Thursday, November 30, 2017

वेड नागेश्वराचे

वेड नागेश्वराचे











श्रावण म्हणजे व्रतवैकल्याचे दिवस.. श्रावण आला की कोकणाबरोबरच मुंबई, पुण्याच्या ट्रेकर्सना वेध लागतात ते नागेश्वराचे.. नागेश्वराच्या पायथ्याशी असलेले चोरवणेवासीय पण या लोकांची वाट बघत असतात. श्रावण सोमवारी उसळणा-या अलोट गर्दीला पूजा साहित्य, खानपान सेवा पुरवून अर्थार्जनाबरोबरच थोडंफार पुण्य जमवण्याचा खटाटोप चालू असतो.
“नागेश्वरला येतोस का रे?” असं विचारल्यावर “नाही” असं म्हणणारा विरळाच.. कामामुळे यायला न मिळाल्यास त्याची निराशा चेह-यावर पुरेपूर उमटणार... ज्याना विचारले नाही ते जाऊन आल्यावर आपली भकाराने पूजा बांधणार... याआधी जाऊन आलेले आणि निसर्गाचे ते रौद्र स्वरुप पाहून “परत नाही बाबा येणार” हा ठाम निश्चय केलेले हळूच विचारणार, “कधी जाताय रे? मी येऊ?” .... दरवर्षीचे प्रसंग अगदी ठरल्या क्रमाने घडणारच .......
खूप आधीपासून ठरवून कोणताही ट्रेक होत नाही हा माझा आजवरचा अनुभव पण यावेळेस 14 ऑगस्ट याला अपवाद ठरला. मुंबईहून आमचे एलआयसीतले अधिकारी आणि एक चांगले मित्र गणेश डोके आपल्या जयेश या नवख्या मित्राला अगदी विश्वासाने घेऊन आले. विश्वासू आणि जवळचा मित्र केतन आंब्याच्या टाळ्याप्रमाणे प्रत्येक ट्रेकला सोबत असणारच, तो होता.. प्रणव जोशी कायम आमच्याबरोबर वावरणारा पण नागेश्वराचा आणि त्याचा योग कधी आला नव्हता, तो अवचितपणे आदल्या संध्याकाळी भेटला, तोही तयार झाला. खेर्डीतल्या जोशीकाकू वय वर्षे 54 आधीच तयार होत्या त्यामुळे अमृताला त्यांची सोबत झाली, आणि आमचे चिरंजीव बापाच्या पावलावर पाय ठेवायला उत्सुक होतेच.
सक़ाळी लवकर निघून प्रत्यक्ष पायपिटीला सुरुवात झाली तेव्हा 9.15 झाले होते. सुरुवातीचा पाय-यांचा पहिला टप्पा ख-या ट्रेकरला कंटाळवाणाच होतो. रिमझिम पावसात आम्ही अपेक्षेपेक्षाही लवकर पहिला टप्पा पार केला. पठारावर आल्यावर सभोवतालचा हिरवागार सह्याद्री सारे श्रम विसरायला लावतो. दूरदूर दिसणा-या डोंगराउतारावरुन कोसळणा-या धबधब्यांच्या पांढ-याशुभ्र रेषा, हिरवेगार डोंगर, मधूनच उसळणारे ढगांचे लोट दरीतून वर येत आपल्याला लपेटून टाकतात. एक शिरशिरी अंगावर येते आणि पाठी वळून बघताना अंगावर येणारे सह्यकडे पाहिल्यावर आपल्याला कुठे जायचंय? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जमिनीवर आणते. नवशिक्यांनी धरलेले आपले हात अधिकच घट्ट होतात आणि पुढली वाटचाल सुरु होते. दुसरा टप्पा डोंगराच्या पोटावरुन आडव्या वाटचालीचा असल्याने सगळ्यांच्याच पायाला गती येते. झाडांच्या छ्त्रछायेतून वाटेतले दोन तीन धबधबे ओलांडत गेल्यावर अल्पावधीतच खडी चढण सुरु होते. इथपासून खरा कस सुरु होतो. धपापत्या छातीने आस्तेकदम प्रत्येकाची वाट्चाल सुरु होते. नवख्यांची मात्र इथे पाचावर धारण बसायला सुरुवात होते. ऐकलेल्या सा-या गोष्टी साथ सोडून गेलेल्या असतात, पायातले त्राण प्रत्येक पावलाला कमी होत असते. बाजूला दिसणारी दरी डोळे गरगरवते तर वरचे कडे धुक्यात लपेटले गेल्यामुळे अजून किती जायचंय? हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावतो, काहींच्या तो मुखातून वारंवार निसटतो. “हल्ली ह्या शिड्यांमुळे नागेश्वरची खरी मजा कमी झाली आहे” असं कोणीतरी सराईत बोलून जातो, आणि नवशिक्याचे प्राणच कंठाशी आणतो. बाजूच्या लोखंडी रेलिंगवर हाताची पकड आणखीनच मजबूत होते, आणि दर चार पाच पावलांवर थांबत फुललेल्या श्वासावर ती भेदरलेली मनं नियंत्रण मिळवू पाहतात. अरे चल, आलंच आता ...... दहा पंधरा मिनीटाची वाटचाल उरल्ये, असं सांगणा-याला मनोमन शिव्या हासडत पुढचं पाऊल उचललं जातं. अखेरचा टप्पा खरंच अवघड आहे पण आता शिड्या, रेलिंगमुळे तो बराच सोपाही झालाय. आत्तापर्यंतच्या अनुभवामुळे लिडरच्या पोटात मोठ्ठा गोळा असतो कारण उतरताना समोर दरीकडे तोंड करुन उतरताना नवखे त्याला घाम फोडणार असतात. अनुप, जयेश आणि प्रणव वगळता आमची उर्वरीत पाचजण सरावलेली वा नागेश्वराला पुन्हा पुन्हा येणारी मंडळी, त्यामुळे त्यांची काळजी नव्हती. अनुप काटक असल्यामुळे वानराच्या गतीने सगळयात पुढे होता. त्यामुळे त्याला नजरेच्या टप्प्यात ठेवले की काम होत होते. प्रणवने पण थोड्या वेळातच परिस्थितीशी जुळवून घेतल्यामुळे तोही सराईतासारखाच चालत होता. जयेश मात्र गणेशसरांशी ट्युनिंग जुळवून होते. जोशीकाकू या वयातही अमुताबरोबर राहून जिद्दीने चालत होत्या.
मी अनुप जयेश गणेश चौघेही शेवटचा टप्पा पार करुन वर पठारावर पोचलो.. आसंमत धुक्याने भरुन गेला होता. शेवटचा अवघड पॅच चढून आल्यावर खरंतर सगळ्यांच्याच पायातले त्राण गेलेले असते पण एका अनावर ओढीने उर्वरीत 25-30 पाय-या चढून आम्ही गुहेत प्रवेशलो. जोरजोरात घंटा वाजवून नागेश्वराचे दर्शन घेतले. मनसोक्त घंटा बडवण्य़ाचा दुसरा एक फायदा म्हणजे हा आवाज खूप खालपर्यंत ऐकू येतो आणि देऊळ जवळंच आहे या कल्पनेने नव्याने उमेद येते आणि उर्वरीत मंडळीपण त्या बळावर मंदीरात पोचतात.
पाऊस, वारा यामुळे मंदीरात सुकी जागा नव्हतीच.. सोबतचे प्लॅस्टीक पसरून त्यावर् सॅक ठेवल्या. नारळ, उदबत्ती, कापूर लावून नागेश्वराची यथामती पूजा केली, आरती केली आणि पोटपूजेला बसलो. पोटात जणू वडवानल उठला होता. झुणका, भाकर, ठेचा, पोळ्या, श्रीखंड असा मेनू तडस लागेपर्यंत हादडला.. त्यावर सोनपापडीची खिरापत होतीच. आमचं जेवण होतंय तोवर कल्याणहून दोनजण आले. बरोबरची सामग्री बघता हे ट्रेकर्स असल्याचे कळले पण गुहा कुठाय या प्रश्नाने त्याना माहिती काहीही नाही हेही कळले. रात्री राहून सक़ाळी वासोटा करुन परतायचे हा त्यांचा प्लॅन कळताच मलाच त्यांची काळजी वाटायला लागली. खाण्यासाठी त्यांच्यासोबत मॅगी आणि सूपची पाकिटे होती, पण ओलीचिंब जागा आणि भणाणता वारा मूठ दोन मूठ कापूरही पेटू देत नव्हता, तिथे हे मॅगी कशावर करणार? शेवटी आमच्या कडचे जास्तीचे जेवण त्याना आम्ही दिले. “प्रचंड भूक लागल्ये तेव्हा आम्ही जराही लाजणार नाही” या त्यांच्या वाक्यावर आम्ही उरलंसुरलं सगळं जेवण त्याना दिलं. त्यांच्या पुढच्या प्लॅनबाबत त्याना माझ्याकडून मिळालेल्या माहितीने त्यांचे उरलेसुरले धैर्यपण गळाले. थोडावेळ विसावून त्यानी आमच्यासोबतच परतीची वाट धरली. आमच्यातले सराईत आपल्या गतीने तर नवखे जमीन सारवत तो अवघड टप्पा उतरुन आले. याच टप्प्यात जोराचा पाऊसही आला. खाली आल्यावर आपण एवढा कडा उतरलो यावर नवशिक्यांचा विश्वासच बसत नाही. पुढचे टप्पे जरी सोपे असले तरी आतापर्यंतच्या वाटचालीमुळे पायाचे तुकडे पडायची वेळ आलेली असते, मांड्यांमधून गोळे यायला सुरुवात होते अन एका गाफिल क्षणी पाय मुडपून लोटांगणही घातले जाते. आडवा टप्पा पार करुन आलो.. गावक-यांची ये जा सुरु झाली होती. मोक्याची जागा बघून दुस-या दिवशी दुकाने लावण्यासाठी सामानसुमानाची जमवाजमव चालली होती. गरमागरम चहाने शीण आणि थंडी पळाली. पाय-यांचा त्रासदायक टप्पा उतरुन गाडीपाशी आल्यावर पहिला प्रश्न “ परत नागेश्वरला कोण येणार?” याचं उत्तर सार्वजनिकरित्या “ छे, परत नाही बाबा” हेच आलं.
म्हटलं ना ... दरवर्षीचे प्रसंग अगदी ठरल्या क्रमाने घडणार.. पुढच्याही वेळेस सगळे न चुकता येणार आणि परतीच्या प्रवासात गाडीपाशी पुन्हा हेच म्हणणार “छे, परत नाही बाबा”
-- मनोज भाटवडेकर

5 comments:

  1. झक्कास... ट्रेकींगचा अनुअ असाच असतो. ते एक वेड असतं, स्वस्थ बसू देत नाही

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन.मलापण हा ट्रेक करायचा आहे. जमेल काय?

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचं नाव दिसत नाहीये....

      Delete
    2. तुमचं नाव दिसत नाहीये....

      Delete