Thousand by hundred
३०.१०.२०२०
आजचं टार्गेट होतं शंभर किमी सायकलिंग.... सोबत एलिव्हेशन पण एक हजार मीटर पेक्षा अधिक करायचं होतं.... थोडक्यात सपाट रस्त्यावर सायकल चालवून उपयोग नव्हता. एकच ऑप्शन म्हणजे कुंभार्ली घाटमाथा. पण तिथेपर्यंत गेल्यावर ना सेंच्युरी पूर्ण होत ना एलिव्हेशन पूर्ण होत.. घाटमाथा उतरुन पुढे गेलं, अगदी कोयना बसस्टँड पर्यंतचं गेलं तरी अंतर ४४ किमी होतं. कदाचित एलिव्हेशन मिळेल पण अंतराचं काय म्हणून शिवसागर जलाशयाच्या काठाने ओझर्डे धबधबा हे डेस्टिनेशन मनात धरलं. अंतर ५३-५४ किमी होतं आणि चढही आहेत. परतीच्या प्रवासात कुंभार्लीचा कोयना बाजूचा चढ.. दोन्ही टार्गेट्स साध्य होतील याची खात्री पटल्याने सकाळी पावणेपाचला घर सोडलं.
पोफळी चेकपोस्टला पोचता पोचता पूर्व दिशा उजळू लागली. जसा घाट चढू लागलो तसा हवेतील गारवा पण वाढू लागला. अशा आल्हाददायक वातावरणात सायकल चालवणं म्हणजे निव्वळ सुख.. पोफळीतून लोकं मॉर्निंग वॉकसाठी घाटरस्त्याला चालत असतात. हायहँलो करत पुढे जात घाटातून तांबे कँटीन कडे जाणाऱ्या फाट्यावर थांबलो. एक गावठी पण गोडूला कुत्रा शेपटा हलवत पुढे आला. कुत्रा हा माझा वीक पॉईंट, त्याच्या चारपाच उड्या अंगावर घेऊन पुढे निघालो.
बघता बघता सोनपात्राचं वळण आलं. चार फोटो झाले. शेळके आजोबांशी गप्पा झाल्या आणि सायकल पुढे निघाली. काही दिवसांपूर्वी म्हणजे नेमकं सांगायचं तर १६ ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पन्नाशीतील पन्नाशी पूर्ण करण्यासाठी इथवर आलो होतो. आज मात्र बराच पल्ला मारायचा असल्याने लगेचच पुढे निघालो.
याआधीची घाटमाथा राईड अगदी धुवाँधार पावसात होऊनही शेवटच्या किलोमीटर मधे जामच कुथायला झालं होतं. पण आज मात्र सोनपात्रा ते घाटमाथा टप्पा हसतखेळत म्हणावा असा पार झाला. बाईकवाले अंगठा दाखवून दखल घेत होते. अचानक एक कार थांबली आणि आतून एक जवळचा मित्र आणि त्याची बायको उतरली. दोनचार मिनिटांच्या संवादानंतर जो तो आपल्या मार्गाला लागला. घाटमाथ्यावर पोचून फोटोसेशन आणि पोटपूजा एकाच थांब्यात उरकून घेतलं आणि उताराला लागलो.
उतार संपला आणि समोर आलेल्या रस्त्याचं वर्णन काय सांगू देवा... निव्वळ गलिच्छ, घाणेरडा रस्ता. इथून हेळवाकला आठ किलोमीटर जाईपर्यंत यमयातना सहन करत एसटीच्या रस्त्याला डावीकडे वळलो. हा रस्ता मात्र मख्खन होता पण चढ काही ठिकाणी परिक्षा बघतात.
एकदाचा कोयना बसस्टँड आला. इथूनच समोर जाणारा रस्ता ओझर्डे धबधब्याकडे जातो. नेहरु गार्डन जवळच्या चढाने मात्र सत्वपरिक्षा पाहिली. अगदी १x१ गियरवर पण पायात पेटके आले. संपला बाबा एकदाचा चढ आणि समोर आला पाबळनाला धबधबा. अजूनही भरपूर पाणी आहे धबधब्याला. समोरच अथांग असा शिवसागर जलाशय पसरला होता.
कामरगाव, मिरगाव मागे टाकत वृक्षराजीच्या एका नैसर्गिक बोगद्यात शिरलो. ओझर्डे जवळ आल्याची खूण. नुकताच पाऊस संपल्याने पाण्याची पातळी अत्त्युच्च आहे. अगदी धबधब्याजवळच्या पुलापलिकडे पण फुगवटा आलाय.
कोरोनामुळे प्रवेशबंदी आहे म्हणून बाहेरुनच फोटोग्राफी करुन मी परतीचा प्रवास सुरु केला. जितका आलो तितकंच परत जायचं होतं आणि उन रणरणायला लागलं होतं. पण झाडांच्या सावलीतून जाताना थंडगार झुळका श्रम विसरायला लावतात. वाटेत एक रस्ता अगदी पाण्यापर्यंत जातो. काठावर सायकल लावून निळसर जलाशयाचे फोटो काढले. मुख्य रस्त्यावर येईपर्यंत एवढ्याश्या त्या रस्त्याने चांगलाच घाम फोडला.
परतीच्या रस्त्यावर हेळवाक येईपर्यंत आता उतारच उतार आहेत. त्यामुळे कोयना स्टँडजवळ येताच तिथला छोटासा सुद्धा चढ नको म्हणून पाटण रस्त्याला लागून जुन्या पुलापर्यंत येऊन हेळवाक गाठलं. नेहमीच्या हॉटेलमध्ये पोटपूजा आटपली.
माझ्या बहिणी आजच पुण्याहून येणार होत्या. त्यांना हेळवाकला थांबवून सरप्राईज दिलं. निघे निघेपर्यंत आणखी एक मित्र येत असल्याचा फोन आला. पण तो पाटणजवळ असल्याने त्याला घाटमाथ्यावर भेटू असा विचार करुन सायकल दामटली.
खड्डे चुकवण्याची पराकाष्ठा करताना नवनवीन खड्ड्यातून जात घाटाच्या पायथ्याशी आलो. आता मात्र सावली औषधाला पण नव्हती. चढावर असताना मी सहसा एंड पॉईंटकडे न बघता मान खाली घालून कशात तरी मन गुंतवतो. सकाळचाच फंडा वापरत अथर्वशीर्ष पठण सुरु केलं. आम तो आम, गुठलीओंके भी दाम... डबल फायदा. घाटमाथ्यावर थांबलो तरी पण मित्राचा पत्ता नाही म्हणून मनातच सोनपात्रा मिटींग पॉईन्ट ठरवला. सायकल उताराला लागली. वाटेत एक शँमेलिऑन भर उन्हात रस्ता पार करत होता. नक्की कोणत्या तरी गाडीखाली गेला असता. उचलून दरीच्या बाजूला सोडण्यापूर्वी फोटो मस्टच होते. तो त्याच्या मार्गाने गेला मी माझ्या...
सोनपात्राला शेळके आजोबा होतेच. घुमटीशेजारी अंग लोटलं आणि कंबर लांब केली. दहाएक मिनिटात मित्र आला, ख्यालीखुशाली झाली आणि पुन्हा घाट उतरायला सुरुवात झाली. पोफळी येईतो हवेतील उष्मा जाणवण्याइतपत वाढला. अजून वीस किलोमीटर, तेही असह्य उकाड्यातून... पण आता सायकलने वेग पकडला होता. मुंढे फार्मजवळ टपरीवर पाणी भरुन घेतलं आणि पिंपळी कँनॉलजवळ थंडगार ताकासाठी थांबलो. खरंच छान ताक मिळालं. एकास एक असे दोन ग्लास रिचवले आणि निघालो. बहादूरशेख आला आणि मग मात्र गती मंदावली. शेवटचे दोनचार किलोमीटर उरले की अगदीच कंटाळा येतो. दर शंभर मीटरवर आता किती उरलं याचा जप करत घरापाशी पोचलो. स्ट्राव्हावर व्यवस्थित नोंदी करुन घेतल्या. लेकाच्या मदतीने स्ट्रेचिंग केलं. अंघोळ झाली आणि पंखा फुल्ल सोडून मी निद्राधीन झालो. डोळ्यांवर झोप आरुढ होण्यापूर्वी पुन्हा एकदा पाहून घेतलं.. 108 किमी आणि 1304 मीटर एलिव्हेशन.... याचसाठी केला होता अट्टाहास... आजच्या दिवसाचं सार्थक झालं..
मनोज भाटवडेकर
९४२१२५३१५३
























