सर्वत्र महाकुंभाची आणि त्यातील रोजच्या गर्दीच्या उच्चांकांची चर्चा ऐकायला येत होती. १४४ वर्षांनंतर जुळून आलेल्या या योगाची पेपर, फेसबुक, व्हॉट्स अप वर रोजची चर्चा वाचायला मिळत होती. आपणही या गर्दीचा एक हिस्सा असू असं मला जर कोणी जानेवारीच्या मध्यात सांगितलं असतं तर मी फक्त हसलो असतो. अमरनाथ यात्रेनंतर अती गर्दीच्या ठिकाणी जाणं मी सहसा टाळत आलोय. पण अमृताच्या "जाऊया का आपण सुद्धा" या एका अचानक प्रश्नावर माझ्या तोंडून होकार कधी गेला कळलंच नाही. महाकुंभ म्हणजे नुसतं हो म्हटलं आणि निघालो इतका सोपा भाग कधीच नव्हता. रेल्वे तिकीट्स शिल्लक नाहीत, विमानाचा खर्च खिशाच्या ताकदीपलिकडचा, त्यामुळे स्वतःची गाडी नेणं एवढाच पर्याय हाती होता. एवढ्या लांब जायचं तर इतरही ठिकाणं करायची म्हणजे किमान आठ ते दहा दिवसांची बेगमी करायला हवी हे निश्चित होतं.
८ फेब्रुवारीला माझा १२०० किमी सायकलिंग इव्हेंट होता. त्यामुळे त्यानंतरच जाणं शक्य होतं. घरी आईबाबा वयस्कर असल्याने त्यांची सगळी सोय बघणं हा घराच्या भिंती आतला भाग स्वाभाविकच अमृताने निभावला. भिंती बाहेरचा म्हणजे रुट, ठिकाणं, सोबती हा विषय माझ्याकडे होता. १२ फेब्रुवारीला अमृत स्नान पर्वणी होती त्यामुळे ती गर्दी ओसरल्यानंतर म्हणजे १५ तारखेला निघायचं निश्चित करुन ठेवलं. आईबाबांच्या सोबतीला एक बहिण येणार होती, भरीला अनुप होताच. एक बाजू निभावली म्हटल्यावर सोबत कोण घ्यायचं याचा विचार सुरु झाला. सोबत यायला अनेकजण इच्छुक होते पण शक्यतो गाडी चालवणारे आणि इतके दिवस सुटी काढणारे हवे होते. एका ग्रुप वर कोणीतरी "कुंभाला जाऊन आलेले किंवा जाणारे कोण आहेत" अशी पृच्छा केली त्यावर मी जाणारा म्हणून हात वर केला. दुसऱ्याच मिनिटाला मनोजवं चा मेसेज आला, की सोबती ठरले नसले तर मी येऊ का? प्रवासाची आवड असणारा आणि भरपूर अनुभव, ओळखी गाठीशी असणारा मनोजवं सेकंदात होकार घेऊन फायनल झाला. नुकतीच अमेरिका वारी झालेली असल्याने मनोजवं एकटाच येणार होता. म्हणून अमृताने तिच्या बहिणीला सौ. सायलीला भीतभीतच विचारलं, तर ती चक्क तयार झाली. तिचं हो म्हणणं हा मला जरा धक्काच होता पण त्यामुळे सोबती कोण हा विषय निकाली निघाला. प्लानिंगला सुरुवात झाली खरी पण १२०० किमी सायकल इव्हेंटमुळे किमान पंधरा दिवसानंतरची आमची तारीख असल्याने कधी कोणाची नकारघंटा वाजेल याची पोटात थोडी धाकधूक होती. इतर इच्छुकांना प्लान बी म्हणून होल्डवर ठेवून मी १२०० किमी सायकलिंग इव्हेंटच्या तयारीत गुरफटलो. ८ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी असा सायकल इव्हेंट आटपून मी आलो तोच खोकला आणि सर्दी घेऊन. लेकीने आधीच औषधं सुरु केली होती पण थकवा होता. आराम करुनही उतार पडत नव्हता. पण आता ठरलंय तर मागे यायचं नाही म्हणून तयारीला लागलो. मनोजवं सोबत रुट, ठिकाणं, बुकींग यांची रुपरेषा फायनल झालेली होतीच. १४ तारखेला चिपळूणला येऊन एकत्रित निघण्याचं ठरलं होतं त्यानुसार १५ तारखेला सकाळी ५.३० ला आम्ही चिपळूण हून प्रस्थान ठेवलं.
कोयनानगर ते पाटण खराब रस्त्याला पर्याय म्हणून कोयना नदीच्या दुसऱ्या काठाने प्रवास करुन सातारा, लोणंद, अहिल्यानगर मागे टाकत शनि शिंगणापूरच्या आसपास पोटपूजा केली. कोरड्या हवामानामुळे हवेत उष्णता जाणवत होती.छत्रपती संभाजी नगरला समृद्धी महामार्गाला जॉईन होण्याचा चक्रव्यूह भेदून आमचा प्रवास सुरु झाला. आता नागपूर ४५४ किमी दूर होतं पण गुगल मॅप हेच अंतर आम्हाला साडेचार तासात पार होण्याची ग्वाही देत होता. समृद्धी महामार्गावर हे शक्य असल्याने रात्रीच्या नागपूर मुक्कामाबाबत आम्ही निश्चिंत होतो. सांजवेळ झाली आणि गाडीचे दिवे उजळले. थोड्याच वेळात असं लक्षात आलं की आपल्या गाडीचा हाय बीम लाईट चालत नाहीये. सुदैवाने एक फ्युएल पंप जवळच होता. तिथे गाडी लावून खुडबुड करुन बघितली. दोन्ही बल्ब्ज ओके होते, बहुतेक वायरिंग सर्किट मधे गडबड होती. नाईलाजाने आम्ही लो बीमवर पुन्हा पुढे निघालो. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून प्रयाग राजला जाणारे बहुतांश जण नागपूर मुक्कामासाठी उमिया धामला पसंती देतात. सुरुवातीच्या फोनवर आम्हाला नकार मिळाला पण सोबत फॅमिली आहे हे सांगितल्यानंतर आम्हाला रुम मिळाली. यथावकाश साडेनवाला जवळपास ९००+ किमी अंतर कापून आम्ही नागपूरला पोचलो. रस्त्यापलिकडे काकांचा ढाबा नामक हॉटेलमधे आमची पोटपूजा झाली. दुसऱ्या दिवशी प्रयाग राजला लवकरात लवकर पोचण्याचं उद्दिष्ट होतं कारण महाकुंभाला भारतभरातून येणाऱ्या श्रद्धाळूंच्या गाड्या प्रयाग राजच्या दिशेने धावत असल्याने चक्का जामच्या बातम्या आमचं टेन्शन वाढवत होत्या...
क्रमशः
१५.०२.२०२५
मला ही फोटो बघून यावं अस वाटलं...आता तुमच्या लेखातून प्रयगराज वारी. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत
ReplyDeleteपुढील भागाच्या प्रतिक्षेत
ReplyDelete