जागरण मोडावं म्हणून निद्राधीन होण्याचा प्रयत्न केला खरा, पण बाजूने जाणा-या भाविकांचा जयघोष आम्हाला जागं ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होता. अधूनमधून डुलक्या काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर गात्रं शिथिल झाल्याच्या समाधानात अंगावरची रजई उडवून बाहेर आलो. विवेकानंद केंद्रातर्फे उभारलेला कॅम्प न्याहाळत असतानाच जीवनव्रती कल्पना दिदी आणि हार्दिकभैय्या यांची भेट झाली. आदल्या दिवशी त्यांचं तिथे येणं अपेक्षित असताना त्यांची ट्रेन अर्ध्यातच खंडीत झाली होती आणि मग दोन तीन ट्रेन्स बदलत ते आज सकाळी प्रयागराजच्या केंद्रावर पोहोचले होते. दोघांनीही विवेकानंद मिशनचं सेवाव्रत स्विकारलंय. चहा, नाश्ता आटोपल्यानंतर आम्ही त्यांचे समवेत स्नानासाठी संगमावर निघालो. गंगा, यमुना यांच्या जयघोषात चालणा-या जनसमुदायासोबत आमची पावलं पडू लागली. जनसागर म्हणजे काय ते अनुभवताना गर्दीत हरवू नये म्हणून एकमेकांवर लक्ष ठेवण्यात अतोनात तारांबळ उडत होती. अनेकांनी एकमेकांच्या हातांना उपरणी बांधली होती, तर कोणी निशाण काठी घेऊन चालत होतं. खोयापाया केंद्राला जराही उसंत नव्हती. साधारणपणे एक दीड किमी चालून यमुनेच्या धक्क्यावर आलो. सर्वत्र अफाट जनसमुदाय आणि यमुनेच्या पात्रातील बोटी यांचीच भाऊगर्दी होती. खूप वेळाने आम्हाला बोट मिळाली. आम्हाला हुश्श झालं पण खरी परीक्षा पुढे होती. किनाऱ्यावरुन नदीपात्रात बोट लोटण्यासाठी नावाड्यांची जी काही पराकाष्ठा चालली होती ती पाहून खरंच या कष्टाचं मोल होऊ शकत नाही याची जाणीव झाली. आणि हे एकदा नव्हे तर तब्बल चार वेळा... कारण संगमावर पोचलो तरी तराफ्यापर्यंत बोट पोचवणं आणि परतीच्या प्रवासात याचीच पुनरावृत्ती करणं होणार होतं.
महत्प्रयासाने आमची बोट यमुनेच्या प्रवाहात शिरली. नावाडी माहिती देत होते. यमुनेचं पाणी गर्द हिरवट, खोल आणि संथ तर गंगेचा ओघ निळसर, उथळ आणि प्रवाही... यमुनेच्या पृष्ठभागावर विहरणारे स्थलांतरित पक्षी सीगल्स अक्षरशः हजारोंच्या संख्येने होते. बोटी जवळ आल्या की थवा उडतानाचा नजारा म्हणजे निव्वळ नेत्रसुख होतं. विशेष म्हणजे हे पक्षी गंगेच्या प्रवाहात आढळत नाहीत. जणूकाही संगमापर्यंतचं यमुनेचे पाणी हीच त्यांची हद्द....
समोरचा घाट व्हिआयपी मंडळींसाठी होता. दोन्ही घाटांवरुन भाविकांना सातत्याने सावधगिरीच्या सुचना दिल्या जात होत्या. परंतु कोठेही श्रद्धाळूंना हाकलले जाताना आढळलं नाही. संगमाजवळ पोचताच तराफ्यावर आपली नाव टेकवण्याची परिक्षा पार पडल्यानंतर हर हर गंगेच्या जयघोषात आम्ही पाण्यात उतरलो. साधारणपणे अकराचा सुमार असल्याने काकडायला झालं नाही. नावाड्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवाही गंगा तिच्या सोबत आणलेल्या चंदेरी वाळूने आमच्या पावलांना गुदगुल्या करत होती. गंगेला हळदकुंकू, वस्त्र, सौभाग्यलेणं अर्पण केलं, सोबत आणलेल्या द्रोणातून फुलवाती प्रज्वलित करुन प्रवाहात सोडल्या. कुलदैवत, ग्रामदैवत, पूर्वज, आप्तस्वकीय, पशुपक्षी आदी सर्वांचं स्मरण करुन अर्घ्य दिलं. सर्व ज्ञात अज्ञात, परिचित, सजीव यांच्यासाठी प्रार्थना केली. प्रथेप्रमाणे अकरा वेळा गंगेत डुबक्या मारल्या. आम्ही उभे असलेल्या ठिकाणी पाणी जरा उथळच होतं म्हणून अजून पुढे जाऊन पुन्हा डुबक्या मारल्या. तरीही मन भरेना, मग जरा मोकळ्या जागी जीममधे डीप्स मारतात तशा पद्धतीने संपूर्ण शरीर पाण्याखाली नेण्याचा आनंद मिळवला.
तासभर स्नानाचा आनंद लुटूनही मन भरलं नव्हतं. नावाडी देखील निवांत होते. दुसरी फेरी मिळावी यासाठी त्यांची जराही भुणभुण नव्हती. आम्हाला जरा नवलच वाटलं... येणा-या जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा कोलाहल कानी पडत होता. गंगेच्या प्रवाहात पाण्याखाली डोकं नेताच मात्र निव्वळ शांतता. बराच वेळ थांबूनही "के दिल अभी भरा नहीं" अशी आमची अवस्था झाली होती. खोल पाण्यात डुबक्या मारण्याच्या मोहात आमच्या बोटी पासून दूर आलो होतो. दूरवरुन सगळंच सारखं दिसू लागलं. अंदाजानेच तराफा शोधून आमच्या बोटी जवळ आम्ही उभे राहिलो. आता मात्र प्रवाहातून बाहेर येण्याची आवश्यकता होती. आमच्या बोटीतील इतर भाविक स्नान आटोपून कपडे बदलून नाव निघण्याच्या प्रतिक्षेत होते. तराफ्याच्या दिशेने टाकलेल्या पावलाला मऊशार वाळूत काहीतरी टोचलं. पाण्यात हात घालून हातात आलेली वस्तू बाहेर काढली तो गंगेला अर्पण केलेला तांब्याचा गडू होता. शिगोशीग भरलेली वाळू आणि तो गडू हा गंगेचा प्रसाद समजून सोबत घेतला. बोटीतील रिकामे बुधले घेऊन पुन्हा प्रवाहात लांबवर गेलो. जिथे कोणी नाही अशा ठिकाणी ते बुधले गंगोदकानं भरुन आणले. आमची भाग्यरेषा ठळक होती म्हणून आम्हाला या महाकुंभात गंगास्नान घडलं पण ज्यांना जमलं नाही किंवा जमणार नव्हतं, त्यांना घरच्या घरी गंगास्नान व्हावं म्हणून आवर्जून मोठे बुधले भरुन गंगाजल सोबत घेतले. पुन्हा एकदा यमुनेच्या पाण्यात बोट नेण्याची परिक्षा आमच्या नावाड्यांनी दिली आणि काही काळातच आम्ही अरैल घाटावर पोचलो. इतका वेळ झाला होता पण कोणालाच भुकेची जाणीव नव्हती. केंद्रावर परत आल्यावर घड्याळाकडे लक्ष गेलं तेव्हा कळलं की जवळपास तीन वाजायला आले होते. अर्थातच कोठेही जेवण मिळणं शक्य नव्हतं. सोबत आणलेला खाऊ हाच आमच्या पोटाचा आधार ठरला.
विश्रांतीनंतर चहा घेऊन आम्ही बाहेर पडलो. लेटे हूए हनुमान मंदिराला अलोट गर्दीमुळे जाणं अशक्य होतं. नैनी पुलावर केलेली नेत्रदीपक रोषणाई बघून नजीकच्या शिवालय पार्क परिसराकडे जाण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला. दिव्यांच्या रोषणाईने सारा परिसर झगमगला होता. पण ती त्याची खरी ओळख नव्हती.
सुमारे ११ एकर परिसरात भारतीय नकाशाच्या आकारात जवळपास १४ करोड रुपये खर्च करुन हा परिसर उभारला आहे. संपूर्ण परिसर भगवान शंकराला समर्पित असून भारतातील महत्वाच्या शिव मंदीरांची प्रतिकृती इथे उभारली आहेत. भारतीय संस्कृती, वास्तुकलेची भव्यता, मंदीरांचं महात्म्य आणि पौराणिक दिव्यता यांचा संगम आपल्याला इथे अनुभवता येतो. १२ ज्योतिर्लिंग आणि देशातील महत्वाच्या शिवस्थानांचं आपण एकाच ठिकाणी इथे दर्शन करु शकतो. यात प्रसिद्ध सोमनाथ मंदिर, महाकालेश्वर, रामनाथ स्वामी मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर, वैद्यनाथ मंदिर, भीमाशंकर मंदीर, लेपाक्षी मंदिर, पशुपतीनाथ मंदिर यांचा या निमित्ताने विशेष उल्लेख करावा लागेल. या प्रतिकृती उभारताना लोखंडी वेस्ट मटेरियलचा वापर ही उल्लेखनीय बाब असून रात्रीच्या वेळी विजेच्या रोषणाईने सारा परिसर आपल्याला भारुन टाकतो. कोणत्याही कोपऱ्यात तुम्हाला ओम् नमः शिवाय चा जप सतत ऐकू येतो. प्रयाग राजला एक पुरातन अशी धार्मिक मान्यता आहेच पण या महाकुंभाच्या निमित्ताने ज्या गोष्टी नव्याने उभारल्या गेल्या आहेत, त्यामुळे प्रयागराजची नवीन ओळख देखील निर्माण झाली आहे. अशा ठिकाणांहून पाय न निघण्याचा अनुभव एकाच दिवसात आम्ही दोनदा घेत होतो. अखेरीस पार्कची वेळ संपल्यामुळे नाईलाजाने आम्ही बाहेर पडलो. आज मात्र थंडी पडली होती. कष्टानं पाय ओढत कसेबसे केंद्रावर आलो. दुपारचं भोजन न झाल्याने आणि संध्याकाळच्या पायपीटीने पोटात कावळे कोकलत होते. आल्याआल्या गरमागरम रुचकर जेवण मिळालं. इथून पुढे वाराणसीला काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं नियोजित होतं पण तिथे असलेल्या मित्राच्या फोन मुळे कळलं की त्या क्षणाला तिथे किमान आठ ते दहा लाख भाविक आहेत आणि पार्किंगला जागाच नाहीये. ते स्वतः आठ किमी लांब गाडी लावून चालत पोचले होते. रात्रीच्या वेळी प्रयाग राज सोडण्याचा निर्णय मित्राच्या फोनने आणि डोळ्यांवर पसरलेल्या झोपेनं पुढे ढकलला. आमच्याकडे अयोध्येच्या रामलल्ला दर्शनाचे व्हिव्हिआयपी पास होते. अठरा तारखेच्या रुम्स बुक होत्या. मित्र वाराणसी हून अयोध्येला जाणार होता. आता आमच्याकडे स्पेअर दिवस होता म्हणून आमच्या अयोध्या रुम्स त्यांना देऊन उद्या उशिराने प्रयागराज सोडण्याचं ठरवून आम्ही दुलईत गुडूप झालो.
मनोज भाटवडेकर
१७.०२.२०२५