Tuesday, August 29, 2023

अशी पाखरे येती

अशी पाखरे येती 




सन 2011 चा सुमार असेल, एक लॅब्रॅडोर जातीची कुत्री तू सांभाळशील का अशी मला विचारणा झाली.. मूळ मालकाला सांभाळणे अशक्य झाले म्हणून त्याने आपल्या मित्राला दिलेली, पण तिथेही तिची हेळसांड सुरु झाली होती. माझ्याकडे लँब्रडॉर मेल होताच, त्यात आणखी हीची भर कशाला असं वाटत असतानाच माझ्या तोंडून नकळत होकार बाहेर पडला.  स्वजातीय असली तरी नावाने मात्र परकीय होती – मॅक्सी... तिचं नाव ऐकून स्मृती चाळवल्या.. कुठे बरं हिला पाहिलंय? येस्स, किरणच्या घरी.. तेव्हाही ती लहानखुरीच होती पण तरी तिची ही दशा? अत्यंत हडकुळी, कमालीची थकलेली, केस झडलेले आणि नाक सुकलेलं... पाणीदार डोळे अगदीच निस्तेज झाले होते. कोणत्याही परवानगीविना मॅक्सी मला ओलांडून आत गेली आणि हक्काचं घर मिळाल्याच्या आनंदात हॉलचा कोपरा गाठून झोपून गेली.
रात्र झाली आणि सवयीने तिने हॉलमधल्या सोफ्यावर उडी मारली. सोफ्यावर बसण्याचा अधिकार फक्त माणसांचा, हा नवीन घरातला पहिला धडा तिला कळला आणि कोप-यातला गोणता हाच आपला सोफा तिने स्विकारलाही.. रोजचं खाणं तिच्या देहाएवढंच, इवलुसं.... मॅक्सी स्वभावाला अगदीच गरीब होती पण दादागिरी करायला जोडीदारीण छान मिळाली, हा मेलचा आनंद तिने क्षणार्धात नेस्तनाबूत करुन टाकला. त्याच्या खाण्याच्या ताटलीत बिनदिक्कतपणे तोंड घालून ती खाऊ लागली आणि तिचे खाणं संपेपर्यंत तो मुकाट उभा राहीला.  मॅक्सीने पहिल्याच वेळी त्याचं जे पाणी जोखलं, ते शेवटपर्यंत कायम राहीलं.. स्वत:चं खाणं घाईनं संपवून ती त्याच्या खाण्यावर बिनधास्त डल्ला मारायची. त्याला तिची भिती होती असं नाही, कारण कित्येकदा तिला भूक नसतानाही तिला भुंकून उठवल्याशिवाय आणि तिने खाल्ल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरायचा नाही. आजवर भाकरतुकडा खाणारी मरतुकडी मॅक्सी आमच्याकडे पेडीग्री खाऊ लागली, छान बाळसं धरु लागली. पुढे पुढे तर दोघंही पायपुसणं दोन टोकांना धरुन हिसकाहिसकी करायची.. ताकदीनं तिच्यापेक्षा दुप्पट असलेल्या मेलला ती पुरुन उरायची. लुटुपुटीच्या भांडणातला त्याच्यावरचा तिचा गुरगुराट ऐकण्यासारखा असायचा.
   
दोघंही संसारात रुळली आणि एप्रिल महिन्याच्या एके रात्री तिला प्रसववेदना सुरु खाल्या. तिच्या मूळच्या नाजूक तब्येतीमुळे जरा काळजी होती पण शेवटी मुक्या जीवांचा देवच राखणकर्ता... रात्री अकरापासून अडीच वाजेपर्यंत एकामागोमाग चार पिल्लं झाल्यानंतर तिने जी टाईमप्लिज घेतली ती सकाळपर्यंत.  अजूनही पोटातली उर्वरीत पिल्लं हाताला लागत होती. कळा तर येत होत्या पण त्यांचा जन्म होत नव्हता. अखेरीस कळा देऊन मॅक्सी थकली, अन एक पिल्लू मार्गातच अडल्याचं लक्षात आलं... रत्नागिरीच्या डॉ. अविनाश भागवत यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे उपाय झाले पण पिल्लू जागचं हलत नव्हतं. आता मात्र मॅक्सी जास्तच थकत चालली. तिला कळा देण्याचं पण त्राण उरलं नव्हतं. डॉ.भागवत रत्नागिरीहून धावत आले.. अडलेले पिलू सोडवल्यानंतर आणखी चार पिल्लं जन्माला आली आणि एकंदर 19 तासांचं नऊ पिल्लांचं बाळंतपण संपलं. जात्याच सोशिक असलेली मॅक्सी सर्व पिल्लांना कुशीत घेऊन पहुडली होती. दिसामासांनी बाळसं धरलेली सगळी पिल्लं प्रकृतीच्या बाबतीत मेलवर गेली.. एकदम दणकट.. योग्यवेळी चांगली स्थळ पाहून सगळी आपापल्या घरी गेली. यानंतर दर हिवाळ्यात मॅक्सीची कूस उजवत राहीली आणि तिने चार बाळंतपणात एकूण 32 पिल्लांना जन्म दिला.  ”मॅक्सीची तब्ब्येत उत्तम राहायला हवी असेल तर आता बाळंतपण बास” हा डॉ.भागवतांचा सल्ला मानून तिचा पाळणा थांबवला आणि त्यानंतर तिच्या अंगावर मूठ मूठ मांस चढत गेलं.. वय वाढत चाललं होतं, बारीक सारीक कुरबुरी, स्कीन इन्फेक्शन यांना तोंड द्यावं लागत होतं, तरीही ती आहे तशी खूष, आनंदी होती.
रोज बाहेरुन आम्ही घरी आलो की कितीही आजारपण असलं नसलं तरी मॅक्सी गेटपर्यंत स्वागताला यायचीच. मे महिन्याच्या उन्हाळ्यात मेल आळस करायचा पण तापल्या टाईल्सवरुन मॅक्सी पुढे यायची. दारावरुन जाणा-या येणा-यांना ही जोडगोळी इतकी कौतुकाची होती की कोणीही हाक मारुनच पुढे जाणार. माझी कुसुमआत्या तर मेहूण काय म्हणतंय असंच विचारायची. बहिणीची मुलं मे महिन्यात सुटीला आली की त्या दोघांना फिरवायला न्यायचं कंत्राट त्यांच्याकडे असायचं.. त्यातही मॅक्सीला फिरवायला सगळे खूष, कारण ताकदीची गरज नसायची आणि सोडून दिली तरी हाक मारल्यावर परत फिरायची... त्यामानाने मेल दांडगोबा..  अंघोळीच्या वेळी पण तसंच... दोघांनाही मनापासून अंघोळ नको असायची पण चल मॅक्सी अंघोळीला असं दरडावलं की बिचारी अपराध्यासारखी मान खाली घालून बाथरुममधे उभी राहायची.

भितींवरच्या पाली, रस्त्यावरुन जाणारी गाईगुरं ही तिची शत्रुपक्षातली मंडळी होती. ही मंडळी दिसेनाशी होईपर्यंत आरडाओरडा करणं हा आवडीचा व्यायाम.. भिंतींवरच्या पाली हाकलण्याच्या खेळात हॉलच्या भिंतींचा रंग खरवडला गेला, पण तिच्या चाकरीत खंड काही पडला नाही.  डॉ.भागवत इन्जेक्शन द्यायचे म्हणून ती त्यांच्यावर वैतागायची. त्यांची गाडी आली की ते खाली उतरेपर्यंत भुंकत गेटजवळ थांबायची. त्या भुंकण्यात ओळख होती, स्वागत असायचं... पण डॉक्टर गाडीतून उतरले की मॅक्सी पोर्चमधे पळायची. गेटमधून आत आले की बाईसाहेब घरात पळायच्या आणि लपून बसायची.. मग शोधून आणून त्यांच्यापुढे तिला उभं करायचं हे दिव्यच असायचं.  अशातच एक दिवस मॅक्सीला रक्तस्त्राव सुरु झाला. हीट पिरीयड नसल्याने काळजी वाटली आणि ती दुर्दैवाने खरी निघाली. Vaginal Tumor चं निदान झालं, आणि किमोथेरपीच्या पर्वाला सुरुवात झाली.  बिचारीला काय काय सोसायला लागणार होतं हे परमेश्वरच जाणे. पण तरीही एकदाचे ते प्रदीर्घ पर्व संपले. अपेक्षेपेक्षा जास्त झेपवलं तिने... आता काळजी नव्हती पण तरीही मधूनच कधीतरी स्पॉटींग दिसलं की धस्स व्हायचं.  बघता बघता मॅक्सीला वयाची दहा वर्ष पुरी होऊन अकरावे वर्ष लागले. व्याधींमुळे हलक्या झालेल्या शरीरावर वय जरा जास्तच दिसत होतं. मे महिन्यात एकेदिवशी तिने सकाळी दूधाकडे तोंड फिरवलं, तर दुपारची पेडीग्री पण खाल्ली नाही. इन्फेशनने डोकं वर काढलं होतं पण तरीही आवडीचे  पदार्थ म्हणजे टोमॅटो, गाजर, सफरचंद, हापूस आंबा मटकावत होती. मधूनच पोळी पण खायची त्यामुळे काळजी नव्हती. उपचार सुरु झाले पण 10 जूनपासून तिने अत्यंत आवडीचा टोमॅटो देखील खाल्ला नाही तेव्हा तिला गाडीत टाकून रत्नागिरी गाठली.. सलाईनमधून दिलेल्या औषधांनी टकटकी आली खरी पण ती औटघटकेची ठरली. त्यानंतर जेव्हा ती पाणी प्यायची देखील बंद झाली तेव्हा आमच्या तोंडचे पाणी पळाले.  इथूनच रोजच्या  सलाईनचा आणि व्हिटॅमीन इन्जेक्शनचा खुराक सुरु झाला. चिपळूणला खात्रीचा आणि स्पेशालिस्ट व्हेटरनरीयन नाही.  रोज उपचारासाठी रत्नागिरी गाठणंही शक्य नव्हतं.  त्यामुळे डॉ.भागवतनी पूर्वी कधीतरी शिकवलेलं उपयोगात आणून डॉक्टर सांगतील तसं सलाईन आणि इतर उपाययोजना सुरु केल्या.  असंच एकदा सलाईन लावताना ब्लड घेऊन तपासणीला पाठवलं आणि पायाखालची जमीनच सरकली. ब्लड शुगर फक्त 10.40, ब्लड युरिया 224 पांढ-या पेशी 72,500 आणि क्रिआटीनिन 6.51... लक्षणं गंभीर होती. मॅक्सी घरचं काहीच खात नाही आणि आमच्याकडे करणं शक्य नाही म्हणून रुपेश पवार, केतन, आदित्य तिच्यासाठी चिकन सूप घेऊन यायचे. कधी प्यायची, कधी नाही. पण औषधं, सलाईनच्या जीवावर तग धरुन होती. उपचारांना प्रतिसाद म्हणायचा की काय पण भरपूर प्रमाणात पाणी मात्र प्यायला लागली म्हणून साखर मीठ पाणी, व्हिटॅमीन इन्जेक्शन द्यायला लागलो. क्रिआटीनिन वाढलेलं असलं तरी भरपूर लघवी होत होती त्यामुळे काळजी नव्हती. पण हे किती काळ? कारण खाणं काही खात नव्हती. अशक्तपणा वाढतच होता.
रोजच्या सलाईनमुळे आता पायाच्या शिरा लागणं कठीण होऊन बसलं.. मागच्या पायाची शीर लागणं हे कसबाचं काम आणि ती आउट न जाणं हे त्याहूनही महत्वाचं..  19 तारखेला महत्प्रयासाने मागच्या पायाच्या शीरेतून एक सलाईन पूर्ण झालं. पण सकाळ झाली तीच निराशाजनक... आजवर लटपटत्या पावलांनी का होईना पण मॅक्सी बाहेर येत होती, शू करत होती. किडन्या अजूनही काम करत होत्या. आज मात्र तिने अंथरुण सोडलं नाही. उचलून बाहेर नेली तरीही तशीच बसून राहीली. निरुपायाने पुन्हा बेडवर नेऊन ठेवली. खाणं केव्हाच सुटलं होतं. काल थोडं का होईना पाणी पीत होती. आज मात्र मान फिरवत होती.  ऑफीसमधून दुपारी घरी आल्याआल्या पहिला प्रश्न, मॅक्सीने शू केली? उत्तर नकारार्थी मिळालं... बेड देखील कोरडा होता म्हणजे किडनी फंक्शन ढासळू लागल्याची लक्षण.. जोपर्यंत लघवी होत नाही तोपर्यंत सलाईन देणं अशक्य... देवाला हात जोडले.. डॉक्टरनी सांगितलेले लघवी होण्याचं इन्जेक्शन दिलं आणि प्रतिक्षा सुरु झाली... पण ती शेवटपर्यंत प्रतिक्षाच राहीली... रात्र झाली आणि स्थिती गंभीर बनली.. मॅक्सी कण्हत होती. तिच्या बेडशेजारी बसून सर्वांगावरुन हात फिरवला की शांत रहायची पण उठून झोपायला गेलो की कण्हायची. शेवटी एक वेदनाशामक इन्जेक्शन दिल्यावर तिला आराम पडला... तिच्याशेजारी सुमारे साडेचारपर्यंत बसून होतो.. झोप लागल्ये बघून मी पण झोपायला गेलो..
जाग आली तर सकाळचे साडेसात वाजलेले.. पांघरुण फेकून आधी मॅक्सीकडे धावलो आणि काळजाचा ठोकाच चुकला. माझ्या आणि तिच्या झोपेतच तिचा श्वास थांबला होता. पापण्यांची तटबंदी भेदून अश्रू अनिर्बंधपणे वाहू लागले. अत्यंत सोशिक आणि गुणी अशी आमची पोर त्या जीवघेण्या आजारापुढे हरली.  मुका जीव यातना सांगू शकत नाही, आपण असहाय्यपणे पाहत राहण्याखेरीज काही करु शकत नाही.  आजाराचं स्वरुप पाहता ती फार दिवस काढणार नाही हे कळलं होतं पण अखेरच्या दिवशी तिला झालेल्या यातनांनी खूप वाईट वाटलं. तिच्या शेजारी बसून अंगावरुन हात फिरवला की ती शांत व्हायची. ती कण्हत होती ते तिला आधार हवा होता म्हणून की दुखत होतं म्हणून, हे मला नाही ठरवता येत. पण एक नक्की की हाताचा स्पर्श तिला कळत होता आणि तोच तिला वेदना सहन करायला ताकद  देत होता.

घशातला आवंढा गिळून परसदारी तिचे क्रियाकर्म उरकले अन आत आलो.  सवयीने तिच्या रोजच्या जागांकडे लक्ष गेलं. त्या रिकाम्या जागांनी काळजाला घरं पाडली. मेलला खाणं घालताना नेहमीप्रमाणे दोन भांडी उचलली गेली.. आता एकाच भांड्याची सवय करायला लागणार होती.  अनुप कॉलेजला गेला होता तर नेहाचा पेपर असल्याने त्यांना कळवलेले नव्हते. संध्याकाळी ते दिव्य पार पाडायचे होते. स्वत:ला सांभाळू की त्यांना हेच कळत नव्हते. गेले पंधरा दिवस ऑफिसमधून लवकर येऊन तिचं स्पंजिंग, पावडर आणि मग औषधं, सलाईन हा क्रम म्हणजे एक रुटीन झालं होतं. आज संध्याक़ाळी घरी आल्यावर मात्र एक रितेपणा मनाला व्यापून राहीला...


दूरवर कोठेतरी गाणं लागलं होतं... अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती... अश्रूंचा बांध पुन्हा फुटला, मात्र तो थोपवण्याची ताकद माझ्यात उरली नव्हती. 


अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
.....
.
.
.

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती  
     
मनोज

21.06.2019         



7 comments:

  1. हृदयस्पर्शी.

    ReplyDelete
  2. पाखरे येतात आणि जातात,मनाच्या कोपऱ्यात आयुष्यभरासाठी कुठेतरी कायम स्वरूपी स्थान निर्माण करून....
    या पाखरांना तुमच्या सारखे पालक मिळणे हे त्यांचे भाग्यच,
    मॅक्सी ला आमच्या arrow च्या आई ला भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  3. खूप ह्रिदय स्पर्शी लिहिलंय.. वाचताना अश्रू थांबवू शकत नाही तर तुमची काय अवस्था असेल समजू शकतो

    ReplyDelete
  4. खरी कुटुंब सदस्य होती तुझी ती ती गेली तेव्हा आम्हाला ही काही सुचल नव्हत कारण ती ओंकार कडे होती तेव्हा ओळखायला लागली होती .एखादा माणूस आणि एखादा लळा लावलेला जीव कायमचा नाहीसा होणं खुपच खोल घाव होण्यासारख असतं .

    ReplyDelete
  5. खरं आहे.. माझ्याकडे अधूनमधून येत असल्यामुळे मलाही तिचा लळा लागला होता. तुझ्या घरी आल्यावर तिच्याकडून खास स्वागत व्हायचं. लाड करून घ्यायची.. कुटुंबातला एक सदस्यच आपल्यात नसल्याची भावना मनात कायम आहे.

    ReplyDelete