सकाळी पटापट आवरुन आम्ही प्रयागच्या दिशेने निघालो. जगप्रसिद्ध पेंच अभयारण्याची विविध प्रवेशद्वारं मागे टाकत महाराष्ट्राची हद्द ओलांडून खवासा येथे मध्यप्रदेशात प्रवेश केला. अनेक छोटी छोटी हॉटेल्स बघून पर्यटकांनी रात्रीपुरता आसरा घेतला होता. या रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी वाढू लागली होती. सिवनी, लखनादौन मागे टाकत आम्ही जबलपूरला पोचलो. होंडाची शोरुम शोधून लाईटचा दोष दूर केला आणि दुपारच्या जेवणाला कटनी रस्त्यावर धाबा पाहून थांबलो. या भागात शेवभाजी खूप फेमस आहे. कटनीनंतर मैहरजवळ डावीकडे रस्ता चित्रकूटला जातो. रामायण कालीन संदर्भाने चित्रकूट खूप प्रसिद्ध आहे. प्रयागराजवरुन परत येणारे श्रद्धाळू चित्रकूट करुनच परत जात होते. संध्याकाळी रिवाच्या आसपास प्रचंड वाहतूक कोंडीत आम्ही सापडलो. अर्थातच हे अपेक्षित होतं. बायपासला वळविलेली वाहतूक देखील कोंडीत अडकली होती. मधलाच रस्ता पकडून आम्ही रिवा शहरात शिरलो. इथे मात्र तुलनेने कमी गर्दी होती. मधेच कधीतरी मध्यप्रदेशची हद्द ओलांडून आम्ही उत्तर प्रदेशात प्रवेश केला. सर्वत्र पर्यटक आणि त्यांची वाहने यांची भाऊगर्दी होती. ठिकठिकाणी वाहतूक वळविल्यामुळे आपण कोठून कोठे जातोय याचा काहीही ताळमेळ लागत नव्हता. एका ठिकाणी हायवे इतका जाम होता की शेजारच्या वस्तीत शिरुन कच्च्या रस्त्याने गेलो तर वेळ वाचेल असं मॅप दाखवत होता म्हणून अनेक पर्यटक तिकडे जात होते. रात्रीच्या वेळी शब्दशः गल्लीबोळ, शेताडीमधले रस्ते पालथे घालत जाताना गावकरी, मुलं हातात खडूने लिहीलेले बोर्ड दाखवून आम्हाला योग्य रस्त्यावर नेण्याची सेवा करत होते. जसजसं प्रयाग राज जवळ येत गेलं तसतशी वाहतूक कोंडी इतकी होत गेली की गाडीला चिकटून दुसरी गाडी उभी राहत होती. दरवाजे उघडणं पण शक्य नव्हतं. बराच वेळ वाहतूक हलेना म्हणून कसंबसं दार उघडून मनोजवं चालत खूप पुढे गेला. लागोपाठ चार ट्रेन्स जाणार होत्या म्हणून रेल्वे फाटक बंद होतं. बेशिस्त वाहनचालक एका रांगेत न थांबता पुढे घुसत असल्याने फाटक उघडलं तरी रांग पुढे सरकत नसे. कंटाळलेले वाहनचालक आजूबाजूच्या शेतात गाडी पार्क करुन चालत पुढे जात होते.
आमचं वास्तव्य नैनी पुलाशेजारी अरैल घाटाच्या सेक्टर २३ मधे स्वामी विवेकानंद केंद्रात ठरलेलं होतं. मनोजवं विवेकानंद केंद्राशी निगडीत असल्यामुळे आमची सोय तिथे नियोजित होती. आम्ही उभे होतो तिथून केंद्र १४ किमी दूर होतं. हे अंतर चालत जाण्यासारखं निश्चितच नव्हतं त्यामुळे आलिया भोगासी करत आम्ही पुढे सरकत होतो. रिवा गावाजवळ असतानाच प्रयाग राज येथून बाहेर पडणाऱ्या एका कार्यकर्त्याने मनोजवं ला फोन करुन गाडी केंद्राजवळच्या पार्किंग पर्यंत जाईल असं कळवलं होतं पण एकंदरीतच वाहतूक हलल्याशिवाय तिथपर्यंत पोचणं दुरापास्त वाटू लागलं... अखेरीस इंच इंच लढवत आमची गाडी मुख्य रस्त्यावर आली. परतीच्या वाहतुकीने कोंडी मधे भर घातलेली होतीच. खूप वेळानंतर पोलिस चेक पोस्टजवळ गेल्यानंतर सर्व वाहतूक भलत्याच दिशेला फिरवलेली असल्याचा साक्षात्कार झाला. पोलिस सांगतील तसं सरस्वती हाय टेक सिटीमधल्या सगळ्या रस्त्यांवरुन गाडी फिरवत पुन्हा आम्ही त्याच ठिकाणी येऊन उभे राहिलो. अखेरीस एका ठिकाणी तीळा तीळा दार उघड असं करत अरैल घाटापासून जवळच असलेल्या ओमेक्स हाय टेक सिटीच्या पार्किंग प्लेसला पोचलो. इथून पुढे सक्तिची पायपीट होती आणि शिल्लक अंतर ६ किमी होतं. आतापावेतो १४ किमी साठी आठ तास कोंडीचा सामना केल्यानंतर ओमेक्स सिटीच्या मैदानात उभारलेल्या पार्किंगला गाडी लावली. मॅपवर पार्किंगची खूण केली, अत्यावश्यक वस्तूंची एक बॅग पाठीवर अडकवली आणि पायपीट सुरु केली. पहाट होत आली होती आणि जिकडे तिकडे श्रद्धाळूंचे जत्थे चालताना दिसू लागले. त्या भाऊगर्दीत इलेक्ट्रीक रिक्षा आणि दुचाकी यांनाच फक्त परवानगी होती. मागच्या सीटवर दोन दोन लोकं बसवून अपेक्षित ठिकाणी सोडण्याची कसरत चालली होती. आम्ही एका बाईक वाल्याला थांबवलं, दोनशे रुपये मोबदला मान्य करुन एक जोडी निघाली. स्थानिकांना हा उत्पन्नाचा मार्ग मिळाला होता. दिवसरात्र काम केलं तरी गि-हाईक संपणार नाही इतकी गर्दी... स्वयंरोजगारीत, कॉलेजला जाणारे युवक आपापल्या दुचाक्या घेऊन छान कमाई करत होते. येणारी लक्ष्मी मिळविण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीला तोड नव्हती. त्या अफाट गर्दीतून तोल सावरत इच्छित स्थळी नेणं म्हणजे खाऊच्या गप्पा नव्हत्या. अख्खी रात्र वाहतूक कोंडीत काढून आम्ही अखेरीस विवेकानंद केंद्राजवळ पोहोचलो. उशिरा का होईना पण नियोजित वेळापत्रकानुसार आम्ही प्रयाग राज येथे मुक्कामी पोहोचलो होतो. सकाळ झालेली असल्यामुळे संगमावर जाणाऱ्या लोकांची गर्दी सुरु झाली होती. यमुनेच्या प्रत्येक तटावर वाळूमध्ये गाड्या फसू नयेत यासाठी पोलादी प्लेट्स टाकून रस्ते केलेले होते. नदी ओलांडण्यासाठी अस्थायी स्वरूपात पादचारी पूल उभारलेले होते. याआधी घडून गेलेल्या एका प्रसंगातून धडा घेत श्रद्धाळूंना सुखरुप पुढे जाण्यासाठी सातत्याने वाहतूक नियमन केलं जात होतं. हजारो एकरात उभे आडवे रस्ते आखून कोंडी होणार नाही यासाठी प्रत्येक यंत्रणा अखंडपणे राबत होती. ठिकठिकाणी होड्यांचे धक्के उभारलेले होते तरीही पर्यटकांची संख्याच इतकी होती की या व्यवस्था पण अपु-या पडाव्यात.
सकाळच्या वेळेत असणारी गर्दी पाहता जागरण मोडण्यासाठी अडीच तीन तासांची निश्चिंती करुन आम्ही तंबूचा आश्रय घेतला.
क्रमशः
१६.०२.२०२५
No comments:
Post a Comment