आम्ही बाहेर पडलो. लेटे हूए हनुमान मंदिराला अलोट गर्दीमुळे जाणं अशक्य होतं. नैनी पुलावर केलेली नेत्रदीपक रोषणाई बघून नजीकच्या शिवालय पार्क परिसराकडे जाण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला. दिव्यांच्या रोषणाईने सारा परिसर झगमगला होता. पण ती त्याची खरी ओळख नव्हती.

सुमारे ११ एकर परिसरात भारतीय नकाशाच्या आकारात जवळपास १४ करोड रुपये खर्च करुन हा परिसर उभारला आहे. संपूर्ण परिसर भगवान शंकराला समर्पित असून भारतातील महत्वाच्या शिव मंदीरांची प्रतिकृती इथे उभारली आहेत. भारतीय संस्कृती, वास्तुकलेची भव्यता, मंदीरांचं महात्म्य आणि पौराणिक दिव्यता यांचा संगम आपल्याला इथे अनुभवता येतो. १२ ज्योतिर्लिंग आणि देशातील महत्वाच्या शिवस्थानांचं आपण एकाच ठिकाणी इथे दर्शन करु शकतो. यात प्रसिद्ध सोमनाथ मंदिर, महाकालेश्वर, रामनाथ स्वामी मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर, वैद्यनाथ मंदिर, भीमाशंकर मंदीर, लेपाक्षी मंदिर, पशुपतीनाथ मंदिर यांचा या निमित्ताने विशेष उल्लेख करावा लागेल.  या प्रतिकृती उभारताना लोखंडी वेस्ट मटेरियलचा वापर ही उल्लेखनीय बाब असून रात्रीच्या वेळी विजेच्या रोषणाईने सारा परिसर आपल्याला भारुन टाकतो. कोणत्याही कोपऱ्यात तुम्हाला ओम् नमः शिवाय चा जप सतत ऐकू येतो. प्रयाग राजला एक पुरातन अशी धार्मिक मान्यता आहेच पण या महाकुंभाच्या निमित्ताने ज्या गोष्टी नव्याने उभारल्या गेल्या आहेत, त्यामुळे प्रयागराजची नवीन ओळख देखील निर्माण झाली आहे. अशा ठिकाणांहून पाय न निघण्याचा अनुभव एकाच दिवसात आम्ही दोनदा घेत होतो. अखेरीस पार्कची वेळ संपल्यामुळे नाईलाजाने आम्ही बाहेर पडलो. आज मात्र थंडी पडली होती. कष्टानं पाय ओढत कसेबसे केंद्रावर आलो. दुपारचं भोजन न झाल्याने आणि संध्याकाळच्या पायपीटीने पोटात कावळे कोकलत होते. आल्याआल्या गरमागरम रुचकर जेवण मिळालं. इथून पुढे वाराणसीला काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं नियोजित होतं पण तिथे असलेल्या मित्राच्या फोन मुळे कळलं की त्या क्षणाला तिथे किमान आठ ते दहा लाख भाविक आहेत आणि पार्किंगला जागाच नाहीये. ते स्वतः आठ किमी लांब गाडी लावून चालत पोचले होते. रात्रीच्या वेळी प्रयाग राज सोडण्याचा निर्णय मित्राच्या फोनने आणि डोळ्यांवर पसरलेल्या झोपेनं पुढे ढकलला. आमच्याकडे अयोध्येच्या रामलल्ला दर्शनाचे व्हिव्हिआयपी पास होते. अठरा तारखेच्या रुम्स बुक होत्या. मित्र वाराणसी हून अयोध्येला जाणार होता. आता आमच्याकडे स्पेअर दिवस होता म्हणून आमच्या अयोध्या रुम्स त्यांना देऊन उद्या उशिराने प्रयागराज सोडण्याचं ठरवून आम्ही दुलईत गुडूप झालो.


मनोज भाटवडेकर 

१७.०२.२०२५

Monday, March 3, 2025

महाकुंभ २०२५ - दिवस दुसरा


सकाळी पटापट आवरुन आम्ही प्रयागच्या दिशेने निघालो. जगप्रसिद्ध पेंच अभयारण्याची विविध प्रवेशद्वारं मागे टाकत महाराष्ट्राची हद्द ओलांडून खवासा येथे मध्यप्रदेशात प्रवेश केला. अनेक छोटी छोटी हॉटेल्स बघून पर्यटकांनी रात्रीपुरता आसरा घेतला होता. या रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी वाढू लागली होती. सिवनी, लखनादौन मागे टाकत आम्ही जबलपूरला पोचलो. होंडाची शोरुम शोधून लाईटचा दोष दूर केला आणि दुपारच्या जेवणाला कटनी रस्त्यावर धाबा पाहून थांबलो. या भागात शेवभाजी खूप फेमस आहे. कटनीनंतर मैहरजवळ डावीकडे रस्ता चित्रकूटला जातो. रामायण कालीन संदर्भाने चित्रकूट खूप प्रसिद्ध आहे. प्रयागराजवरुन परत येणारे श्रद्धाळू चित्रकूट करुनच परत जात होते. संध्याकाळी रिवाच्या आसपास प्रचंड वाहतूक कोंडीत आम्ही सापडलो. अर्थातच हे अपेक्षित होतं. बायपासला वळविलेली वाहतूक देखील कोंडीत अडकली होती. मधलाच रस्ता पकडून आम्ही रिवा शहरात शिरलो. इथे मात्र तुलनेने कमी गर्दी होती. मधेच कधीतरी मध्यप्रदेशची हद्द ओलांडून आम्ही उत्तर प्रदेशात प्रवेश केला. सर्वत्र पर्यटक आणि त्यांची वाहने यांची भाऊगर्दी होती. ठिकठिकाणी वाहतूक वळविल्यामुळे आपण कोठून कोठे जातोय याचा काहीही ताळमेळ लागत नव्हता. एका ठिकाणी हायवे इतका जाम होता की शेजारच्या वस्तीत शिरुन कच्च्या रस्त्याने गेलो तर वेळ वाचेल असं मॅप दाखवत होता म्हणून अनेक पर्यटक तिकडे जात होते. रात्रीच्या वेळी शब्दशः गल्लीबोळ, शेताडीमधले रस्ते पालथे घालत जाताना गावकरी, मुलं हातात खडूने लिहीलेले बोर्ड दाखवून आम्हाला योग्य रस्त्यावर नेण्याची सेवा करत होते. जसजसं प्रयाग राज जवळ येत गेलं तसतशी वाहतूक कोंडी इतकी होत गेली की गाडीला चिकटून दुसरी गाडी उभी राहत होती. दरवाजे उघडणं पण शक्य नव्हतं. बराच वेळ वाहतूक हलेना म्हणून कसंबसं दार उघडून मनोजवं चालत खूप पुढे गेला. लागोपाठ चार ट्रेन्स जाणार होत्या म्हणून रेल्वे फाटक बंद होतं. बेशिस्त वाहनचालक एका रांगेत न थांबता पुढे घुसत असल्याने फाटक उघडलं तरी रांग पुढे सरकत नसे. कंटाळलेले वाहनचालक आजूबाजूच्या शेतात गाडी पार्क करुन चालत पुढे जात होते.

आमचं वास्तव्य नैनी पुलाशेजारी अरैल घाटाच्या सेक्टर २३ मधे स्वामी विवेकानंद केंद्रात ठरलेलं होतं. मनोजवं विवेकानंद केंद्राशी निगडीत असल्यामुळे आमची सोय तिथे नियोजित होती. आम्ही उभे होतो तिथून केंद्र १४ किमी दूर होतं. हे अंतर चालत जाण्यासारखं निश्चितच नव्हतं त्यामुळे आलिया भोगासी करत आम्ही पुढे सरकत होतो. रिवा गावाजवळ असतानाच प्रयाग राज येथून बाहेर पडणाऱ्या एका कार्यकर्त्याने मनोजवं ला फोन करुन गाडी केंद्राजवळच्या पार्किंग पर्यंत जाईल असं कळवलं होतं पण एकंदरीतच वाहतूक हलल्याशिवाय तिथपर्यंत पोचणं दुरापास्त वाटू लागलं... अखेरीस इंच इंच लढवत आमची गाडी मुख्य रस्त्यावर आली. परतीच्या वाहतुकीने कोंडी मधे भर घातलेली होतीच. खूप वेळानंतर पोलिस चेक पोस्टजवळ गेल्यानंतर सर्व वाहतूक भलत्याच दिशेला फिरवलेली असल्याचा साक्षात्कार झाला. पोलिस सांगतील तसं सरस्वती हाय टेक सिटीमधल्या सगळ्या रस्त्यांवरुन गाडी फिरवत पुन्हा आम्ही त्याच ठिकाणी येऊन उभे राहिलो. अखेरीस एका ठिकाणी तीळा तीळा दार उघड असं करत अरैल घाटापासून जवळच असलेल्या ओमेक्स हाय टेक सिटीच्या पार्किंग प्लेसला पोचलो. इथून पुढे सक्तिची पायपीट होती आणि शिल्लक अंतर ६ किमी होतं. आतापावेतो १४ किमी साठी आठ तास कोंडीचा सामना केल्यानंतर ओमेक्स सिटीच्या मैदानात उभारलेल्या पार्किंगला गाडी लावली. मॅपवर पार्किंगची खूण केली, अत्यावश्यक वस्तूंची एक बॅग पाठीवर अडकवली आणि पायपीट सुरु केली. पहाट होत आली होती आणि जिकडे तिकडे श्रद्धाळूंचे जत्थे चालताना दिसू लागले. त्या भाऊगर्दीत इलेक्ट्रीक रिक्षा आणि दुचाकी यांनाच फक्त परवानगी होती. मागच्या सीटवर दोन दोन लोकं बसवून अपेक्षित ठिकाणी सोडण्याची कसरत चालली होती. आम्ही एका बाईक वाल्याला थांबवलं, दोनशे रुपये मोबदला मान्य करुन एक जोडी निघाली. स्थानिकांना हा उत्पन्नाचा मार्ग मिळाला होता. दिवसरात्र काम केलं तरी गि-हाईक संपणार नाही इतकी गर्दी... स्वयंरोजगारीत, कॉलेजला जाणारे युवक आपापल्या दुचाक्या घेऊन छान कमाई करत होते. येणारी लक्ष्मी मिळविण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीला तोड नव्हती. त्या अफाट गर्दीतून तोल सावरत इच्छित स्थळी नेणं म्हणजे खाऊच्या गप्पा नव्हत्या. अख्खी रात्र वाहतूक कोंडीत काढून आम्ही अखेरीस विवेकानंद केंद्राजवळ पोहोचलो. उशिरा का होईना पण नियोजित वेळापत्रकानुसार आम्ही प्रयाग राज येथे मुक्कामी पोहोचलो होतो. सकाळ झालेली असल्यामुळे संगमावर जाणाऱ्या लोकांची गर्दी सुरु झाली होती. यमुनेच्या प्रत्येक तटावर वाळूमध्ये गाड्या फसू नयेत यासाठी पोलादी प्लेट्स टाकून रस्ते केलेले होते. नदी ओलांडण्यासाठी अस्थायी स्वरूपात पादचारी पूल उभारलेले होते. याआधी घडून गेलेल्या एका प्रसंगातून धडा घेत श्रद्धाळूंना सुखरुप पुढे जाण्यासाठी सातत्याने वाहतूक नियमन केलं जात होतं. हजारो एकरात उभे आडवे रस्ते आखून कोंडी होणार नाही यासाठी प्रत्येक यंत्रणा अखंडपणे राबत होती. ठिकठिकाणी होड्यांचे धक्के उभारलेले होते तरीही पर्यटकांची संख्याच इतकी होती की या व्यवस्था पण अपु-या पडाव्यात. 

सकाळच्या वेळेत असणारी गर्दी पाहता जागरण मोडण्यासाठी अडीच तीन तासांची निश्चिंती करुन आम्ही तंबूचा आश्रय घेतला. 


क्रमशः 

१६.०२.२०२५

Saturday, March 1, 2025

महाकुंभ २०२५ - दिवस पहिला

सर्वत्र महाकुंभाची आणि त्यातील रोजच्या गर्दीच्या उच्चांकांची चर्चा ऐकायला येत होती. १४४ वर्षांनंतर जुळून आलेल्या या योगाची पेपर, फेसबुक, व्हॉट्स अप वर रोजची चर्चा वाचायला मिळत होती. आपणही या गर्दीचा एक हिस्सा असू असं मला जर कोणी जानेवारीच्या मध्यात सांगितलं असतं तर मी फक्त हसलो असतो. अमरनाथ यात्रेनंतर अती गर्दीच्या ठिकाणी जाणं मी सहसा टाळत आलोय. पण अमृताच्या "जाऊया का आपण सुद्धा" या एका अचानक प्रश्नावर माझ्या तोंडून होकार कधी गेला कळलंच नाही. महाकुंभ म्हणजे नुसतं हो म्हटलं आणि निघालो इतका सोपा भाग कधीच नव्हता. रेल्वे तिकीट्स शिल्लक नाहीत, विमानाचा खर्च खिशाच्या ताकदीपलिकडचा, त्यामुळे स्वतःची गाडी नेणं एवढाच पर्याय हाती होता. एवढ्या लांब जायचं तर इतरही ठिकाणं करायची म्हणजे किमान आठ ते दहा दिवसांची बेगमी करायला हवी हे निश्चित होतं.
८ फेब्रुवारीला माझा १२०० किमी सायकलिंग इव्हेंट होता. त्यामुळे त्यानंतरच जाणं शक्य होतं. घरी आईबाबा वयस्कर असल्याने त्यांची सगळी सोय बघणं हा घराच्या भिंती आतला भाग स्वाभाविकच अमृताने निभावला. भिंती बाहेरचा म्हणजे रुट, ठिकाणं, सोबती हा विषय माझ्याकडे होता. १२ फेब्रुवारीला अमृत स्नान पर्वणी होती त्यामुळे ती गर्दी ओसरल्यानंतर म्हणजे १५ तारखेला निघायचं निश्चित करुन ठेवलं. आईबाबांच्या सोबतीला एक बहिण येणार होती, भरीला अनुप होताच. एक बाजू निभावली म्हटल्यावर सोबत कोण घ्यायचं याचा विचार सुरु झाला. सोबत यायला अनेकजण इच्छुक होते पण शक्यतो गाडी चालवणारे आणि इतके दिवस सुटी काढणारे हवे होते. एका ग्रुप वर कोणीतरी "कुंभाला जाऊन आलेले किंवा जाणारे कोण आहेत" अशी पृच्छा केली त्यावर मी जाणारा म्हणून हात वर केला. दुसऱ्याच मिनिटाला मनोजवं चा मेसेज आला, की सोबती ठरले नसले तर मी येऊ का? प्रवासाची आवड असणारा आणि भरपूर अनुभव, ओळखी गाठीशी असणारा मनोजवं सेकंदात होकार घेऊन फायनल झाला. नुकतीच अमेरिका वारी झालेली असल्याने मनोजवं एकटाच येणार होता. म्हणून अमृताने तिच्या बहिणीला सौ. सायलीला भीतभीतच विचारलं, तर ती चक्क तयार झाली. तिचं हो म्हणणं हा मला जरा धक्काच होता पण त्यामुळे सोबती कोण हा विषय निकाली निघाला. प्लानिंगला सुरुवात झाली खरी पण १२०० किमी सायकल इव्हेंटमुळे किमान पंधरा दिवसानंतरची आमची तारीख असल्याने कधी कोणाची नकारघंटा वाजेल याची पोटात थोडी धाकधूक होती. इतर इच्छुकांना प्लान बी म्हणून होल्डवर ठेवून मी १२०० किमी सायकलिंग इव्हेंटच्या तयारीत गुरफटलो.  ८ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी असा सायकल इव्हेंट आटपून मी आलो तोच खोकला आणि सर्दी घेऊन. लेकीने आधीच औषधं सुरु केली होती पण थकवा होता. आराम करुनही उतार पडत नव्हता. पण आता ठरलंय तर मागे यायचं नाही म्हणून तयारीला लागलो. मनोजवं सोबत रुट, ठिकाणं, बुकींग यांची रुपरेषा फायनल झालेली होतीच. १४ तारखेला चिपळूणला येऊन एकत्रित निघण्याचं ठरलं होतं त्यानुसार १५ तारखेला सकाळी ५.३० ला आम्ही चिपळूण हून प्रस्थान ठेवलं.
कोयनानगर ते पाटण खराब रस्त्याला पर्याय म्हणून कोयना नदीच्या दुसऱ्या काठाने प्रवास करुन सातारा, लोणंद, अहिल्यानगर मागे टाकत शनि शिंगणापूरच्या आसपास पोटपूजा केली. कोरड्या हवामानामुळे हवेत उष्णता जाणवत होती.छत्रपती संभाजी नगरला समृद्धी महामार्गाला जॉईन होण्याचा चक्रव्यूह भेदून आमचा प्रवास सुरु झाला. आता नागपूर ४५४ किमी दूर होतं पण गुगल मॅप हेच अंतर आम्हाला साडेचार तासात पार होण्याची ग्वाही देत होता. समृद्धी महामार्गावर हे शक्य असल्याने रात्रीच्या नागपूर मुक्कामाबाबत आम्ही निश्चिंत होतो. सांजवेळ झाली आणि गाडीचे दिवे उजळले. थोड्याच वेळात असं लक्षात आलं की आपल्या गाडीचा हाय बीम लाईट चालत नाहीये. सुदैवाने एक फ्युएल पंप जवळच होता. तिथे गाडी लावून खुडबुड करुन बघितली. दोन्ही बल्ब्ज ओके होते, बहुतेक वायरिंग सर्किट मधे गडबड होती. नाईलाजाने आम्ही लो बीमवर पुन्हा पुढे निघालो. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून प्रयाग राजला जाणारे बहुतांश जण नागपूर मुक्कामासाठी उमिया धामला पसंती देतात. सुरुवातीच्या फोनवर आम्हाला नकार मिळाला पण सोबत फॅमिली आहे हे सांगितल्यानंतर आम्हाला रुम मिळाली. यथावकाश साडेनवाला जवळपास ९००+ किमी अंतर कापून आम्ही नागपूरला पोचलो. रस्त्यापलिकडे काकांचा ढाबा नामक हॉटेलमधे आमची पोटपूजा झाली. दुसऱ्या दिवशी प्रयाग राजला लवकरात लवकर पोचण्याचं उद्दिष्ट होतं कारण महाकुंभाला भारतभरातून येणाऱ्या श्रद्धाळूंच्या गाड्या प्रयाग राजच्या दिशेने धावत असल्याने चक्का जामच्या बातम्या आमचं टेन्शन वाढवत होत्या...

क्रमशः 
१५.०२.२०२५

Tuesday, August 29, 2023

अशी पाखरे येती

अशी पाखरे येती 




सन 2011 चा सुमार असेल, एक लॅब्रॅडोर जातीची कुत्री तू सांभाळशील का अशी मला विचारणा झाली.. मूळ मालकाला सांभाळणे अशक्य झाले म्हणून त्याने आपल्या मित्राला दिलेली, पण तिथेही तिची हेळसांड सुरु झाली होती. माझ्याकडे लँब्रडॉर मेल होताच, त्यात आणखी हीची भर कशाला असं वाटत असतानाच माझ्या तोंडून नकळत होकार बाहेर पडला.  स्वजातीय असली तरी नावाने मात्र परकीय होती – मॅक्सी... तिचं नाव ऐकून स्मृती चाळवल्या.. कुठे बरं हिला पाहिलंय? येस्स, किरणच्या घरी.. तेव्हाही ती लहानखुरीच होती पण तरी तिची ही दशा? अत्यंत हडकुळी, कमालीची थकलेली, केस झडलेले आणि नाक सुकलेलं... पाणीदार डोळे अगदीच निस्तेज झाले होते. कोणत्याही परवानगीविना मॅक्सी मला ओलांडून आत गेली आणि हक्काचं घर मिळाल्याच्या आनंदात हॉलचा कोपरा गाठून झोपून गेली.
रात्र झाली आणि सवयीने तिने हॉलमधल्या सोफ्यावर उडी मारली. सोफ्यावर बसण्याचा अधिकार फक्त माणसांचा, हा नवीन घरातला पहिला धडा तिला कळला आणि कोप-यातला गोणता हाच आपला सोफा तिने स्विकारलाही.. रोजचं खाणं तिच्या देहाएवढंच, इवलुसं.... मॅक्सी स्वभावाला अगदीच गरीब होती पण दादागिरी करायला जोडीदारीण छान मिळाली, हा मेलचा आनंद तिने क्षणार्धात नेस्तनाबूत करुन टाकला. त्याच्या खाण्याच्या ताटलीत बिनदिक्कतपणे तोंड घालून ती खाऊ लागली आणि तिचे खाणं संपेपर्यंत तो मुकाट उभा राहीला.  मॅक्सीने पहिल्याच वेळी त्याचं जे पाणी जोखलं, ते शेवटपर्यंत कायम राहीलं.. स्वत:चं खाणं घाईनं संपवून ती त्याच्या खाण्यावर बिनधास्त डल्ला मारायची. त्याला तिची भिती होती असं नाही, कारण कित्येकदा तिला भूक नसतानाही तिला भुंकून उठवल्याशिवाय आणि तिने खाल्ल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरायचा नाही. आजवर भाकरतुकडा खाणारी मरतुकडी मॅक्सी आमच्याकडे पेडीग्री खाऊ लागली, छान बाळसं धरु लागली. पुढे पुढे तर दोघंही पायपुसणं दोन टोकांना धरुन हिसकाहिसकी करायची.. ताकदीनं तिच्यापेक्षा दुप्पट असलेल्या मेलला ती पुरुन उरायची. लुटुपुटीच्या भांडणातला त्याच्यावरचा तिचा गुरगुराट ऐकण्यासारखा असायचा.
   
दोघंही संसारात रुळली आणि एप्रिल महिन्याच्या एके रात्री तिला प्रसववेदना सुरु खाल्या. तिच्या मूळच्या नाजूक तब्येतीमुळे जरा काळजी होती पण शेवटी मुक्या जीवांचा देवच राखणकर्ता... रात्री अकरापासून अडीच वाजेपर्यंत एकामागोमाग चार पिल्लं झाल्यानंतर तिने जी टाईमप्लिज घेतली ती सकाळपर्यंत.  अजूनही पोटातली उर्वरीत पिल्लं हाताला लागत होती. कळा तर येत होत्या पण त्यांचा जन्म होत नव्हता. अखेरीस कळा देऊन मॅक्सी थकली, अन एक पिल्लू मार्गातच अडल्याचं लक्षात आलं... रत्नागिरीच्या डॉ. अविनाश भागवत यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे उपाय झाले पण पिल्लू जागचं हलत नव्हतं. आता मात्र मॅक्सी जास्तच थकत चालली. तिला कळा देण्याचं पण त्राण उरलं नव्हतं. डॉ.भागवत रत्नागिरीहून धावत आले.. अडलेले पिलू सोडवल्यानंतर आणखी चार पिल्लं जन्माला आली आणि एकंदर 19 तासांचं नऊ पिल्लांचं बाळंतपण संपलं. जात्याच सोशिक असलेली मॅक्सी सर्व पिल्लांना कुशीत घेऊन पहुडली होती. दिसामासांनी बाळसं धरलेली सगळी पिल्लं प्रकृतीच्या बाबतीत मेलवर गेली.. एकदम दणकट.. योग्यवेळी चांगली स्थळ पाहून सगळी आपापल्या घरी गेली. यानंतर दर हिवाळ्यात मॅक्सीची कूस उजवत राहीली आणि तिने चार बाळंतपणात एकूण 32 पिल्लांना जन्म दिला.  ”मॅक्सीची तब्ब्येत उत्तम राहायला हवी असेल तर आता बाळंतपण बास” हा डॉ.भागवतांचा सल्ला मानून तिचा पाळणा थांबवला आणि त्यानंतर तिच्या अंगावर मूठ मूठ मांस चढत गेलं.. वय वाढत चाललं होतं, बारीक सारीक कुरबुरी, स्कीन इन्फेक्शन यांना तोंड द्यावं लागत होतं, तरीही ती आहे तशी खूष, आनंदी होती.
रोज बाहेरुन आम्ही घरी आलो की कितीही आजारपण असलं नसलं तरी मॅक्सी गेटपर्यंत स्वागताला यायचीच. मे महिन्याच्या उन्हाळ्यात मेल आळस करायचा पण तापल्या टाईल्सवरुन मॅक्सी पुढे यायची. दारावरुन जाणा-या येणा-यांना ही जोडगोळी इतकी कौतुकाची होती की कोणीही हाक मारुनच पुढे जाणार. माझी कुसुमआत्या तर मेहूण काय म्हणतंय असंच विचारायची. बहिणीची मुलं मे महिन्यात सुटीला आली की त्या दोघांना फिरवायला न्यायचं कंत्राट त्यांच्याकडे असायचं.. त्यातही मॅक्सीला फिरवायला सगळे खूष, कारण ताकदीची गरज नसायची आणि सोडून दिली तरी हाक मारल्यावर परत फिरायची... त्यामानाने मेल दांडगोबा..  अंघोळीच्या वेळी पण तसंच... दोघांनाही मनापासून अंघोळ नको असायची पण चल मॅक्सी अंघोळीला असं दरडावलं की बिचारी अपराध्यासारखी मान खाली घालून बाथरुममधे उभी राहायची.

भितींवरच्या पाली, रस्त्यावरुन जाणारी गाईगुरं ही तिची शत्रुपक्षातली मंडळी होती. ही मंडळी दिसेनाशी होईपर्यंत आरडाओरडा करणं हा आवडीचा व्यायाम.. भिंतींवरच्या पाली हाकलण्याच्या खेळात हॉलच्या भिंतींचा रंग खरवडला गेला, पण तिच्या चाकरीत खंड काही पडला नाही.  डॉ.भागवत इन्जेक्शन द्यायचे म्हणून ती त्यांच्यावर वैतागायची. त्यांची गाडी आली की ते खाली उतरेपर्यंत भुंकत गेटजवळ थांबायची. त्या भुंकण्यात ओळख होती, स्वागत असायचं... पण डॉक्टर गाडीतून उतरले की मॅक्सी पोर्चमधे पळायची. गेटमधून आत आले की बाईसाहेब घरात पळायच्या आणि लपून बसायची.. मग शोधून आणून त्यांच्यापुढे तिला उभं करायचं हे दिव्यच असायचं.  अशातच एक दिवस मॅक्सीला रक्तस्त्राव सुरु झाला. हीट पिरीयड नसल्याने काळजी वाटली आणि ती दुर्दैवाने खरी निघाली. Vaginal Tumor चं निदान झालं, आणि किमोथेरपीच्या पर्वाला सुरुवात झाली.  बिचारीला काय काय सोसायला लागणार होतं हे परमेश्वरच जाणे. पण तरीही एकदाचे ते प्रदीर्घ पर्व संपले. अपेक्षेपेक्षा जास्त झेपवलं तिने... आता काळजी नव्हती पण तरीही मधूनच कधीतरी स्पॉटींग दिसलं की धस्स व्हायचं.  बघता बघता मॅक्सीला वयाची दहा वर्ष पुरी होऊन अकरावे वर्ष लागले. व्याधींमुळे हलक्या झालेल्या शरीरावर वय जरा जास्तच दिसत होतं. मे महिन्यात एकेदिवशी तिने सकाळी दूधाकडे तोंड फिरवलं, तर दुपारची पेडीग्री पण खाल्ली नाही. इन्फेशनने डोकं वर काढलं होतं पण तरीही आवडीचे  पदार्थ म्हणजे टोमॅटो, गाजर, सफरचंद, हापूस आंबा मटकावत होती. मधूनच पोळी पण खायची त्यामुळे काळजी नव्हती. उपचार सुरु झाले पण 10 जूनपासून तिने अत्यंत आवडीचा टोमॅटो देखील खाल्ला नाही तेव्हा तिला गाडीत टाकून रत्नागिरी गाठली.. सलाईनमधून दिलेल्या औषधांनी टकटकी आली खरी पण ती औटघटकेची ठरली. त्यानंतर जेव्हा ती पाणी प्यायची देखील बंद झाली तेव्हा आमच्या तोंडचे पाणी पळाले.  इथूनच रोजच्या  सलाईनचा आणि व्हिटॅमीन इन्जेक्शनचा खुराक सुरु झाला. चिपळूणला खात्रीचा आणि स्पेशालिस्ट व्हेटरनरीयन नाही.  रोज उपचारासाठी रत्नागिरी गाठणंही शक्य नव्हतं.  त्यामुळे डॉ.भागवतनी पूर्वी कधीतरी शिकवलेलं उपयोगात आणून डॉक्टर सांगतील तसं सलाईन आणि इतर उपाययोजना सुरु केल्या.  असंच एकदा सलाईन लावताना ब्लड घेऊन तपासणीला पाठवलं आणि पायाखालची जमीनच सरकली. ब्लड शुगर फक्त 10.40, ब्लड युरिया 224 पांढ-या पेशी 72,500 आणि क्रिआटीनिन 6.51... लक्षणं गंभीर होती. मॅक्सी घरचं काहीच खात नाही आणि आमच्याकडे करणं शक्य नाही म्हणून रुपेश पवार, केतन, आदित्य तिच्यासाठी चिकन सूप घेऊन यायचे. कधी प्यायची, कधी नाही. पण औषधं, सलाईनच्या जीवावर तग धरुन होती. उपचारांना प्रतिसाद म्हणायचा की काय पण भरपूर प्रमाणात पाणी मात्र प्यायला लागली म्हणून साखर मीठ पाणी, व्हिटॅमीन इन्जेक्शन द्यायला लागलो. क्रिआटीनिन वाढलेलं असलं तरी भरपूर लघवी होत होती त्यामुळे काळजी नव्हती. पण हे किती काळ? कारण खाणं काही खात नव्हती. अशक्तपणा वाढतच होता.
रोजच्या सलाईनमुळे आता पायाच्या शिरा लागणं कठीण होऊन बसलं.. मागच्या पायाची शीर लागणं हे कसबाचं काम आणि ती आउट न जाणं हे त्याहूनही महत्वाचं..  19 तारखेला महत्प्रयासाने मागच्या पायाच्या शीरेतून एक सलाईन पूर्ण झालं. पण सकाळ झाली तीच निराशाजनक... आजवर लटपटत्या पावलांनी का होईना पण मॅक्सी बाहेर येत होती, शू करत होती. किडन्या अजूनही काम करत होत्या. आज मात्र तिने अंथरुण सोडलं नाही. उचलून बाहेर नेली तरीही तशीच बसून राहीली. निरुपायाने पुन्हा बेडवर नेऊन ठेवली. खाणं केव्हाच सुटलं होतं. काल थोडं का होईना पाणी पीत होती. आज मात्र मान फिरवत होती.  ऑफीसमधून दुपारी घरी आल्याआल्या पहिला प्रश्न, मॅक्सीने शू केली? उत्तर नकारार्थी मिळालं... बेड देखील कोरडा होता म्हणजे किडनी फंक्शन ढासळू लागल्याची लक्षण.. जोपर्यंत लघवी होत नाही तोपर्यंत सलाईन देणं अशक्य... देवाला हात जोडले.. डॉक्टरनी सांगितलेले लघवी होण्याचं इन्जेक्शन दिलं आणि प्रतिक्षा सुरु झाली... पण ती शेवटपर्यंत प्रतिक्षाच राहीली... रात्र झाली आणि स्थिती गंभीर बनली.. मॅक्सी कण्हत होती. तिच्या बेडशेजारी बसून सर्वांगावरुन हात फिरवला की शांत रहायची पण उठून झोपायला गेलो की कण्हायची. शेवटी एक वेदनाशामक इन्जेक्शन दिल्यावर तिला आराम पडला... तिच्याशेजारी सुमारे साडेचारपर्यंत बसून होतो.. झोप लागल्ये बघून मी पण झोपायला गेलो..
जाग आली तर सकाळचे साडेसात वाजलेले.. पांघरुण फेकून आधी मॅक्सीकडे धावलो आणि काळजाचा ठोकाच चुकला. माझ्या आणि तिच्या झोपेतच तिचा श्वास थांबला होता. पापण्यांची तटबंदी भेदून अश्रू अनिर्बंधपणे वाहू लागले. अत्यंत सोशिक आणि गुणी अशी आमची पोर त्या जीवघेण्या आजारापुढे हरली.  मुका जीव यातना सांगू शकत नाही, आपण असहाय्यपणे पाहत राहण्याखेरीज काही करु शकत नाही.  आजाराचं स्वरुप पाहता ती फार दिवस काढणार नाही हे कळलं होतं पण अखेरच्या दिवशी तिला झालेल्या यातनांनी खूप वाईट वाटलं. तिच्या शेजारी बसून अंगावरुन हात फिरवला की ती शांत व्हायची. ती कण्हत होती ते तिला आधार हवा होता म्हणून की दुखत होतं म्हणून, हे मला नाही ठरवता येत. पण एक नक्की की हाताचा स्पर्श तिला कळत होता आणि तोच तिला वेदना सहन करायला ताकद  देत होता.

घशातला आवंढा गिळून परसदारी तिचे क्रियाकर्म उरकले अन आत आलो.  सवयीने तिच्या रोजच्या जागांकडे लक्ष गेलं. त्या रिकाम्या जागांनी काळजाला घरं पाडली. मेलला खाणं घालताना नेहमीप्रमाणे दोन भांडी उचलली गेली.. आता एकाच भांड्याची सवय करायला लागणार होती.  अनुप कॉलेजला गेला होता तर नेहाचा पेपर असल्याने त्यांना कळवलेले नव्हते. संध्याकाळी ते दिव्य पार पाडायचे होते. स्वत:ला सांभाळू की त्यांना हेच कळत नव्हते. गेले पंधरा दिवस ऑफिसमधून लवकर येऊन तिचं स्पंजिंग, पावडर आणि मग औषधं, सलाईन हा क्रम म्हणजे एक रुटीन झालं होतं. आज संध्याक़ाळी घरी आल्यावर मात्र एक रितेपणा मनाला व्यापून राहीला...


दूरवर कोठेतरी गाणं लागलं होतं... अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती... अश्रूंचा बांध पुन्हा फुटला, मात्र तो थोपवण्याची ताकद माझ्यात उरली नव्हती. 


अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
.....
.
.
.

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती  
     
मनोज

21.06.2019         



Saturday, October 31, 2020

Thousand by hundred

Thousand by hundred
३०.१०.२०२०

आजचं टार्गेट होतं शंभर किमी सायकलिंग.... सोबत एलिव्हेशन पण एक हजार मीटर पेक्षा अधिक करायचं होतं.... थोडक्यात सपाट रस्त्यावर सायकल चालवून उपयोग नव्हता. एकच ऑप्शन म्हणजे कुंभार्ली घाटमाथा. पण तिथेपर्यंत गेल्यावर ना सेंच्युरी पूर्ण होत ना एलिव्हेशन पूर्ण होत.. घाटमाथा उतरुन पुढे गेलं, अगदी कोयना बसस्टँड पर्यंतचं गेलं तरी अंतर ४४ किमी होतं. कदाचित एलिव्हेशन मिळेल पण अंतराचं काय म्हणून शिवसागर जलाशयाच्या काठाने ओझर्डे धबधबा हे डेस्टिनेशन मनात धरलं. अंतर ५३-५४ किमी होतं आणि चढही आहेत. परतीच्या प्रवासात कुंभार्लीचा कोयना बाजूचा चढ.. दोन्ही टार्गेट्स साध्य होतील याची खात्री पटल्याने सकाळी पावणेपाचला घर सोडलं.
पोफळी चेकपोस्टला पोचता पोचता पूर्व दिशा उजळू लागली. जसा घाट चढू लागलो तसा हवेतील गारवा पण वाढू लागला. अशा आल्हाददायक वातावरणात सायकल चालवणं म्हणजे निव्वळ सुख.. पोफळीतून लोकं मॉर्निंग वॉकसाठी घाटरस्त्याला चालत असतात. हायहँलो करत पुढे जात घाटातून तांबे कँटीन कडे जाणाऱ्या फाट्यावर थांबलो. एक गावठी पण गोडूला कुत्रा शेपटा हलवत पुढे आला. कुत्रा हा माझा वीक पॉईंट, त्याच्या चारपाच उड्या अंगावर घेऊन पुढे निघालो.
बघता बघता सोनपात्राचं वळण आलं. चार फोटो झाले. शेळके आजोबांशी गप्पा झाल्या आणि सायकल पुढे निघाली. काही दिवसांपूर्वी म्हणजे नेमकं सांगायचं तर १६ ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पन्नाशीतील पन्नाशी पूर्ण करण्यासाठी इथवर आलो होतो. आज मात्र बराच पल्ला मारायचा असल्याने लगेचच पुढे निघालो.
याआधीची घाटमाथा राईड अगदी धुवाँधार पावसात होऊनही शेवटच्या किलोमीटर मधे जामच कुथायला झालं होतं. पण आज मात्र सोनपात्रा ते घाटमाथा टप्पा हसतखेळत म्हणावा असा पार झाला. बाईकवाले अंगठा दाखवून दखल घेत होते. अचानक एक कार थांबली आणि आतून एक जवळचा मित्र आणि त्याची बायको उतरली. दोनचार मिनिटांच्या संवादानंतर जो तो आपल्या मार्गाला लागला. घाटमाथ्यावर पोचून फोटोसेशन आणि पोटपूजा एकाच थांब्यात उरकून घेतलं आणि उताराला लागलो. 
उतार संपला आणि समोर आलेल्या रस्त्याचं वर्णन काय सांगू देवा... निव्वळ गलिच्छ, घाणेरडा रस्ता. इथून हेळवाकला आठ किलोमीटर जाईपर्यंत यमयातना सहन करत एसटीच्या रस्त्याला डावीकडे वळलो. हा रस्ता मात्र मख्खन होता पण चढ काही ठिकाणी परिक्षा बघतात. 
एकदाचा कोयना बसस्टँड आला. इथूनच समोर जाणारा रस्ता ओझर्डे धबधब्याकडे जातो. नेहरु गार्डन जवळच्या चढाने मात्र सत्वपरिक्षा पाहिली. अगदी १x१ गियरवर पण पायात पेटके आले. संपला बाबा एकदाचा चढ आणि समोर आला पाबळनाला धबधबा. अजूनही भरपूर पाणी आहे धबधब्याला. समोरच अथांग असा शिवसागर जलाशय पसरला होता. 
कामरगाव, मिरगाव मागे टाकत वृक्षराजीच्या एका नैसर्गिक बोगद्यात शिरलो. ओझर्डे जवळ आल्याची खूण. नुकताच पाऊस संपल्याने पाण्याची पातळी अत्त्युच्च आहे. अगदी धबधब्याजवळच्या पुलापलिकडे पण फुगवटा आलाय.
कोरोनामुळे प्रवेशबंदी आहे म्हणून बाहेरुनच फोटोग्राफी करुन मी परतीचा प्रवास सुरु केला. जितका आलो तितकंच परत जायचं होतं आणि उन रणरणायला लागलं होतं. पण झाडांच्या सावलीतून जाताना थंडगार झुळका श्रम विसरायला लावतात. वाटेत एक रस्ता अगदी पाण्यापर्यंत जातो. काठावर सायकल लावून निळसर जलाशयाचे फोटो काढले. मुख्य रस्त्यावर येईपर्यंत एवढ्याश्या त्या रस्त्याने चांगलाच घाम फोडला. 
परतीच्या रस्त्यावर हेळवाक येईपर्यंत आता उतारच उतार आहेत. त्यामुळे कोयना स्टँडजवळ येताच तिथला छोटासा सुद्धा चढ नको म्हणून पाटण रस्त्याला लागून जुन्या पुलापर्यंत येऊन हेळवाक गाठलं. नेहमीच्या हॉटेलमध्ये पोटपूजा आटपली. 
माझ्या बहिणी आजच पुण्याहून येणार होत्या. त्यांना हेळवाकला थांबवून सरप्राईज दिलं. निघे निघेपर्यंत आणखी एक मित्र येत असल्याचा फोन आला. पण तो पाटणजवळ असल्याने त्याला घाटमाथ्यावर भेटू असा विचार करुन सायकल दामटली. 
खड्डे चुकवण्याची पराकाष्ठा करताना नवनवीन खड्ड्यातून जात घाटाच्या पायथ्याशी आलो. आता मात्र सावली औषधाला पण नव्हती. चढावर असताना मी सहसा एंड पॉईंटकडे न बघता मान खाली घालून कशात तरी मन गुंतवतो. सकाळचाच फंडा वापरत अथर्वशीर्ष पठण सुरु केलं. आम तो आम, गुठलीओंके भी दाम... डबल फायदा. घाटमाथ्यावर थांबलो तरी पण मित्राचा पत्ता नाही म्हणून मनातच सोनपात्रा मिटींग पॉईन्ट ठरवला. सायकल उताराला लागली. वाटेत एक शँमेलिऑन भर उन्हात रस्ता पार करत होता. नक्की कोणत्या तरी गाडीखाली गेला असता. उचलून दरीच्या बाजूला सोडण्यापूर्वी फोटो मस्टच होते. तो त्याच्या मार्गाने गेला मी माझ्या... 
सोनपात्राला शेळके आजोबा होतेच. घुमटीशेजारी अंग लोटलं आणि कंबर लांब केली. दहाएक मिनिटात मित्र आला, ख्यालीखुशाली झाली आणि पुन्हा घाट उतरायला सुरुवात झाली. पोफळी येईतो हवेतील उष्मा जाणवण्याइतपत वाढला. अजून वीस किलोमीटर, तेही असह्य उकाड्यातून... पण आता सायकलने वेग पकडला होता. मुंढे फार्मजवळ टपरीवर पाणी भरुन घेतलं आणि पिंपळी कँनॉलजवळ थंडगार ताकासाठी थांबलो. खरंच छान ताक मिळालं. एकास एक असे दोन ग्लास रिचवले आणि निघालो. बहादूरशेख आला आणि मग मात्र गती मंदावली. शेवटचे दोनचार किलोमीटर उरले की अगदीच कंटाळा येतो. दर शंभर मीटरवर आता किती उरलं याचा जप करत घरापाशी पोचलो. स्ट्राव्हावर व्यवस्थित नोंदी करुन घेतल्या. लेकाच्या मदतीने स्ट्रेचिंग केलं. अंघोळ झाली आणि पंखा फुल्ल सोडून मी निद्राधीन झालो. डोळ्यांवर झोप आरुढ होण्यापूर्वी पुन्हा एकदा पाहून घेतलं.. 108 किमी आणि 1304 मीटर एलिव्हेशन.... याचसाठी केला होता अट्टाहास... आजच्या दिवसाचं सार्थक झालं..

मनोज भाटवडेकर
९४२१२५३१५३

Monday, September 21, 2020

हिराबा....


"अहो वैनी, असं काय करता? ओली बाळंतीण तुम्ही नी रडतांय काय?"
"अग हिरा, तीन महिने झाले, शाळेवर हजर व्हायला लागेल. आडगावी शाळा... लेकाला सोबत तरी कशी नेणार आणि इथे ठेवायचं तर कुणाकडे ठेवणार?"
"मनोजची काळजी करु नका, मी सांभाळेन. सकाळी भांडी घासून झाली की माझ्यासोबत घरी नेत जाईन. माझ्या चार मुलग्यांसारखाच हा पाचवा मुलगा. तुम्ही नका काळजी करु"

त्या दिवसापासून हिराताई माझी दुसरी आईच झाली. बापू मुंबईला पोलिसात,  पदरात चार मुलगे. पगार बेताचा, महागाईचा काळ त्यामुळे धुणीभांडी करुन संसाराला हातभार लावणा-या अनेक कर्तबगार स्त्रियांप्रमाणेच हिराताई पण आमच्या घरी यायची. खरंतर आमच्या घराशी तिचा त्याहूनही जुना स्नेहसंबंध. हिराताईची आई म्हणजे शांताबाई आणि माझी आज्जी ताईआजी यांच्यापासून सुरु झालेला. दोघी जीवाभावाच्या मैत्रिणीच. त्याकाळी आर्थिक, सामाजिक कोणतीच भिंत त्यांच्या आड नव्हती. शांताबाईच्या सोबत हाताशी म्हणून हिराताई यायची. लग्न झाल्यानंतर काही काळ गेली असेल मुंबईत, पण जागा आणि खर्च यांचा ताळमेळ त्याहीकाळी जमत नसे. शेवटी पुन्हा बि-हाड चिपळूणला हललं आणि मग शिमगा, गणपतीला बापू चिपळूणला यायचे.

शांताबाई अत्यंत सोशिक, गरीब स्वभावाची. बोलणं पण इतकं हळूवार की मनातला सल तिच्याजवळ बोलताना समोरचीला आधारच वाटावा. कोणाला दुखवणं नाही की इकडचं तिकडे सांगणं नाही. तो काळच मुळी माणसं जोडून राहण्याचा असल्याने प्रेमळ स्वभावाच्या शांताबाईचे हे सगळे संस्कार हिराताईवर होत होते. या पार्श्वभूमीवर माझ्या आईची अडचण सोडवायला हिराताई पुढे आली नसती तरच नवल होतं. शांताबाईची सगळी कामं पुढे हिराताईने आपल्या अंगावर घेतली आणि मग आमच्या घरी तिचा राबता सुरु झाला. जसं आजीसोबत तिचं सूत जमलं तशी माझ्या आईजवळ पण तिची गट्टी जमली. हिराताई जरा स्पष्टपणे बोलणारी असल्याने कधीकधी माझ्या बाबांना पण तोंडावर सुनावून मोकळी व्हायची.
 
एकदा एखादी जबाबदारी घेतली की मग मागेपुढे नसल्याने सकाळी आमच्या घरची कामं झाली की मला घेऊन हिराताई तिच्या घरी घेऊन जायची. दुपारचं जेवण वगैरे सगळं तिकडेच. मी हळूहळू मोठा होत होतो. तरीही नकळतं वय होतं. कधीतरी वाराच्या दिवशी माझी जेवणाची वेळ आणि बाकीच्यांची वेळ वेगळी असते हे कळायला लागलं. त्यांच्या ताटातलं वेगळेपण मला कळतं हे समजताच हिराताई मुलांना जेवायला वाढून मला घेऊन बाहेर जायची. "ब्राह्मणाचं पोर आहे, विश्वासानं सोपवलंय माझ्याकडे तर भ्रष्टकार होता कामा नये" या जाणीवेतून ती लक्ष ठेऊन असायची. शाळेचं दप्तर, डबा घेऊन मी हिराताईचं बोट धरुन तिच्या घरी यायचो. रस्त्याच्या पलिकडेच शाळा असल्याने शाळेची वेळ होईपर्यंत मी तिथेच असायचो. जेवण भरवणं, भांग पाडून शाळेची सगळी तयारी इतक्या मायेनं करायची की आई मला सोडून शाळेत जाते याचं कधीच काही वाटलं नाही. कधीतरी असाही प्रसंग घडला असण्याची शक्यता आहे की संध्याकाळी आई आल्यावर घरी जायला मी नकार पण दिला असेल.
 
हिराताईच्या आसपास घरं खूप, मुलांची संख्या पण बक्कळ, त्यामुळे खेळायला सवंगड्याचा तुटवडा नाही. कोकणातले मुख्य सण दोन,  गणपती आणि शिमगा. गणपतीची मोठी मूर्ती असते हे मी हिराताईकडेच पाहिलेलं अन्यथा आमच्याकडे सर्वात कमी किमतीची मूर्ती हाच निकष असायचा आणि चारपाच आरत्या झाल्या की घालीन लोटांगण व्हायचं. पण गोगडेवाडीत ढोलकी, टाळ वाजवून होणाऱ्या दहापंधरा आरत्यांची कायमच ओढ असायची. गणपतीच्या दिवसात खेळे, जाकडी इथेच पाहिली. जी गत गणपती उत्सवाची, तीच शिमग्याची. भैरीबुवाची पालखी आली की मग हिराताईकडून फुगा ठरलेला. फुग्याला शेपटी जोडून तिचा मुकुट करुन माझ्या डोक्यावर चढवायची. अजूनही शिमगा म्हटलं की मला तो फुगा आठवतो. 

कधीतरी बापू मुंबईहून यायचे. आपल्या मुलांबरोबर मलाही कपडे. खाऊ आणायचे पण त्याकाळी पोलिसांची इतकी भिती असायची की मी बापूंजवळ फारसा जायचो नाही. हिराताईची मांडी हेच आमचं सिंहासन होतं. चौथीला मला स्काँलरशिप मिळाली याचा हिराताईला काय आनंद.. सुभाषला म्हणायची बघ, त्याची आईसुद्धा जवळ नसते अभ्यास घ्यायला पण मार्क बघ... तुम्हा मेल्याना आयशीच्या जवळ असून चांगले मार्क मिळवता येत नाहीत.  समोरची शाळा चौथीपर्यंतच होती. पाचवीला मी हायस्कूलला गेलो, या घरचा संपर्क थोडा कमी झाला. पुढे बापूना मुंबईत खोली मिळाली. हिराताई मुंबईला गेली आणि मग पुढे तीही बापू़ंसारखीच सणावारी चिपळूणला यायची. अनिलदादा, सुनीलदादा, दिलिप, आणि सुभाष आपापली शिक्षणं संपवून नोकरी, धंद्याला लागले. जिथून बापू निवृत्त झाले, त्याच पोलिस खात्यात सुनिलदादा नोकरीला लागला याचा हिराताईला प्रचंड आनंद झाला. मी आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईत गेलो तेव्हा मुद्दाम तिच्या खोलीवर गेलो होतो. 
चारी मुलांचे संसार सुरु झाले, जागा अपुरी म्हणून हिराताई बापू चिपळूणला आले. रोज नाही तरी दोनचार आठवड्यातून एकदा तिची चक्कर व्हायची आमच्याकडे. दिलिप वीजमंडळात चिपळूणलाच आला, सुभाषने रिक्षाव्यवसाय स्विकारला. वृद्धत्वाने बापूंना आपल्यासोबत नेले पण हिराताई लोखंडी कांबीसारखी खणखणीत होती. चार सुना, नातवंडं, पतवंडं यांच्या गोकुळात छान रमली होती. तिच्या तरुणपणातील हालअपेष्टा आणि कष्ट यांची जाण माझ्या चारही भावांना आणि वहिनींना असल्याने तिच्या म्हातारपणी तिला सगळ्यांनीच सुख दिलं. सुभाष शेंडेफळ त्यामुळे तिचा त्याच्यावर कांकणभर जीव जास्त. मी सुभाषसोबतच राहणार हे तिने आधीपासूनच बहुधा ठरवलेलं,  त्यामुळे चिपळूणला सुभाषसोबत आणि सुनेसोबत तिचं छान जमलं.  सगळं कसं उत्तम चाललेलं होतं तरीही, कुठेतरी मनात दिलिपदादाची काळजी होतीच. किरकोळ आजारानं त्याची बायको जग सोडून गेलेली. हे दु:ख पचवून हिराताई पुन्हा उभी राहिली तर सुनिलदादाच्या बायकोची काळजी मागे लागली. पण स्वत: धीर न सोडता सगळ्यांना आधार म्हणून हिराताईच उभी राहिली. शरीरावरती वय आणि कष्ट दिसत होते. सोबत मनही जरा डाकलक झालं होतं. बाहेर कोणाकडे जाण्याची उमेद हरवलेली, पण तरीही ती लवकर सावरली. अनिलदादा, दिलिप दोघंही निवृत्तीनंतर चिपळूणलाच स्थायिक होणार हे टॉनिक तिला पुरलं. मी नवीन घर बांधलं याचं तिला कोण कौतुक... दिवसभर हौसेनं वावरली. माझ्या मीठमोह-याच काढायच्या बाकी होत्या. 

मुलगे, सुना, नातवंडं, पतवंडं यांच्या गोकुळात रमलेली हिराताई बघितली की मन प्रसन्न व्हायचं. वाढत्या वयातही नातवंडांवरची जरब आणि माया जराही कमी झालेली नव्हती. पै पाहुणा, शेजारपाजार तिला हवा असायचा. मी तिला खूपदा म्हणायचो की अगं सुभाषला सांग सकाळी रिक्षातून माझ्याकडे सोडायला, रहा दिवसभर, जेव खा, गप्पा मार.  संध्ययाकाळी मी सोडीन... पण नाही, ती नंतर कधी आलीच नाही. विचारलं की म्हणायची, "अरे मी नाही जात घर सोडून कुठेही.. वाटतंच नाही जावसं कोणाकडे". तिच्या मनात काय सल होता तो कधी कळलाच नाही. 

”ताई हथरुणावर पडून आहे, बघून आलास काय?” बालाताई मला विचारत होती. दुपारी ऑफिसला जाण्याआधी मी हिराताईचं घर गाठलं. तिची निस्तेज अशी कुडी बघून मलाच भडभडून आलं. “बरेच दिवस अन्नच सोडलंय... घोटभर चहा, चार चमचे पेज, ज्यूस यावरच आहे. काही दिलं तरी खात नाही” घरची मंडळी सांगत होती. बळेबळे चहा पाजला, गप्पा मारल्या पण ती नेहमीची हिराताई नव्हती. कुठेतरी ट्रान्समधे हरवलेली.. “परत येतो उद्या तुला भेटायला” असं सांगून बाहेर पडलो. संध्याक़ाळी घरी आलो, खूप सा-या आठवणी उचंबळून आल्या त्या शब्दबद्ध करायला घेतल्या. अर्ध्याहून अधिक उतरवूनही झालं. तिच्यावर लिहिलेलं तिलाच वाचून दाखवायचं होतं पण अर्ध्यावरती शब्दच हरवले. हिराताईला पैलतीरावरचे बापू हाका मारताना दिसत होते. ऐलतीर कधीही सुटेल अशी स्थिती होती. अर्धवट राहीलेलं परत लिहायचा प्रयत्न केला परंतु सरस्वती माझ्यावर पुन्हा प्रसन्न झालीच नाही.
 
17 तारखेला बालाताईकडे परत एकदा चौकशी केली, परिस्थिती जैसे थे असल्याचं कळलं. पुन्हा एकदा भेटून येऊ असा विचार करत असतानाच संध्याकाळी कळलं.. “हिराताई गेली...” बालपणातला मायेचा धागा तुटला. डोळ्यात खळ्ळकन पाणी आलं. कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्यावर आपल्या मुलांपेक्षाही कांकणभर सरस प्रेम करणारी माझी हिराबा गेली... 

वासांसि जीर्णानि यथा विहाय 
नवानि गृण्हाति नरोSपराणि ||
तथा शरीराणि विहाय जीर्णा 
नन्यानि संयाति नवानि देही ||

॥ ॐ तत्सद ॥  


मनोज भाटवडेकर
२१.०९.२०२०

Saturday, August 22, 2020

शरण तुला भगवंता....

वेणूआजीच्या येरझाऱ्या सुरुच होत्या. सूर्य पश्चिमेकडे कलला. पावसामुळे अधिकच अंधारलेली संध्याकाळ मनाची घालमेल करत होती. पावलं वाजली तशी वेणूआजी पाय ओढीत दरवाज्याकडे गेली. दबक्या पावलानं येणाऱ्या मांजरीची पावलं ऐकू आली पण ऐकू येऊ शकणारी पावलं मात्र अजून ऐकू येत नव्हती. उद्यावर गणपती आले तरी मनाला प्रसन्नता नव्हती. सरावाने बहुतेकशी तयारी करुन झाली होती पण एकट्या घराला पन्नास वर्षांपूर्वीची ती धांदल, गडबड आता पारखी झाली होती. बघताबघता वेणूआजी भूतकाळात गेली. 

वृद्ध सासू, नवरा, दिर, चार मुलं असं गोकूळ होतं हे घर... सणवार अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडायचे. गणपतीच्या दिवसात तर कंबरेचा भुगा व्हायचा. दहा पिढ्यांची परंपरा तोंडपाठ असणारी सासू होती.. मनानं अगदी प्रेमळ पण वयाने शरीराची धनुकली केलेली. कपाळीचं कुंकू किर्तनाची परंपरा चालवत होतं, त्यामुळे खर्चाची तोंडमिळवणी करताना जीव अगदी मेटाकुटीला यायचा. दारासमोरच गोठा होता त्याचं दुधदुभतं घरी खाऊन उरेल ते विकून चार पैसे कनवटीला लावता यायचे. परसांव मोठं होतं तिथे पावसात भाज्या करायच्या त्या अगदी दिवाळीपर्यंत तोंडी पुरायच्या.... थंडीत केलेले कुळीथ, मूग, पावटा वर्षभर पुरायचा. संपन्नता नव्हती पण विपन्नावस्था नक्कीच नव्हती. माहेर असं उरलंच नव्हतं त्यामुळे सासरचे संस्कार, परंपरा जोपासण्यात वेणूआजीचं अवघं आयुष्य गेलेलं... चैत्रातल्या हळदीकुंकवापासून जी सुरुवात व्हायची, ती रामनवमी, हनुमानजयंती पार पडेतो चातुर्मासातल्या व्रतवैकल्यासाठी कोणाचातरी डेरा पडायचा. पाठोपाठ गणपती, नवरात्र, दिवाळी, शिवरात्र आणि मग शिमगा... वेणूआजीला उसंत नसायची. शिरुभाऊंची किर्तनसेवा चालूच होती. मुलं मोठी होत गेली. सासूने इहलोकीची यात्रा संपवली. जावई आले, नातवंड आली.. पाठोपाठ सून आली पण घरात बाळपावलं पडायच्या आत कर्ताधर्ता मुलगा गेला. सुनेनं पाठ फिरवली तरी वेणूआजी डगमगली नाही. वृद्ध दिर आणि सौभाग्यासाठी ती राबतच राहिली. मुली, जावई येऊन जाऊन होते. थोरलीची मदत होतीच भरीला दिराची पेन्शन असल्याने घरात चार दिडक्या खेळत्या राहिल्या. वेणूआजी म्हातारपणाकडे झुकली आणि अचानक दिराने देह ठेवला. आता त्या घरात दोघंच उरली. खेडेेगाव असल्याने दारावरुन जाणा-या येणा-यासाठी हक्काच्या घराचे दरवाजे सताड उघडेच असायचे. वाडीतल्या लोकांची ओटीवर उठबस व्हायची तेवढाच विरंगुळा.

"वेणूआजी, अगं पाट दे... मूर्ती आणून ठेवतो" शेजारच्या मुलांचा पुकारा ऐकून आजी तंद्रीतून जागी झाली. "हो, खरंच की, मूर्ती आणून ठेवायला हवी".. असं म्हणत पाट, विडासुपारी, नारळ आणि वस्त्र देऊन आजी परत ओटीवर बसली. दारात झोपाळा होता पण कधी बसायला वेळच मिळाला नाही आणि मग पुढे सवय नाही म्हणून गरगरायचं.. वेणूआजी त्या झोपाळ्याकडे बघताबघता पुन्हा तंद्रीत गेली. 

नैवेद्यासाठी मोदक हवेत म्हणून खूपदा थोरली मदतीला यायची. तिच्या घरी पण गोतावळा खूप, मग वेणूआजीची एक मैत्रीण होती ती आणि आजी मिळून मोदक करायच्या. बघताबघता पाच दिवसांंचा गणपती हळूच दीड दिवसावर आला. थोरलीची जबाबदारी मधली आणि धाकटीनं आपल्या शिरावर घेतली. शिरुभाऊंना गणपतीची उस्तवार कठीण होऊ लागली म्हणून मग थोरलीचा लेक घरचा गणपती बसवून आजोळचा गणपती बसवायला यायचा. आता मात्र नोकरीमुळे ही कसरत त्यालाही कठीण होऊ लागली. 
वृद्धत्वानं एके दिवशी वेणूआजीच्या हातातला शिरुभाऊंचा हात आपल्या हाती घेतला आणि मग आजी अगदीच एकटी पडली. म्हातारपण कान आणि गुढगेदुखीच्या रुपात खुणावत होतं तरी वेणूआजीचा एकटा हात घरावर फिरत होता, सणवार पार पाडले जात होते. गेली चार वर्ष खूपच दगदग होते आहे हे पाहून मधलीनं आईला फर्मावलं... "यावर्षी गणपतीला प्रार्थना कर. इतकी वर्षे सेवा केली पण आता नाही झेपत. यावर्षीची ही अखेरची सेवा गोड मानून घे"
आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।
पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।।

मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तिहीनम् सुरेश्वर।
यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।

अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।
तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।।

वर्षानुवर्षे गणपती पूजा सांगणारे भार्गवगुरुजी खर्जातल्या स्वरात प्रार्थना करत होते. मनाची चलबिचल, अस्वस्थता मागे टाकून वेणूआजीने एकदाचा धीर केला आणि गुरुजींना थांबवले. मधलीचा मानस ती आपल्या मुखाने व्यक्त झाली खरी पण डोळ्याला लागलेल्या धारा आणि रुद्ध झालेला कंठ तिला पुढे बोलू देईना. चमत्कारिक परिस्थितीत सगळे अवघडून उभे असतानाच धाकटी पुढे झाली. "गुरुजी, ही म्हणत्ये ते खरं असलं तरी तिचं मन ते स्विकारणार नाही. सणवार, उत्सव यापुढे पार पाडताना कठीण होणार असलं तरी या वयस्कर लोकांचं जगण्याचं हेच बळ आहे. करु काहीतरी आम्ही. पुढच्या वर्षाचं पुढल्या वर्षी बघू पण आत्ताच प्रार्थना करुन तिला विरक्त नका करु. नाही जमणार तिला ते" धाकल्या जावयानं पण मान डोलावली. वेणूआजीच्या डोळ्यात निराळीच चमक आली. घोगरा झालेला आवाज मोकळा झाला. गुरुजी पण गालातल्या गालात हसले आणि मंत्रपुष्पांजली म्हणू लागले.
 
"गणपती बाप्पा मोरया"... जोराचा गजर झाला.. वाडीतली मुलं गणपती घेऊन दारात उभी होती. पायावर दूधपाणी वाहून मुलांंना आत घेतलं. नेहमीच्या जागेवर बाप्पा विराजमान झाले. परातीत चिवडा ओतून मुलांच्या समोर धरत वेणूआजी प्रत्येकाची चौकशी करत होती. "उद्या येतांव आरतीला, भरपूर प्रसादी करुन ठेवा" फर्माईश करुन मुलं पसार झाली. अंधार दारा खिडक्यांमधून घरात घुसला तशी आजीने चारीठाव दिवे लावले. शुभंकरोती म्हणून देवाला हात जोडले तरी उद्याची चिंता काही मिटली नाही. भार्गवगुरुजींचा निरोप होता, उद्या सकाळी नऊ वाजता येणार असल्याचा. म्हणजे सकाळी उठल्यावर बाकी तयारी केली तरी चालणार होती पण मग आत्ताची अस्वस्थता जायला म्हणून आजी फुलवाती वळायला बसली. "हे असते तर आत्तापर्यंत चार वेळा चहा टेकायला लागला असता आणि मग प्रत्येक चहानंतर पान चुरडायला हवंच" आजी शिरुभाऊंच्या आठवणीत गुंतली. वाती झाल्या, समया सजल्या. "तरीच म्हटलं काहीतरी विसरलंय, गणपतीला कापसाची वस्त्र राहिली." तीनफेरी वस्त्र करुन झालं, ताम्हन भरलं, विडे, सुपारी, पत्री, नारळ, हळदकुंकू, अबीर, बुक्का.... सगळ्या तयारीवर आजीची नजर फिरली आणि चेहऱ्यावर खुशी आली. "यांना अशी साग्रसंगीत तयारी लागायची, चालवून घेणं अजिबात जमायचं नाही. पण खरं सांगायचं तर त्यातही एक आनंद होता" उसासा टाकून वेणूआजी वळली तर दारात धाकलीचा लेक हजर... आsज्जीsss करत आत आला. "गणपती गजानना, तूच तुझी सेवा करुन घेतोयस रे.... अरे, मला उद्याच्या पूजेची काळजी आणि तू इकडे छान पाटावर बसून निवांतपणे व्यवस्था करुन मोकळा... तुलाच रे बाबा माझी काळजी..." 
"काय वेणूआजी? यंदा करायची का प्रार्थना?" भार्गवभटजी मिश्कील आवाजात विचारत होते.
"माझा हा नातू असेपर्यंत मनात सुद्धा नका आणू.. साग्रसंगीत होऊ द्या पूजा..." आनंदविभोर वेणूआजी उत्तरली. 

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता। विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी । गणपती बाप्पा मोरया ॥