Monday, February 20, 2017

ऑयस्टर रॉक आयलंड

कारवारहून 7 किमी किंवा गोवा हद्दीवरच्या पोळे गावातून 11 किमी समुद्रात बोटीने प्रवास करुन आँयस्टर राँक बेटावरती पाऊल ठेवलं. सतत हलणा-या बोटीने मेंदूचा बँलन्स घालवला होताच, भरीसभर जेटीवर शेवाळ होतं म्हणून जपूनच उतरलो. दगडी रॅम्प समुद्रात घुसला होता आणि समोरच्या इमारतीत बोट किना-यावर ओढून घेण्यासाठीची ब्रिटीशकालीन यंत्रणा गंजून पडली होती. सामानसुमानासह आम्हाला उतरवून बोट निघून गेली. दिवस मावळतीकडे झुकू लागला होता. जरा लगबगीनंच आम्ही पायपीट सुरु केली. 10-15 मिनिटात माथ्यावर पोचून बँगा टाकल्या आणि दीपस्तंभाच्या 60 पाय-या चढून वर गेलो. जिन्याला काही ठिकाणी फूटभरापेक्षाही उंच पाय-यांनी श्वास फुलवला पण गॅलरीत प्रवेशल्यावर मात्र फक्त आहाहा.... स्वर्गसुख...  360 अंशात सर्वत्र उसळता समुद्र.. पूर्वेस दूरवर किनारपट्टी दिसत होती पण पश्चिमेस मात्र फक्त चमचमणारे पाणी... सूर्याचा रक्तिमा सर्वत्र पसरला होता आणि ढगांच्या शाईने वेगळीच नक्षी आकाशभर रेखाटली जात होती. दीपस्तंभावरुन खाली उतरावंसच वाटत नव्हतं पण अंधार पसरु लागला. दीपस्तंभातला लाईट उजळला आणि 32 ते 35 किमीच्या परिसरातल्या बोटीना मार्गदर्शन सुरु झाले.
133 वर्षांपूर्वी ब्रिटीशानी या 18 एकर परिसराच्या या बेटावर या  दीपस्तंभाची उभारणी केली. बेटावरच्याच शिळा सुरुंग लावून फोडून ताशीव दगडांचे 20 मीटर उंचीचा स्तंभ म्हणजे बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना आहे. केंद्रसरकारच्या अखत्यारीत हा विभाग येतो.  किना-यापासून अंतर खूप असल्याने सलग पंधरा दिवसांची ड्युटी करुन स्टाफ बदलतो. एकप्रकारची काळ्यापाण्याची शिक्षा पर्यटक अधूनमधून येतात त्यामुळे थोडीफार सुसह्य होते पण पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे मात्र जवळपास एकांतवासच... बेटावर दोन गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत. पावसाळ्याचे पाणी साठवण्यासाठी मोठी टाकी  आहे... पूर्वी भरपूर स्टाफ होता, त्यांच्यासाठी उत्तम निवासव्यवस्था किंबहूना सर्वच सोयी उत्तम व नियोजनपूर्वक उभारलेल्या होत्या पण आता एकावेळी दोनच स्टाफ उरलाय त्यामुळे बहुतेकशा इमारतींचे भग्नावशेषच उरलेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार जनरेटर, सोलर एनर्जी विजेची गरज भागवतात. पण तरीही शासकिय अनास्था लपत नाही
दीपस्तंभावरुन खाली उतरलो, सोबत आणलेल्या रेडीमिक्स कॉफीचा आस्वाद घेतला आणि मूळ कामाकडे वळलो. या बेटावर येण्याचा उद्देश पर्यटन हा नव्हताच... समुद्रात जी बेटं किना-यापासून जास्त अंतरावर आहेत तिथली इकोसिस्टीम ही किना-यावरील इकोसिस्टीमपेक्षा वेगळी असते, आणि किनारा व बेट यातील अंतरानुसार त्यातलं वेगळेपण बदलतं... यस्टर रॉक बेट कारवार किना-यापासून 7 किमी व पोळेपासून तब्बल 11 किमी असल्याने आम्हालाही उत्सुकता होती. बेटावर सर्वत्र कपारी, मोठमोठ्या शिळा, दगडगोटे, झाडंझुडपं आणि वेली, गच्च जाळ्या यांची भरमार होती.  मोठमोठी झाडं असल्याने सर्वत्र पालापाचोळ्याचे ढीग होते.  दोन अडीच तासांची पायपीट करत प्रत्येक दगडाखाली काय लपलंय याचे शोधकाम करत होतो.  वेगवेगळ्या प्रकारच्या पाली, सापसुरळ्या खूप होत्या. पर्यटकानी टाकून दिलेल्या अन्नावर पोसलेले गलेलठ्ठ उंदीर कडेकपारीतून धावत होते. हवेत भरपूर उष्मा होता, घामाघूम झाल्याने आम्ही चांगलेच हैराण झालो होतो. इतकं शोधूनही एकही साप  मिळाला नव्हता आणि तेच मुख्य शोधकाम होतं... सतत वाकल्यामुळे कंबरडं मोडत आलं होतं आणि समुद्रापर्यंत गेलेले डोंगर उतार वरखाली चालून पायाचे अगदी तुकडे पडायला आले होते.  पोटात भुकेचा आगडोंब उसळल्याने काम सुचेना. साप, मुख्यतः अजगर शोधण्याचं काम थांबवून आम्ही परतलो.. पोटपूजा, गप्पागोष्टी करुन उशिरा रात्री आम्ही निद्राधीन झालो.

समुद्रकिना-यापासून इतक्या दूरवर पाली, चोपई, किंवा साप पोहून जातील अशी शक्यता नाही तरीही अनेक मच्छिमारांच्या तोंडून या बेटावर अजगर असल्याचे किस्से कानावर आलेले होते. अजगर हा पट्टीचा पोहोणारा आहे.  आजवर गोड पाण्यात अजगर पोहोतानाची रेकॉर्डस आहेत पण एखादा अपवाद वगळता खा-या पाण्यात पोहोतानाचा आढळ नाही. तरीही असे किस्से नजरेआड करुन चालणार नव्हते. अनेक मच्छिमारानी पाण्यावर तरंगणा-या अजगराना मासे, खेकडे खाताना पाहिलंय तर बेटावरच्या स्टाफने दीपगृहाच्या आवारात फिरणा-या अजगराना लांब काठीने हुसकावल्याचेही सांगितले पण फोटो मात्र कोणाकडेही नव्हते.  कोणत्याही निष्कर्षावर येण्यासाठी त्याचे डॉक्युमेंटेशन आवश्यक असते आणि तसे पुरावे आवश्यक असतात आणि आम्हाला तेच जमवायचे होते. त्यासाठीचा खरा पुढाकार केदार भिडेचा, सोबत आमची वर्णी लागणारच होती. कारवारचा एक स्थानिक संपर्क मिळाला होता – गौरव पाटील. कारवारला मरिन बायॉलॉजी मधे मास्टर्स डिग्री करतोय. तो त्याच्या श्रीरंग कुलकर्णी या मित्रासह आम्हाला जॉईन झाला. चिपळूणहून कारवारपर्यंत रात्रभर गाडी चालवल्याने झोप मिळालीच नव्हती, त्यात दिवसभरची वणवण झाल्याने काल रात्रीची झोप मात्र मेल्यासारखी लागली. सकाळी उजाडल्यावर चहा, बिस्कीटे घेऊन शोधमोहीम सुरु झाली. अजगर हा निशाचर असल्याने आजचे शोधकाम अवघड होते. एकच आशा होती ती म्हणजे सकाळचे कोवळे उन खायला अनेकदा अजगर उघड्यावर येऊन बसतात. त्यामुळे जेटीच्या बाजूला मोर्चा वळवला. या बाजूला प्रचंड मोठ्या शिळा, दगड हजारोंच्या संख्येत आहेत. प्रत्येक सांदीकोंदीत, कपारीत डोळे अजगराचा शोध घेत होते. डोंगर उतारावर पडलेल्या पालापाचोळ्यामुळे पाय घसरत होते. जपूनच वावरावे लागत होते कारण काही ठिकाणं तर अशी होती की घसरला तर थेट समुद्रसमाधी. खूप वेळ शोधल्यानंतर मला एका अवघड ठिकाणी सापाची कात मिळाली. बेटावरती साप असल्याचा पहिला महत्वाचा पुरावा काळजीपूर्वक हातात घेतला. केदारच्या अनुभवी नजरेने अजगराचीच कात असल्याचा निर्वाळा दिला. वाढलेल्या उत्साहाने दिवस डोक्यावर येईपर्यंत शोधाशोध केली. किती काटे लागले याची गणतीच नाही. कपडे न पिळताही घाम गळत होता पण अजगरचे दर्शन काही झाले नाही. दगडधोंड्यांच्या कडून आम्ही पालापाचोळ्याच्या एरियाकडे शोध सुरु केला पण तिथेही निराशाच पदरी पडली. पोटात कावळे कोकलायला लागले म्हणून परतलो. दीपगृहाच्या स्टाफजवळ एव्हाना गट्टी जमली होती. आमच्यासाठी त्यानी डाळभात तयार केला होता. भुकेपोटी चार वेळेचा भात ओरपला आणि सामान आवरायला घेतले.  संध्याकाळी 4 च्या दरम्यानं बोट येणार होती. वामकुक्षी झाल्यावर बेटाची राहीलेली उत्तर बाजू पण पहायला गेलो. वेली, गच्च जाळ्या, मोठमोठे दगड यांचा खूप सुकाळ होता. इथेही निराशाच पदरी आली. अजगराना लपायला इतक्या अतोनात जागा होत्या की शोधायला आमचेच बळ कमी पडत होते. समुद्रकिना-याने फिरुन पाण्याच्या पृष्ठभागावर काही दिसतंय का हे पाहून जडावलेल्या पायाने आम्ही परतलो. अजगराने हुलकावणी दिली खरी पण त्याचे अस्तित्व कातीच्या रुपाने हाती लागले होते. पुढच्या वेळेस अधिक वेळ व बळ हाती ठेऊन नव्या उमेदीने शोधकाम करायचे ठरवून जेटीवर आलो. ओहोटी संपून भरती सुरु होणार होती. उघड्या पडलेल्या दगडांवरची कालवं उघडी पडली होती. आमची वाट पाहणारे बोटवाले कालवं काढण्यात मग्न होते. आम्ही आल्यावर जामानिमा आवरुन परतीचा प्रवास सुरु झाला. (समाप्त)

























No comments:

Post a Comment