Saturday, April 15, 2017

जिंदादिल बिलाल....


पाच सहा वर्षांपूर्वी असेल कदाचित, एक तोंडाला मास्क लावलेली व्यक्ति आमच्या टीममधे एजंट म्हणून सामिल झाली. नवीन एजंट भरती होणं ही नित्याचीच बाब असल्याने सिनियर मंडळी त्याची लगेच दखल घेतात असं सहसा होत नाही पण तोंडावरचा मास्क मात्र चटकन लक्ष वेधून घेत होता इतकंच... नेहमीच्या मिटींगमधे वेळेत हजर होणा-यांपैकी एक अशी त्याची ओळख होऊ लागली तेव्हा मात्र मग संवाद सुरु झाले. बिलाल देसाईशी मग सगळ्यांचेच सूर जुळू लागले. कमालीचा शांत, आपलं म्हणणं छानपैकी मांडणं, आणि मुख्य म्हणजे सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणा-या बिलाल कडूनच त्याच्या मास्कचे कोडं उलघडलं....
कोर्टात बेलिफ असणा-या वडीलानी नोकरी सोडून गल्फची वाट धरली..... सामान्यपणे कोणत्याही मुस्लिम तरुणास ज्याप्रमाणे गल्फच्या नोकरीचे आकर्षण असते, तसे ते बिलालला पण होतेच. संधी देखील मिळाली आणि नोकरी सुरु झाली पण इथेच नशिबाच्या पतंगाने हेलकावे खायला सुरुवात केली.  दुखणे घेऊन परतलेला बिलाल दोन्ही किडन्या काम करत नाहीत म्हणून तब्बल दोन वर्ष डायलेसिसच्या फे-यात अडकला. खाली आलेला पतंग किडनीदात्याच्या रुपाने पुन्हा अवकाशात झेपावला आणि एका किडनीच्या आधारावर बिलालची जीवन लढाई सुरु झाली. कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याचा एक भाग म्हणजे तो मास्क होता.. पण बिलालने आपल्या जीवावर बेतलेल्या या आजाराचे कधी भांडवल नाही केले, उलट पथ्यपाणी सांभाळून आपली एजन्सी सांभाळत होता. कालांतराने मास्कचीही गरज राहीली नाही आणि रोजचे नित्यक्रम व्यवस्थित सुरु झाले.  बिलालला स्वत:च्या मर्यादा माहीत होत्या त्यामुळे व्यावसायिक शर्यतीत तो कधी धावला नाही, की लग्न करुन आणखी आयुष्य त्याने गुरफटवले नाही उलट वस्तुस्थिती स्विकारुन आनंदी राहीला.
सारं काही सुरळीत सुरु असतानाच नियतीने पुन्हा एकदा मांज्याला झटका दिला... पतंगाने गोता खाल्ला.  पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरु झाला.  सगळ्या चाचण्या करण्यासाठी मुंबईत गेलेला बिलाल स्वादुपिंडात खडे झाल्याचे निदान घेऊन परतला. ऑपरेशन खेरीज दुसरा इलाज नाही हे कळताच त्यासाठीची जुळवाजुळव करुन मुंबईत भाटीया हॉस्पिटलला ऑपरेशनही झाले. किडनीमुळे मधूनमधून बिलालची मुंबईवारी असायचीच, ही पण त्यापैकीच एक अशा समजूतीत आम्ही असताना बिलाल व्हेंटीलेटरवर असल्याची बातमी अश्रफ़ने आणली. मन चरकलं.... मन चिंती ते वैरी न चिंती.  सहकारी मित्र अश्रफ, महेश, अण्णा जठार, प्रकाश, सुदेश यांच्या सोबत मी भाटीया हॉस्पिटलला बिलालला भेटायला गेलो. त्याच संध्याकाळी बिलालचा व्हेंटीलेटर डॉक्टरनी काढला. हा जणू सर्वाना शुभशकूनच वाटला. आम्हाला सगळ्याना पाहून बिलालच्या चेह-यावर एकदम तरतरी आली. प्रत्येकानी दोन शब्द का होईना तो बोलला. लवकरच डिस्चार्ज घेऊन चिपळूणला बिलाल येईल असे वाटत असतानाच पतंग पुन्हा एकदा हेलकावला.  हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरत चालले आणि आज अचानकपणे बिलाल गेल्याचीच बातमी सगळ्यांवर कोसळली.  बिलालचा अर्थ पाणी, नमी, ताजगी असा होतो. बिलाल नावाप्रमाणेच होता. पाण्यासारखाच प्रवाही, ज्यात मिसळेल त्या रंगाचा. चेह-यावर तर टवटवी, ताजगी असायचीच.  एक अत्यंत निगर्वी, खुशमिजाज आणि जिंदादिल मित्र आम्ही आज गमावला. अल्लातालाह उसे मगफिरत फरमाएँ।

Inna Lillahi wa Inna ilayhi raji’unAmin
( He came from god & returned to the god)


-- मनोज भाटवडेकर

विषण्ण.....

खरंय, मन विषण्ण होऊन जातं मृत्यूच्या वावरानं
पणजीहून भरधाव वेगानं मुंबई गाठणारी महाकाली ट्रॅव्हल्स जगबुडीच्या पुलावरुन उलटी कोसळली.. केदारचा फोन आला की अरे माझ्या मित्राच्या आईवडीलांचा तपास लागत नाहीये.. मी तीन चार ठिकाणी फोन करुनही तपास न लागल्याने शेवटी स्वतः गेलो खेडला.... वाचलं कोणीच नाही पण ओळख पटवणं महामुश्किल होतं.... फोटो मागवून घेतलाच होता... ताटकळलेले पोलिस कोणी आलं की मरगळ झटकून पुढे यायचे..ओळख पटली की हलकासा निश्वास टाकायचे.. एवढ्याशा त्या पीएम रुममधे 34 दुर्दैवी देह ... अपघाताने ओळख बदललेली ... मधेच कधीतरी हेच ते दोघेजण म्हणून ओळख पटवून लटपटत्या पावलाने बाहेर येऊन बसलो .... मृत्यूच्या त्या भयानक तांडवानं मन सुन्न करुन टाकलं होतं.... खरंतर त्या दोन अनोळखी व्यक्ती पण आता किमान त्यांचे नातेवाईक येईपर्यंत माझ्याशी नातं जुळवलेल्या त्या दोघांसाठी पुढचे चार तास त्या विषण्ण वातावरणात काढायचे होते

वैद्यकीय व्यवसाय --- एक सुळावरची पोळी

पाय दुखत होता म्हणून काल नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलो होतो. बाहेर वेटींगला कोणी नसल्यामुळे डॉक्टरपण गप्पा मारत बसले. तेव्हढ्यात रिसेप्शनची मुलगी चिठ्ठी घेऊन आत डोकावली.. "सर, ह्या पेशंटला शॉक लागलाय म्हणून आणलंय"... डॉक्टरनी त्वरेने सांगितले की त्याना हॉस्पिटलमधे जायला सांग कारण आपण इथे काहीच करु शकणार नाही. त्याना हेही सांग की शॉक लागल्यामुळे अचानक पणे डिहायड्रेशन होऊ शकते, म्हणून तिकडॆच जा. दोनच मिनीटात धाडकन दरवाजा उघडून दोघेजण आत आले. "सर, फार काही नाही, फक्त चेकअप करा" डॉक्टरनी समजावूनही त्यांचे म्हणणे होते की सर फार काही नाहीये, तुम्ही फक्त चेक अप करा.
लोकं असं का करतात हे कळत नाही.... डॉक्टरनी सांगूनही त्यानीच चेकअप करावे हा का आग्रह? बरं, पेशंट संपूर्ण अनोळखी म्हणजे याच डॉक्टरवर विश्वास वगैरे म्हणून आग्रह नव्हे... "सर, फार काही नाही, फक्त चेकअप करा" म्हणजे काय करायचे हे पण पेशंटनेच ठरवायचे म्हणजे गंमतच... अरे, तुम्हालाच सगळं कळत असेल तर मग येता कशाला डॉक्टरकडॆ?
बसल्याबसल्या मला फेबूवर एका सुशिक्षित मातापित्यानी केलेला आक्रोश आठवला... मुलाला खोक पडल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्याला जवळच्या एका सर्दी,ताप, खोकला यांचे रुग्ण तपासणा-या आणि वयाने नव्वदीत पोचलेल्या डॉक्टरकडॆ नेले. मोठी जखम असल्याने टाके घालणॆ हे काही त्यांच्या इथे शक्य नाही म्हणून त्यानी जवळच्या हॉस्पिटलला न्यायला सांगितले... गंमत म्हणजे वाटेत लागणारे हॉस्पिटल टाळून त्याच रस्त्यावरुन ही मंडळी पुढे एका तशाच डॉक्टरकडे धडकली. पेशंट पाहण्यापूर्वीच त्याही डॉक्टरनी सेम निरोप बाहेर पाठवला.... बस्स, आईवडीलांचे पित्त खवळले... डॉक्टर देवदूत नसून पैसे कमावणारा सैतान ठरला.
अरे, इतक्या गंभीर परिस्थितीत भान राखून मोठ्या हॉस्पिटलमधे न नेता इतरत्र फिरण्यात ज्यानी वेळ घालवला ते दोषी नाहीत पण डॉक्टरनी साधे बाहेर येऊन पाहिले पण नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध गळा काढून हे मोकळे... सुदैवाने मुलाची जखम प्राणघातक नव्हती अन्यथा डॉक्टरविरुद्ध 302 कलम लावण्याची पण फेबूवर त्यानी मागणी केली असती.... असो
आजकाल वैद्यकीय व्यवसाय पण सोपा नाही राहीलेला... कायद्याचा आपल्याला नसेल इतका जाच या व्यवसायाला आहे. पूर्वी जनरल प्रॅक्टीशनर बाळंतपणा पासून किरकोळ ऑपरेशन पर्यंत सारं काही करत.... अपयश आलं तरी लोकांची डॉक्टरवर इतकी श्रद्धा असायची की नातलग पण म्हणायचे की त्याची आयुष्यरेषाच तेवढी होती त्याला तुम्ही तरी काय करणार डॉक्टर? पण आता, लगेच धमक्या, पेपरबाजी, पुढा-यांचा दम आणि कायदेशीर कारवाई सुरु होते आणि हे करण्यास नातलगच पुढे येतात. उपचार न करावेत तर पैसे उकळणारे सैतान आणि माणूसकीसाठी जरा धोका पत्करावा तर कायद्याचा जाच सुरु होतो की तुम्ही सर्जन नाहीत तर हे का केलेत? स्त्रीरोगतद्न्य नाहीत तर बाळंतपण का केलेत? ... त्यामुळे अनेकदा पेशंट योग्य उपचार मिळतील तिथे पुढे पाठवण्याचा मार्ग चोखाळला जातो.
कालच्या निमित्ताने हे सगळं नजरेसमोर आलं इतकंच......