पाच सहा
वर्षांपूर्वी असेल कदाचित, एक तोंडाला मास्क लावलेली व्यक्ति आमच्या टीममधे एजंट
म्हणून सामिल झाली. नवीन एजंट भरती होणं ही नित्याचीच बाब असल्याने सिनियर मंडळी
त्याची लगेच दखल घेतात असं सहसा होत नाही पण तोंडावरचा मास्क मात्र चटकन लक्ष
वेधून घेत होता इतकंच... नेहमीच्या मिटींगमधे वेळेत हजर होणा-यांपैकी एक अशी त्याची
ओळख होऊ लागली तेव्हा मात्र मग संवाद सुरु झाले. बिलाल देसाईशी मग सगळ्यांचेच सूर
जुळू लागले. कमालीचा शांत, आपलं म्हणणं छानपैकी मांडणं, आणि मुख्य म्हणजे
सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणा-या बिलाल कडूनच त्याच्या मास्कचे कोडं उलघडलं....
कोर्टात बेलिफ
असणा-या वडीलानी नोकरी सोडून गल्फची वाट धरली..... सामान्यपणे कोणत्याही मुस्लिम
तरुणास ज्याप्रमाणे गल्फच्या नोकरीचे आकर्षण असते, तसे ते बिलालला पण होतेच. संधी देखील
मिळाली आणि नोकरी सुरु झाली पण इथेच नशिबाच्या पतंगाने हेलकावे खायला सुरुवात केली. दुखणे घेऊन परतलेला बिलाल दोन्ही किडन्या काम
करत नाहीत म्हणून तब्बल दोन वर्ष डायलेसिसच्या फे-यात अडकला. खाली आलेला पतंग
किडनीदात्याच्या रुपाने पुन्हा अवकाशात झेपावला आणि एका किडनीच्या आधारावर बिलालची
जीवन लढाई सुरु झाली. कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याचा एक भाग म्हणजे
तो मास्क होता.. पण बिलालने आपल्या जीवावर बेतलेल्या या आजाराचे कधी भांडवल नाही
केले, उलट पथ्यपाणी सांभाळून आपली एजन्सी सांभाळत होता. कालांतराने मास्कचीही गरज
राहीली नाही आणि रोजचे नित्यक्रम व्यवस्थित सुरु झाले. बिलालला स्वत:च्या मर्यादा माहीत होत्या
त्यामुळे व्यावसायिक शर्यतीत तो कधी धावला नाही, की लग्न करुन आणखी आयुष्य त्याने
गुरफटवले नाही उलट वस्तुस्थिती स्विकारुन आनंदी राहीला.
सारं काही सुरळीत
सुरु असतानाच नियतीने पुन्हा एकदा मांज्याला झटका दिला... पतंगाने गोता खाल्ला. पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरु झाला. सगळ्या चाचण्या करण्यासाठी मुंबईत गेलेला बिलाल स्वादुपिंडात
खडे झाल्याचे निदान घेऊन परतला. ऑपरेशन खेरीज दुसरा इलाज नाही हे कळताच त्यासाठीची
जुळवाजुळव करुन मुंबईत भाटीया हॉस्पिटलला ऑपरेशनही झाले. किडनीमुळे मधूनमधून
बिलालची मुंबईवारी असायचीच, ही पण त्यापैकीच एक अशा समजूतीत आम्ही असताना बिलाल
व्हेंटीलेटरवर असल्याची बातमी अश्रफ़ने आणली. मन चरकलं.... मन चिंती ते वैरी न
चिंती. सहकारी मित्र अश्रफ, महेश, अण्णा
जठार, प्रकाश, सुदेश यांच्या सोबत मी भाटीया हॉस्पिटलला बिलालला भेटायला गेलो.
त्याच संध्याकाळी बिलालचा व्हेंटीलेटर डॉक्टरनी काढला. हा जणू सर्वाना शुभशकूनच
वाटला. आम्हाला सगळ्याना पाहून बिलालच्या चेह-यावर एकदम तरतरी आली. प्रत्येकानी
दोन शब्द का होईना तो बोलला. लवकरच डिस्चार्ज घेऊन चिपळूणला बिलाल येईल असे वाटत
असतानाच पतंग पुन्हा एकदा हेलकावला. हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरत चालले आणि आज
अचानकपणे बिलाल गेल्याचीच बातमी सगळ्यांवर कोसळली. बिलालचा अर्थ पाणी, नमी, ताजगी असा होतो. बिलाल नावाप्रमाणेच होता. पाण्यासारखाच प्रवाही, ज्यात मिसळेल त्या रंगाचा. चेह-यावर तर टवटवी, ताजगी असायचीच. एक अत्यंत निगर्वी, खुशमिजाज आणि जिंदादिल मित्र
आम्ही आज गमावला. अल्लातालाह उसे मगफिरत फरमाएँ।
Inna Lillahi wa Inna ilayhi raji’un – Amin
( He came from god & returned to the god)
-- मनोज भाटवडेकर

Nice manojji
ReplyDeletedole panavale vachun. tyacha atmyas sadgati labho
ReplyDeleteआमिन!
ReplyDeleteI also met him personally when my wife suffered from renal failure. Allah may magfirat him and place in Jannatul firdous
ReplyDelete🙏🙏🙏🙏
ReplyDeleteदेव त्यांना शांती देवो
ReplyDeleteआमच्या घाटगे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
ReplyDelete